श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ८ वा

अर्थस्तन्मात्रिकाज्जज्ञे तामसादिन्द्रियाणि च ।

तैजसाद्देवता आसन्नेकादश च वैकृतात् ॥८॥

विषय तेचि महाभूतें । तामस प्रसवला अपंचीकृतें ।

विषयास्तव प्रकटती भूतें । ऐक तूतें सांगेन ॥२३॥

शब्दापासाव नभ उद्भवत । स्पर्शापासाव मारुत ।

रुपापासाव तेज होत । रसास्तव येथ आप उपजे ॥२४॥

गंधापासोनि पृथ्वी कठिण । उपजली आपीं आपण ।

येरयेरांचें अनुस्यूतपण । सर्वथा जाण मोडेना ॥२५॥

शब्द निःशब्दीं जन्मला । तो आकाशातें प्रसवला ।

आकाशीं सूक्ष्म स्पर्श झाला । तो स्पर्श व्याला मारुत ॥२६॥

जन्मल्या मारुताआंत । शब्द स्पर्श दोनी नांदत ।

मारुत रुपातें प्रसवत । त्या रुपांत तेज जन्मलें ॥२७॥

त्या जन्मल्या तेजाआंत । शब्द स्पर्श रुप नांदत ।

रुप रसातें प्रसवत । आप रसांत जन्मलें ॥२८॥

जन्मले आपीं समरस । शब्द स्पर्श रुप रस ।

नांदताती सावकाश । विषयीं विषयांस प्रवेशू ॥२९॥

आपामाजीं जन्मे गंध । गंधापासाव पृथ्वी शुद्ध ।

शब्द स्पर्श रुप रस गंध । पृथ्वी पंचविध विषययुक्त ॥१३०॥

विषययुक्त अपंचीकृतें । पूर्वी लीन होतीं समस्तें ।

तींचि स्थूळावलीं येथें । महाभूतें प्रसिद्ध ॥३१॥

ज्ञान कर्म उभयपंचक । श्रोत्रादि इंद्रियदशक ।

राजसापासोनि देख । स्वाभाविक जन्मलीं ॥३२॥

सत्त्वअहंतेचा विकार । चित्तचतुष्टय चमत्कार ।

मन बुद्धि चित्त अहंकार । अकराही सुर इंद्रियाधिप ॥३३॥

महाभूतें अतिजडें देख । इंद्रियें तेथें प्रवर्तक ।

अंतःकरणचाळक । देव प्रकाशक कर्माचे ॥३४॥

त्रिविध अहंकारवृत्ती । गुणमोक्षें क्षोभक शक्ती ।

यापरी झाली उत्पत्ती । ब्रह्मांडस्थितीलागूनी ॥३५॥;