श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ५५ वा

अर्थे ह्यविद्यमानेऽपि संसृतिर्न निवर्तते ।

ध्यायतो विषयानस्य स्वप्नेऽनर्थागमो यथा ॥५५॥

विचारें पाहतां मिथ्या स्वप्न । तेथील विषयसेवन ।

सुखदुःखें बाधिती गहन । ऐक लक्षण तयाचें ॥३८॥

स्वप्नीं पुत्रलाभ राजसन्मान । तेणें सुखें ओसंडे आपण ।

कां झालिया धनहरण । तेणें दुखें दारुण आक्रंदे ॥३९॥

त्यासी जागें न करितां । स्वप्नसुखदुःखबाधकता ।

निवर्तेना सर्वथा । जाण तत्त्वतां उद्धवा ॥६४०॥

तेवीं विषयासक्त जन । ज्यांसी अखंड विषयध्यान ।

ज्यांचें विषयीं सदा मन । देहाभिमान गोंवीत ॥४१॥;

तयांसी देखावया उपावो । जयां विषयासक्ति होय वावो ।

येचि अर्थींचा दृष्टांत पहा वो । स्वयें सांगे देवो उद्धवासी ॥४२॥

न करितां श्रवण मनन । न साधितां विवेकज्ञान ।

न धरितां वैराग्य पूर्ण । भवभय जाण तुटेना ॥४३॥

संसार मिथ्या तोंडें म्हणतां । न तुटे सुखदुःखभयव्यथा ।

जन्ममरणादि अवस्था । अहंममता सुटेना ॥४४॥

ऐसे जे अज्ञान जन । तिंहीं अवश्य करावें साधन ।

विवेकें वैराग्य धरितां पूर्ण । भवबंधन निवारे ॥४५॥

यालागीं उद्धवा जाण । सकळ साधनांचें कारण ।

जेणें हाता चढे ब्रह्मज्ञान । तें वैराग्य पूर्ण साधावें ॥४६॥

ऐक विरक्तीची मागी । जैशी धडधडीत आगी ।

तैसें वैराग्य व्हावें अंगीं । तैं प्राप्तीलागीं अधिकारु ॥४७॥

ऐसे मुमुक्षु जे पुरते । परम कृपेचेनि हातें ।

सद्गुरु थापटोनि ज्यांतें । करी अद्वैतें जागृत ॥४८॥

ज्यासी देहादिभेदपुष्टी । मिथ्या माया गुणत्रिपुटी ।

ब्रह्मानंदें कादली सृष्टी । स्वप्नवत्‌ दृष्टीं संसारु ॥४९॥

येव्हडी ही परम प्राप्ती । वैराग्यविवेकें चढे हातीं ।

तेंचि वैराग्य उद्धवाप्रती । स्वयें श्रीपती सांगत ॥६५०॥;