श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २९ वा

सोऽहं कालावशेषेण शोषयिष्येऽङगमात्मनः ।

अप्रमत्तोऽखिलस्वार्थे यदि स्यात्सिद्ध आत्मनि ॥२९॥

काइसा भवभयाचा पाड । घेईन कोटि जन्मांचा सूड ।

नासल्या आयुष्याचा कैवाड । करीन निवाड येणें देहें ॥५७॥

देहासी आली वार्धक्यता । परी वृद्धत्व नव्हे माझिया चित्ता ।

तेणें चित्तें चिंतूनि भगवंता । भवबंध आतां छेदीन ॥५८॥

उरले आयुष्यें येथ । कळिकाळाचे पाडीन दांत ।

गर्भदुःखाचें खणोनि खत । मरणाचा घात मी करीन ॥५९॥

जेणें देहें सत्यानृत । कर्में आचरलों समस्त ।

तें देह मी शोषीन येथ । विदेहस्थ निजभावें ॥४६०॥

घालूनि निजबोधाची धाडी । फोडीन देहाची बांदवडी ।

तोडूनि सुखदुःखांची बेडी । उभवीन गुढी सायुज्याची ॥६१॥

आजी वैराग्यविवेकयुक्त । मी निजस्वार्थी सावचित्त ।

जो जो साधीन परमार्थ । तो तो हस्तगत मज होय ॥६२॥

मजचि साधे निजस्वार्थ । हाचि नेम नाहीं येथ ।

जो जो वैराग्यविवेकयुक्त । त्यासी परमार्थ आंदणा ॥६३॥

वैराग्यविवेकाचें लक्षण । देहगेहस्त्रियादि धन ।

असतां आसक्त नव्हे मन । वैराग्य पूर्ण या नांव ॥६४॥

म्यां जो आरंभ केला पहा हो । यासी देवोदेवीसमुदावो ।

येणेंसहित देवाधिदेवो । मज साह्य होवो हें प्रार्थित ॥६५॥;