श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


आरंभ

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो जी गुणातीता । व्यक्तिरहिता अव्यक्ता ।

तुजमाजीं नाहीं द्वैतकथा । अद्वैततारहिवासी ॥१॥

तुझा अद्वैत निजनिर्वाहो । तेथ नाहीं देवी देवो ।

उदय-अस्तांचा अभावो । रविचंद्रांसी ठावो असेना ॥२॥

तेथ सशब्द हारपला वेदू । बुद्धीसी मिथ्या बोधू ।

तिळभरी नाहीं भेदू । अद्वयानंदू एकला ॥३॥

ऐसिया अद्वैतपणीं । प्रकृतिपुरुषांची कहाणी ।

सांगिजे केवळ अज्ञानीं । ज्ञातेपणीं चातुर्यें ॥४॥

जेथ मीतूंपणा नाहीं ठावो । तेथ प्रकृतिपुरुषां केवीं निर्वाहो ।

ज्याचा नाहीं गर्भसंभवो । त्याचें जातक पहा हो वर्तविती ॥५॥

जें जन्मलेंचि नाहीं । त्याचें श्राद्ध करावें कायी ।

हें ज्ञात्यासी पुसतां पाहीं । ठेवितां ठायीं ठाकेना ॥६॥

वांझेच्या पुत्राचा विवाहो । समारंभ चला पहा हो ।

नेणा साच जाणा वावो । तैसा निर्वाहो प्रकृतिपुरुषां ॥७॥

ऐसें नसतेंचि नाथिलें । साचाचे परी नांदविलें ।

एकीं अनेकत्व दाविलें । एकपण संचलें न मोडतां ॥८॥

ऐसा एकपणें एकुलता । तोचि आपण आपली झाला कांता ।

आपुले कांतेचा आपण भर्ता । अतिलाघवता अतर्क्य ॥९॥

जेवीं अर्धनारीनटेश्र्वरीं । जो पुरुष तोचि नारी ।

तेवीं प्रकृति पुरुष संसारीं । एकाकारीं नांदत ॥१०॥

तो पुरुष ते पतिव्रता । दोघां अनन्य प्रीति एकात्मता ।

येरयेरां वेगळीकता । पाऊल सर्वथा न घालिती ॥११॥

दोघां एकत्र सदा असणें । दोघांसी एकचि नेसणें ।

दोघां एके सत्ता बैसणें । दोघे एकचि प्राणें वर्तती ॥१२॥

दोघां एकचि देखणें । दोघां एकचि चाखणें ।

दोघां एकचि बोलणें । दोघां करणें एकचि ॥१३॥

कैशी दोघां प्रीति अलोलिक । येरयेरांवीण न घेती विख ।

येरयेरांवीण न चाखिती उदक । येरयेरेंवीण देख आंधळीं ॥१४॥

नवल बाइलेचें करणें । नपुंसका पुरुषत्व इणें देणें ।

मग तिचेनि अधीनपणें । पुरुषें नांदणें सर्वदा ॥१५॥

मग हा तिचेनि डोळां देखे । मग हा तिचेनि बोले मुखें ।

तिचेनि भोगी हा सुखदुःखें । बंधमोक्ष चाखे तिचेनि ॥१६॥

तिचेनि म्हणवी मी ब्रह्म । तिचेनि करी हा कर्माकर्म ।

तिचेनि भोगी हा मरणजन्म । धर्माधर्मविभागें ॥१७॥

तिचेनि यासी पाप घडे । तिचेनि यासी पुण्य जोडे ।

तिचेनि हा महत्त्वा चढे । तिचेनि पडे अधःपातीं ॥१८॥

एथवरी अतिप्रीतीं । वाढविली निजप्रकृती ।

प्रकृति पातिव्रत्यस्थिती । वश्य निजपती तियें केला ॥१९॥

नवल दोघांची सोयरिकी । दोघीं भावंडें होतीं सखीं ।

तो बाप ते त्याची लेंकी । पाहतां विवेकीं तो पुत्र तिचा ॥२०॥

यापरी अगम्यागमन । तिंहीं दोघीं करुनि जाण ।

वाढविले अनेक जन । तिसरेपण नातळतां ॥२१॥

ऐसा अव्यभिचारी व्यभिचारु । करुनि वाढविला संसारु ।

तो अतिअतर्क्य अगोचरु । अगम्य दुर्धरु शिवादिकां ॥२२॥

हा निजशक्तिप्रकृतिमेळें । भोगी शिवत्वाचे सोहळे ।

प्रिया न देखतां तात्काळें । सांडी सगळें शिवत्व ॥२३॥

ज्यासी गांवठाव ना जीवमेळ । रुपनांव ना काळवेळ ।

ऐसाही प्रकृती केवळ । केला सबळ निजगुणीं ॥२४॥

प्रकृती निजगुणास्त्व । निजभर्ता केला सावेव ।

वर्ण व्यक्ति रुप नांव । नाना वैभवविलासें ॥२५॥

तंव पूर्णत्व लोपोनियां शिवें । अंगावरी वाढविलें शांभवें ।

येरी पतिव्रता आहेवें । रुपें नांवें शिव पूजी ॥२६॥

दोघांपासूनि झालें जग । परी न दिसे तिसरा भाग ।

न तुटे अनन्यमिळणीयोग । भिन्न विभाग दाखवितां ॥२७॥

त्रैलोक्य पाहतां साङग । न दिसे तिसरें अंग ।

दोघीं दुमदुमीत जग । भरलें चांग दुबंधीं ॥२८॥

दोघांची अतिप्रीति ऐशी । अनन्यमिळणी अनन्यासी ।

दोघें अणूमाजीं सावकाशीं । निजरहिवासी नांदत ॥२९॥

पतीवीण ते पतिव्रता । सगळीचि विरे सर्वथा ।

प्रियेवीण असतचि नसता । होय कांहीं नव्हतां भर्तारु ॥३०॥;

शिव निःसंग जो पैं सदा । क्रियाकरणेंवीण नुसधा ।

त्यासीही अतिप्रीतीं निजप्रमदा । सुखदुःखबाधा भोगवी ॥३१॥

यापरी निजनोवरा । प्रकृती गोविंला घरचारा ।

मग घरवातेचा थारा । त्याच्याचि शरीरावरी केला ॥३२॥

प्रकृति पतिव्रता अवंचक । कर्माकर्मीं शिणोनि अनेक ।

सुखदुःखांची परवडी देख । अर्पी आवश्यक निजकांता ॥३३॥

नवल तें मीं सांगावें काये । स्त्री जोडी तें पुरुष खाये ।

तियेवीण तो पाहें । कंहीं न लाहे कवडाही ॥३४॥

प्रकृति पतिव्रताशिरोमणी । कांत वश्य करोनि निजगुणीं ।

वासना सूक्ष्म सेवया अनुदिनीं । भोगवी सुगरणी भर्ताराकरवीं ॥३५॥

तेथ प्रकृतीचेनि गदारोळें । भवाब्धीं जलक्रीडा खेळे ।

प्रकृति पुरुषातें बुडवी बळें । पुरुष एकें काळें प्रकृति बुडवी ॥३६॥

ऐशा प्रकृतीच्या संगाआंत । पुरुषास लाविलें पंचभूत ।

जन्ममरणांच्या बुडया देत । अवस्थाभूत होऊनि ॥३७॥

ऐसा प्रकृतिचिया भिडा । पुरुष केवळ झाला वेडा ।

निजत्व विसरोनि बापुडा । केला गाढा अतिदीन ॥३८॥

ऐसा विसरोनि पूर्णत्वासी । जीवशिवद्वंद्वें स्वयें सोशी ।

त्यासी न्यावया निजत्वासी । गुणिया पूर्णांशीं गुरुरावो ॥३९॥

ज्याचे वचनमात्रें पहा वो । जीवाचा हारपे जीवभावो ।

शिवा शिवपदीं ठावो । ज्याचा वचनगौरवो नांदवी ॥४०॥

ज्याची भावार्थें ऐकतां गोठी । अहंकारु निमे उठाउठी ।

जन्ममरणांसी पडे तुटी । न दिसे दृष्टीं भवभय ॥४१॥

ज्याचिया कृपादृष्टीपुढें । जीवशिवांचें फिटे बिरडें ।

माया मिथ्यात्वें समूळ उडे । पूर्णत्वाचें उघडे भांडार ॥४२॥

शिवू भुलविला शिवत्वासी । यावया तो निजपदासी ।

आज्ञा जैं पुसे सद्गुरुसी । तैंचि शिवासी शिवत्व ॥४३॥;

एवढी महिमा सद्गुरुसी । वचनें केवीं वानूं त्यासी ।

तंव वानिते वाणीनें वानावयासी । वदवी वाचेसी गुरुरावो ॥४४॥

तेथ एक मी वानिता । हें कोणें घ्यावें आपुले माथां ।

गुरुनें हरितली अहंता । तेथ मी एक कर्ता घडे केवीं ॥४५॥

तेथ मीपणें घ्यावी अहंता । तंव गुरुचि मीपणाआंतौता ।

गुरुवेगळा ठाव नाहीं रिता । मीपणाचे माथां गुरुरावो ॥४६॥

माझें जें कां मीपण । तें सद्गुरु झाला आपण ।

तेव्हां रुप एक नांवें भिन्न । एका जनार्दन एकत्वें ॥४७॥

अवघा जनार्दनचि देखा । तोचि उपनांवें झाला एका ।

तेणें नामें श्रीभागवत देखा । देशभाखा अर्थवी ॥४८॥;

तेविसावे अध्यायाचे अंतीं । देवो बोलिला उद्धवाप्रती ।

द्वंद्वभोगांची निजप्राप्ती । साहावी शांती धरोनि ॥४९॥

ज्यांसी बाणली अढळ शांती । ते मज अजितातें जिंकिती ।

तेचि साचार परमार्थीं । स्वमुखें श्रीपती बोलिला ॥५०॥

तें ऐकोन कृष्णवचन । उद्धवाचें दचकलें मन ।

द्वंद्वसहिष्णुता अतिकठिण । कैसेनि आपण साहावी ॥५१॥

द्वंद्वसहिष्णुतासाधन । पुसतां उबगेल श्रीकृष्ण ।

ऐशिया भिडा उद्धव पूर्ण । धरोनि मौन राहिला ॥५२॥

तो उद्धवाचा अभिप्रावो । जाणोनियां देवाधिदेवो ।

द्वंद्वसहिष्णुताउपावो । समूळ पहा वो सांगत ॥५३॥

अद्वयत्वें परिपूर्ण । प्रकृतीहूनि पुरुष भिन्न ।

हें आकळल्या निजज्ञान । द्वंद्वबंधन बाधीना ॥५४॥

द्वंद्वें जिणावया पूर्ण । प्रकृतिपुरुषविवंचन ।

उद्धवें न करितां प्रश्न । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥५५॥

भक्तअंतरींचें जाणता । यालागीं अंतर्यामी तत्त्वतां ।

तो निजभक्तांचिया स्वार्था । पूर्ण परमार्था सांगत ॥५६॥

निजभक्तांचें मनोगत । जाणोनियां श्रीकृष्णनाथ ।

करावया भक्तहित । कृपेनें सांगत कृपाळू ॥५७॥

जगीं धन्य भाग्य उद्धवाचें । कृष्ण दैवत तिहीं लोकींचें ।

कृपा वोरसोनियां साचें । प्रकृतिपुरुषांचें निज सांगे ॥५८॥

आशंकेचें निरुपण । उद्धवें न सांगतांही जाण ।

तें जाणोनियां श्रीकृष्ण । कृपा निरुपण निरुपी ॥५९॥

कृष्ण म्हणे ज्यासी तारीन । तो पाहिलाचि तरला जाण ।

करावया जगाचें उद्धरण । कृपें श्रीकृष्ण बोलत ॥६०॥

धेनु वत्साचेनि लोभें । जेवीं घरापुरतें दुभे ।

तेवीं उद्धवाचेनि वालभें । जग पद्मनाभें उद्धरिलें ॥६१॥;