श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ६ वा

अवन्तिषु द्विजः कश्चिदासीदाढयतमः श्रिया ।

वार्तावृत्तिः कदर्यस्तु कामी लुब्धोऽतिकोपनः ॥६॥

मालवदेशीं अवंतिनगरीं । तेथ ब्राह्मण वसे गृहद्वारीं ।

कृषिवाणिज्यवृत्तीवरी । जीविका करी निरंतर ॥७७॥

गांठीं धनधान्यसमृद्धी । अमर्याद द्रव्यसिद्धी ।

परी अतिशयें कृपणबुद्धी । पोटाही त्रिशुद्धी न खाय ॥७८॥

पोटा सदा खाय कदन्न । तेंही नाहीं उदरपूर्ण ।

तेथ स्त्रीपुत्रादि दासीजन । जठरतर्पण न पावती ॥७९॥

न करी नित्यनैमित्य । स्वप्नीं नेणे धर्मकृत्य ।

देव ब्राह्मण अतिथी तेथ । सदा जात पराङमुख ॥८०॥

कवडी एक लाभू पाहे । तैं मातापित्यांचें श्राद्ध आहे ।

तें सांडूनि अंत्यजगृहा जाये । न मनी भये स्पर्शाचें ॥८१॥

मी उत्तम हा हीनवर्ण । हे धनलोभें गिळी आठवण ।

हाता येतां देखोनि धन । स्वीकारी अन्न पतिताचें ॥८२॥

धनकामासाठीं देख । न मनी पाप महादोख ।

कवडीच्या लोभें केला मूर्ख । नाठवे नरकमहापातू ॥८३॥

यापरी तो कर्मभ्रष्ट । अकर्म करी क्रियानष्ट ।

अतिवंचक महाशठ । केवळ नष्ट धनलोभी ॥८४॥

त्या धनलाभाचा अवरोधू । होतां देखोनि खवळे क्रोधू ।

गोहत्यादि ब्रह्मवधू । करावया सिद्ध स्वयें होय ॥८५॥

धनकामीं क्रोधाची वस्ती । धनापाशीं पापें असती ।

धनलोभीं ज्यासी स्थिती । कदर्युवृत्ति त्या नांव ॥८६॥

ऐसें धन सांचिलें फाडोवाडें । त्याचाही व्यय जैं करणें पडे ।

तैं प्राणांतचि येऊनि घडे । विचार पुढें असेना ॥८७॥

वानराचे गालींचे चणे । हाता न येती जितां प्राणें ।

तैसा द्रव्याचा व्ययो करणें । तेंचि मरणें कदर्या ॥८८॥