श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २४ वा

रुपं वायौ स च स्पर्शे लीयते सोऽपि चाम्बरे ।

अम्बरं शब्दतन्मात्र इन्द्रियाणि स्वयोनिषु ॥२४॥

तेजाचें जें उरे रुप । तें वायु शोषूनि करी अरुप ।

तेव्हां वायूचि एकरुप । अतिअमूप कोंदाटे ॥३६॥

कोंदाटल्या वायूसी । गगन जेथींचें तेथें ग्रासी ।

तेव्हां वायु प्रवेशे स्पर्शी । तो उरे अवशेषीं स्पर्शमात्र ॥३७॥

उरल्या वायूच्या स्पर्शासी । लयो तत्काळ होय आकाशीं ।

आकाश प्रवेशे शब्दासी । उरे अवशेषीं शब्दतन्मात्र ॥३८॥

दशेंद्रियांची मंडळी । राजसापासोनि जन्मली ।

ते निजगुणीं सामावली । जेवीं पंचांगुळी मुष्टीमाजीं ॥३९॥;