श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २८ वा

एवमन्वीक्षमाणस्य कथं वैकल्पिको भ्रमः ।

मनसो हृदि तिष्ठेत व्योम्नीवार्कोदये तमः ॥२८॥

प्रकृति-पुरुषविवंचन । आदि मध्य अवसान ।

तुज म्यां दाविलें एकपण । तेथ कां भिन्नपण कल्पिसी वायां ॥५८०॥

उत्पत्तिआदि ब्रह्म पूर्ण । उत्पत्तीसी तेंचि कारण ।

जग जन्मलें जें सगुण । तेंही ब्रह्मरुपें जाण दाविलें तुज ॥८१॥

आणि प्रळयाच्या अंतीं । ब्रह्मचि उरे निजस्थिती ।

तेही विखींची प्रतीती । तुज म्यां निश्चितीं दाविली ॥८२॥;

प्रकृतीहूनि पुरुष भिन्न । प्रकृति स्वातंत्र्यें मिथ्या जाण ।

ऐसें प्रकृतिपुरुष ज्यासी ज्ञान । त्यासी मीतूंपण भासेना ॥८३॥;

जेथ नाहीं मीतूंपण । तेथ विकल्प कल्पी कोण ।

आद्यंतीं वस्तु पूर्ण । हें विवेकज्ञान जयासी ॥८४॥

जो विवेक पुरुषप्रक्रृती । सांख्य जागे ज्याचे चित्तीं ।

त्यासी विकल्पाची प्राप्ती । नव्हे कल्पांतीं उद्धवा ॥८५॥

सांख्यविवेकगभस्ती । पूर्ण उगवला ज्याचे चित्तीं ।

तेथ विकल्पाची अंधारी राती । कैशा रीतीं उरेल ॥८६॥

ज्यासी पटुतर सांख्यज्ञान । विकल्प विसरे त्याचें मन ।

हृदयीं उगवे चिद्भान । अज्ञाननिशा पूर्ण निरसूनी ॥८७॥;

जेथ निरसलें अज्ञान । तेथ विकल्पाचें कैंचें स्थान ।

यापरी सांख्यज्ञान । साधकां पूर्ण उपकारी ॥८८॥

जें साराचें निजसार । जें गुह्यज्ञानभांडार ।

जें कां विवेकरत्‍नाकर । तें सांख्य साचार उद्धवा ॥८९॥