श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २० वा

सर्गः प्रवर्तते तात्वत्पौर्वापर्येण नित्यशः ।

महान् गुणविसर्गार्थः स्थित्यन्तो यावदीक्षणम् ॥२०॥

महान् म्हणिजे अतिथोरु । पितृपुत्रप्रवाहें संसारु ।

अनवच्छिन्न निरंतरु । अतिदुर्धरु वाढला ॥४९०॥

अतिशयेंसीं दुर्धरु । कैसेनि वाढला संसारु ।

तेही अर्थींचा विचारु । शार्डगधरु सांगत ॥९१॥

विषयांचिये आसक्ती । वासनानिष्ठ झाली वृत्ती ।

ते देहात्मता अतिप्रीतीं । संसारस्थिती वाढवी ॥९२॥

खवळला जो देहाभिमान । तो शुद्धासी लावी जीवपण ।

नाना योनीं जन्ममरण । विशेषें जाण वाढवी ॥९३॥

ऐसेन अतिदुर्धरु । स्त्रष्टेन सृजिला संसारु ।

तो ब्रह्मायूपर्यंत स्थिरु । ब्रह्मप्रळयीं संहारु सृष्टीचा ॥९४॥

एक नित्यप्रळयो लागला आहे । एक दैनदिन प्रळयो पाहें ।

कर्मजन्य प्रळयो लाहे । एक तो होये अवांतर प्रळयो ॥९५॥

सकळ प्रळयांच्या शिरीं । ब्रह्मप्रळयाची थोरी ।

तो सकळ सृष्टीतें संहारी । कांहीं संसारीं उरों नेदी ॥९६॥

ब्रह्मप्रळयीं नाश सृष्टीसी । पुढती रचावया कल्पादीसी ।

उंच नीच नाना योनींसी । नव्या करावयासी कारण काय ॥९७॥

ब्रह्मप्रळयीं सृष्टीचा र्‍हासू । परी निःशेष नव्हेचि नाशू ।

उरे वासनाबीजविलासू । सुलीन रहिवासू अविद्येअंगीं ॥९८॥

तेचि बीजें कल्पादि जाण । मीचि स्त्रष्टृरुपें आपण ।

मज म्यां अनुग्रहूनि पूर्ण । सूक्ष्म कारण लक्षविलें ॥९९॥

जेवीं वर्षाकाळीं नाना तृणें । वाढूनि शरत्काळीं होती पूर्णें ।

तींच उष्ण काळीं बीजकणें । होती सुलीनें पृथ्वीसी ॥५००॥

सुलीन बीजें पूर्ण क्षितीं । परी तीं कोणा व्यक्ती न येती ।

तेवीं वासनाबीजें प्रळयांतीं । उरे अव्यक्तीं संसारु ॥१॥

जेवीं काळीं वरुषलेनि घनें । बीजें विरुढती सत्राणें ।

वाढती नाना जातींचीं तृणें । पूर्वलक्षणें यथास्थित ॥२॥

तेवीं उत्पत्तिकाळावरी । सूक्ष्मवासना बीजांकुरीं ।

नाना योनी चराचरीं । जंगमस्थावरीं जग वाढे ॥३॥

ब्रह्माचे प्रळयाआंतू । निःशेष सृष्टीचा नव्हे अंतू ।

यालागीं संसारीं अनंतू । वेदशास्त्रार्थू प्रतिपादी ॥४॥

ऐसा संसार अनंतू । याचा निःशेष होय अंतू ।

तेचि अर्थी श्रीकृष्णनाथू । श्लोकींचा पदार्थू बोलिला ॥५॥

’स्थित्यन्तो यावदीक्षणम्‌’ । येणें पदें श्रीकृष्ण ।

अत्यंत प्रळयींचें लक्षण । सूत्रप्राय जाण बोलिला ॥६॥

’ईक्षण’ या पदाचा अर्थ जाण । सद्गुरुकृपादृष्टि पूर्ण ।

तेंचि माझें कृपावलोकन । जेणें ब्रह्मज्ञान प्रकाशे ॥७॥

पूर्ण प्रकाशल्या ब्रह्मज्ञान । संसार झाला नाहींच जाण ।

वस्तु वस्तुत्वें परिपूर्ण । मीतूंपण असेना ॥८॥

तेथ ध्रुवमंडळीची ठेली मात । वैकुंठकैलासा झाला प्रांत ।

शेषशायीचाही अंत । ब्रह्मज्ञानांत होऊं सरला ॥९॥

हारपलें मीतूंपण । उडालें देव-भक्त भजन ।

बुडालें साकारतेचें भान । ब्रह्म सनातन सदोदित ॥५१०॥

प्रपंच एक झाला होता । हे समूळ मिथ्या वार्ता ।

पुढें होईल मागुता । कदा कल्पांता घडेना ॥११॥

हें अत्यंत प्रळयाचें लक्षण । भाग्येंवीण न पाविजे जाण ।

ज्यासी साचार सद्गुरुचरण । ते सभाग्य जन पावती ॥१२॥

अत्यंत प्रळयींची गती । न घडे गा समरतांप्रती ।

हे परम निर्वाणगती । जाण निश्चितीं उद्धवा ॥१३॥

ज्याची अहंममता खुंटे । त्याची निःशेष कल्पना तुटे ।

अत्यंत प्रळयो त्यासीच भेटे । नेटेंपाटें निजात्मता ॥१४॥

देह पडलिया प्रळयो घडे । हें बोलणें सर्वथा कुडें ।

जितांचि हा प्रळयो जोडे । वाडेंकोडें निजनिष्ठा ॥१५॥

जितांचि हा प्रळयो जाण । येणें संसारबीजदहन ।

आतां ब्रह्मप्रळयलक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥१६॥

ब्रह्मांडप्रळयाचा अनुक्रम । तेथ अंतीं उरे पूर्ण ब्रह्म ।

हें उद्धवें जाणावया वर्म । पुरुषोत्तम बोलत ॥१७॥;