श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ५८ व ५९ वा

उद्धव उवाच- यथैवमनुबुद्धयेयं वद नो वदतांवर ।

सुदुःसहमिमं मन्य आत्मन्यसदतिक्रमम्॥५८॥

विदुषामपि विश्वात्मन् प्रकृतिर्हि बलीयसी ।

ऋते त्वद्धर्मनिरताञ्छात्रांस्ते चरणालयान् ॥५९॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे भगवदुद्धवसंवादे द्वाविंशोऽध्यायः ॥२२॥

जे सांगों जाणती वेदशास्त्रार्था । ते वक्ते म्हणिपती तत्त्वतां ।

त्या वक्‍त्यांमाजीं तुझी श्रेष्ठता । मुख्य वेदांचा वक्ता तूं होसी ॥१॥

शास्त्रें लाहोनि तुझी युक्ती । तुझी तुज प्रतिपादिती ।

ते परोक्षवादें थोंटावती । श्रुति ’नेति नेति’ परतल्या ॥२॥

त्या तुझे मुखींच्या ज्ञानोक्ती । कृपेनें ऐकोनि कृपामूर्ती ।

श्रवणाचें भाग्य वानूं किती । जे ऐकती ते धन्य ॥३॥

ऐसऐशिया अतियुक्तीं । उद्धवें प्रार्थिला श्रीपती ।

हात जोडूनि परम प्रीतीं । म्हणे विनंती अवधारीं ॥४॥

स्वामी बोलती अतिअगाध । हें बोलणें परम शुद्ध ।

माझे बुद्धीसी नव्हे बोध । पराचे अपराध कोण साहे ॥५॥

सोसावे पराचे अपराध । तेंही कठिणत्वें अतिविरुद्ध ।

हा दुःसह महाबोध । कैसेनी द्वंद्व साहवे ॥६॥

उत्तमें केलिया अपराधा । कोटींमाजीं साहे एकादा ।

परी नीचाची विरुद्ध बाधा । कोणीही कदा न साहे ॥७॥

ज्याचें न व्हावें दर्शन । ज्यासी करुं नये नमन ।

त्याचे मस्तकीं वाजतां चरण । साहेल कोण गोविंदा ॥८॥

ज्याचा निःशेष जाय प्राण । तोचि साहे हें कठिण ।

जो होय सचेतन । त्यासी सर्वथा जाण न साहवे ॥९॥

इतरांची कायसी कथा । सज्ञान जे कां तत्त्वतां ।

तेही अतिक्रमू न साहती अल्पतां । मा अपमानता कोण साहे ॥७१०॥

क्रोध जाहला कपिलमहामुनीसी । तेणें भस्म केलें सगरांसी ।

नारदें कुबेरपुत्रांसी । वृक्षत्वासी आणिलें ॥११॥

दुर्वासाची सांगतां गोठी । त्याची कथा आहे मोठी ।

कोप आला शृंगीचे पोटीं । मेल्या सर्पासाठीं शापिलें ॥१२॥

मुख्यत्वें शांति सनकादिकांसी । द्वारीं आडकाठी केली त्यांसी ।

वैकुंठीं क्षोभूनि आवेशीं । जयविजयांसी शापिलें ॥१३॥

सज्ञानाची ऐशी स्थिती । मा इतरांची कोण गणती ।

परापराधसहनशांती । दुर्लभ त्रिजगतीं गोविंदा ॥१४॥

प्रकृति निजगुणीं सबळ । ते अल्पें क्षोभवीं तत्काळ ।

साधु सज्जन केवळ । करी विकळ अशांती ॥१५॥

ज्यासी तुझी पूर्ण भक्ति घडे । ज्यासी तुझी पूर्ण कृपा जोडे ।

जो तुझे चरणीं अखंड जडे । त्यासी घडे हे शांती ॥१६॥

तूं विश्वात्मा त्रिजगतीं । चोरी न चले तुजप्रती ।

मज हीं द्वंद्वें न साहवती । तूंही श्रीपती जाणसी ॥१७॥

परम पावन निजशांती । अतिनिंद्य ते अशांती ।

ऐसें व्याख्यान जे ज्ञाते करिती । तेही न साहती द्वंद्वांतें ॥१८॥

द्वंद्वें दुःसह सर्वार्थी । तेथें माझा पाड किती ।

एवं द्वंद्वसहिष्णुतेची युक्ती । मज कृपामूर्ति सांगावी ॥१९॥

सकल साधनें वश्य होती । परी हे सहिष्णुता न ये चित्तीं ।

ते मी लाभें निजशांती । ऐशी कृपा निश्चितीं करावी ॥७२०॥

मी शांतीचें लाभें कल्याण । ऐशी कृपा करावी परिपूर्ण ।

म्हणोनि धरिले श्रीचरण । उद्धवें आपण निजभावें ॥२१॥;

ऐकोनि उद्धवाची विनंती । संतोषला कृपामूर्ती ।

जेवीं चातकाचिया तृषार्ती । गर्जोनि त्रिजगती निववी मेघ ॥२२॥

तेवीं भक्तवचनासरिसा । उल्हासला कृष्ण कैसा ।

उद्धवाचिया निजमानसा । शांतीचा ठसा घालील ॥२३॥

उद्धवप्रश्नाचें प्रत्युत्तर । उदार सुंदर गुणगंभीर ।

उघडोनि शांतीचें भांडार । स्वयें शाङर्गधर सांगेल ॥२४॥

नवल सांगती ते टेव । युक्तिचातुर्यवैभव ।

निजशांतीस पडे खेंव । ऐसें अपूर्व सांगेल ॥२५॥

श्रीकृष्णमुखींच्या ज्ञानोक्ती । ऐकतां स्वयंभ प्रकटे शांती ।

ते ऐकावया उद्धव चित्तीं । जाहला निश्चितीं सावध ॥२६॥

जेवीं गजग्रहणाविखीं पंचानन । साटोप धरी आपण ।

तेवीं शांति साधावया जाण । सावधान उद्धव ॥२७॥

जळीं तळपतांचि मासा । कवडा झेलूनि ने आकाशा ।

तेवीं शांतिचिया आमिषा । उद्धव तैसा तळपत ॥२८॥

तें भिक्षुगीतनिरुपण । पुढिले अध्यायीं श्रीकृष्ण ।

निजशांति बाणे संपूर्ण । तेंचि लक्षण सांगेल ॥२९॥

ज्यांसी परमार्थाची चाड । तिंहीं सांडूनि साधनकवाड ।

शांतिसाधनीं श्रद्धा वाड । अतिदृढ राखावी ॥७३०॥

श्रीकृष्ण सांगेल शांति पूर्ण । उद्धव तया अर्थी सावधान ।

एका विनवी जनार्दन । श्रोतां अवधान मज द्यावें ॥७३१॥

इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे

एकाकारटीकायां द्वाविंशतितमोऽध्यायः ॥२२॥

बाविसावा अध्याय समाप्त

॥श्रीः॥

॥ ॐ तत्सत् - श्रीकृष्ण प्रसन्न ॥