श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १२ वा

स एवं द्रविणे नष्टे धर्मकामविवर्जितः ।

उपेक्षितश्च स्वजनैश्चिन्तामाप दुरत्ययाम् ॥१२॥

गेलें शेत निमाली कुळवाडी । घर पाडिलें परचक्रधाडीं ।

धन नासलें नाहीं कवडी । अधर्माचे जोडी हे दशा ॥१४०॥

नाहीं स्वधर्मकर्म ना दान । विहित भोग न करी आपण ।

त्या धनलोभ्याचें नासलें धन । जेवीं कां स्वप्न रंकाचें ॥४१॥

दैव झालें पराङ्‌मुख । त्या हतभाग्याची दशा देख ।

स्त्रीपुत्रें झालीं विमुख । तिंहीं निःशेख दवडिला ॥४२॥

ऐक धनलोभाच्या ठायीं । इष्ट मित्र पूर्वीचि नाहीं ।

गोत्रजांसी त्याचें सुख कायी । दवडिला पाहीं उपेक्षितू ॥४३॥

निंदा प्रत्यक्ष करिती लोक । रांडा पोरें थुंकती देख ।

खावया नाहीं निःशेख । मागतां भीक मिळेना ॥४४॥

भिकेलागीं जेथ जेथ गेला । म्हणती काळमुखा येथें कां आला ।

होता धनलोभें भुलला । भला नागविला ईश्वरें ॥४५॥

यापरी धिक्कारिती लोक । धन जाऊनि झाला रंक ।

चिंतावतीं पडला देख । दुःखें महादुःख पावला ॥४६॥;