श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


आरंभ

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो देव निर्गुण । म्हणों पाहें तंव न देखें गुण ।

गुणेंवीण निर्गुणपण । सर्वथा जाण घडेना ॥१॥

सर्वथा न घडे निर्गुणपण । तरी घडों नेदिशी सगुणपण ।

नातळशी गुणागुण । अगुणाचा पूर्ण गुरुराया ॥२॥

अगुणाच्या विपरीत तूं गुणी । करिसी त्रिगुणगुणां झाडणी ।

पंचभूतांपासूनी । सोडविता जनीं जनार्दनू ॥३॥

ज्याचेनि जनांसी अर्दन । ज्याचेनि लिंगदेहा मर्दन ।

जो जीवासी जीवें मारी पूर्ण । तो कृपाळु जनार्दन घडे केवीं ॥४॥

जनार्दनाचें कृपाळूपण । सर्वथा नेणती जन ।

नेणावया हेंचि कारण । जे देहाभिमान न सांडिती ॥५॥

जननीजठरीं जन्म जाण । त्या जन्मास्तव म्हणती जन ।

त्या जनजन्मा करी मर्दन । यालागीं जनार्दन नाम त्यासी ॥६॥

मरण मारुनि वाढवी जिणें । जीव मारुनि जीववणें ।

देहीं नांदवी विदेहपणें । ऐशी जनार्दनें कृपा कीजे ॥७॥

निजभावार्थें परिपूर्ण । एकाकी देखूनियां दीन ।

कृपा करी जनार्दन । कृपाळु पूर्ण दीनांचा ॥८॥

जे जे भावना भावी जन । ते ते पुरवी जनार्दन ।

जो मागे परम समाधान । त्याचा देहाभिमान निर्दळी ॥९॥

हो कां जनार्दनासमोर । कैं आला होता अहंकार ।

मा तेणें घेऊनियां शस्त्र । करी शतचूर निजांगें ॥१०॥

जेवीं सूर्याचेनि उजियेडें । अंधारेंसीं रात्री उडे ।

तेवीं जनार्दननामापुढें । अहंकार बापुडें उरे केवीं ॥११॥

ऐकतां गुरुनामाचा गजरु । समूळ विरे अहंकारु ।

येथ दुःखदायक संसारु । कैसेनि धीरु धरील ॥१२॥

ज्याचें नाम स्मरतां आवडीं । संसारबांदवडी फोडी ।

जीवाचे जीवबंध सोडी । नामाची गोडी लाजवी मोक्षा ॥१३॥

निजमोक्षाहीवरतें । ज्याचें नाम करी सरतें ।

त्याच्या कृपाळूपणातें । केवीं म्यां येथें सांगावें ॥१४॥

नामप्रतापा न करवे सीमा । त्या सद्गुरुचा निजमहिमा ।

कैशापरी आकळे आम्हां । काय निरुपमा उपमावें ॥१५॥

अगाध कीर्ति गुरुची गहन । गुण गुणितां अनंतगुण ।

काय घ्यावें त्याचें आपण । नित्य निर्गुण निजांगें ॥१६॥

धांव घेऊनि त्यापें जावों । तंव त्या नाहीं गांवठावो ।

त्याचे प्राप्तीसी न चले उपावो । एक सद्भावोवांचूनी ॥१७॥

सद्भावें स्मरतां नामासी । गुरु प्रकटे स्मरणापाशीं ।

जेवीं सागरु सैंधवासी । ये भेटीसी निजांगें ॥१८॥

सागरा देतां आलिंगन । जेवीं सैंधव होय जीवन ।

तेवीं वंदितां सद्गुरुचरण । मीतूंपण हारपे ॥१९॥

सद्गरुकृपा झालिया पूर्ण । जनचि होय जनार्दन ।

तेव्हां जन वन विजन । भिन्नाभिन्न भासेना ॥२०॥

जन तेंचि जनार्दन । जनार्दनचि सकळ जन ।

हेंचि उपनिषत्सार पूर्ण । हे निजखूण जनार्दनीं ॥२१॥;

येणेंचि अभिन्नार्थें येथ । सांख्य बोलिला भगवंत ।

उत्पत्ति-स्थिति-प्रळयांत । वस्तु सदोदित संपूर्ण ॥२२॥

सांख्य ऐकोनियां उद्धवो । विचारी आपुला अभिप्रावो ।

संसार वाढवी जो अहंभावो । तो अवश्य पहा हो सांडावा ॥२३॥

अहंकार जडला चित्ता । तो सांडितां न वचे सर्वथा ।

हें पुसों जरी श्रीकृष्णनाथा । तेणें सांख्य या अर्था निरुपिलें ॥२४॥

सकळ प्राप्तीचा अभिप्रावो । सांख्य अनुवादला देवो ।

अवश्य सांडावा अहंभावो । हेंचि पहा हो दृढ केलें ॥२५॥

माझेनि पराक्रमें तत्त्वतां । माझें मीपण न वचे सर्वथा ।

लाजिरवाणें कृष्णनाथा । किती आतां पुसावें ॥२६॥

ऐशी उद्धवाची चिंता । कळूं सरली श्रीकृष्णनाथा ।

बाप कृपाळु निजभक्तां । जेणें निवारे अहंता तें निजवर्म सांगे ॥२७॥

आजि उद्धवाचें भाग्य पूर्ण । जगीं उद्धवचि धन्य धन्य ।

ज्यासी संतुष्टला श्रीकृष्ण । न करितां प्रश्न निजगुह्य सांगे ॥२८॥

बाळक काय भूक सांगे । मग माता स्तन देऊं लागे ।

ते कळवळ्याचे पांगें । धांवोनि निजांगें स्तनपाना लावी ॥२९॥

त्याहूनि अतिआगळा । कृष्णीं उद्धवकळवळा ।

तो स्वभक्तांची भजनकळा । जाणोनि जिव्हाळा पोखित ॥३०॥

बाळक नेणे आपुली चिंता । परी माता प्रवर्ते त्याच्या हिता ।

तेवीं उद्धवाचे निजस्वार्था । श्रीकृष्णनाथा कळवळा ॥३१॥

त्या उद्धवाचें जें जें न्यून । तें तें करावया परिपूर्ण ।

प्रवर्तलासे श्रीकृष्ण । तो निजनिर्गुण उपदेशी ॥३२॥

पंचविसावे अध्यायीं जाण । सांगोनि गुणजयोलक्षण ।

लक्षवील निजनिर्गुण । हेंचि निरुपण निजनिष्ठा ॥३३॥

प्रकृतिपुरुषविवेक । झालियाही बुद्धिपूर्वक ।

जंव गुणजयो नाहीं निष्टंक । तंव वाढे सुखदुःख अहंभावो ॥३४॥

तिहीं गुणांस्तव देह झाला । देही गुणजयो न वचे केला ।

मूलउच्छेदू आपुला । न करवे वहिला कोणासी ॥३५॥

दांडा जन्मला वृक्षजातीसीं । तो मिळोनियां कुर्‍हाडीसीं ।

समूळ छेदवी वृक्षासी । तेवीं विवेकासीं सत्वगुण ॥३६॥

विवेका मीनल्या सत्वगुण । समूळ उच्छेदी तिनी गुण ।

सहजें प्रकटे निजनिर्गुण । तेव्हां गुणच्छेदन तें मिथ्या ॥३७॥

समूळ मिथ्या तिनी गुण । नित्य सत्य निजनिर्गुण ।

येचि अर्थीचें निरुपण । स्वमुखें श्रीकृष्ण सांगत ॥३८॥