श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १६ वा

यशो यशस्विनां शुद्धं श्लाघ्या ये गुणिनां गुणाः ।

लोभः स्वल्पोऽति तान् हन्ति श्वित्रो रुपमिवेप्सितम् ॥१६॥

रणीं पडतां मुख्य धुरेसी । जो अंगें विभांडी त्या रणीसी ।

खांदीं वाऊनि आणी रायासी । येवढी कीर्ति ज्यासी जोडली ॥१८०॥

लोभ संचरोनि त्यापाशीं । एक शेत मागवी रायासी ।

तेचि अपकीर्ति होय त्यासी । जग उपहासी मूर्खत्वा ॥८१॥

त्यासी न मागतां राजा जाण । करुं पाहे आपणासमान ।

त्यासी लोभें आणोनि नागवण । मूर्खपण स्थापिलें ॥८२॥

स्वयें करितां कन्यादान । सकळ कुळ होय पावन ।

तेथेंही लोभें घेतां धन । अधःपतन धनलोभिया ॥८३॥

दाता देऊनियां दान । दानप्रसंगें उपार्जी धन ।

तेंचि दात्यासी दूषण । लोभ लांछन दानासी ॥८४॥

वेदशास्त्रें करुनि पठण । पंडित झाले अतिसज्ञान ।

तेही धनलोभें छळिले जाण । ज्ञानाभिमान प्रतिष्ठे ॥८५॥

देहप्रतिष्ठेचिये सिद्धी । पंडित-पंडितां वादविधी ।

नाना छळणोक्ती विरोधीं । ठकिले त्रिशुद्धी ज्ञाते लोभें ॥८६॥

सविवेक सज्ञान ज्ञात्यासी । लोभ आणी निंदास्पदासी ।

इतरांची गति काइसी । ते लोभाची दासी होऊनि ठाती ॥८७॥

लोभ शुद्धीसी करी अशुद्ध । लोभ तेथ निंदास्पद ।

तोचि दृष्टांत विशद । ऐक प्रसिद्ध सांगत ॥८८॥

कुलशील अतिसुकुमार । रुपें सर्वांगमनोहर ।

नाकीं श्वेतता अणुमात्र । निंद्य सुंदर तेणें होय ॥८९॥

तेवीं अल्पही लोभाची जे वस्ती । नाशी गुणौदार्ययशःकीर्ती ।

लोभाऐसा त्रिजगतीं । कर्ता अपकीर्ती आन नाहीं ॥१९०॥

धनलोभीं सदा विराधू । धनलोभ तोडी सखे बंधू ।

धनलोभाऐसा नाहीं बाधू । अतिअशुद्धू आणिक असेना ॥९१॥