श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १६ वा

यदा चित्तं प्रसीदेत इन्द्रियाणां च निर्वृतिः ।

देहेऽभयं मनोऽसङंग तत्सत्त्वं विद्धि मत्पदम् ॥१६॥

वाढलिया सत्वगुण । चित्त सदा सुप्रसन्न ।

कामक्रोधलोभाचें स्फुरण । सर्वथा जाण स्फुरेना ॥४१॥

जें चित्त वणवणी विषयांलागीं । तें उदास होय विषयभोगीं ।

विषय आदळतांही अंगीं । तैं विषयसंगीं विगुंतेना ॥४२॥

जेवीं जळामाजीं जळस्थ । पद्मिणीपत्र जळीं अलिप्त ।

तेवीं विषयांमाजीं चित्त । विषयातीत मद्बोधें ॥४३॥

सदा मरणभय देहासी । तें मरण आलिया देहापाशीं ।

भय नुपजे सात्विकापासी । भावें मत्पदासी विनटले ॥४४॥

जंववरी भासे मीतूंपण । तंववरी अवश्य बाधी मरण ।

सात्विक मत्पदीं अभिन्न । यालागीं मरणभय त्या नाहीं ॥४५॥

सात्विक मत्पदीं अनन्य शरण । यालागीं बाधीना जन्ममरण ।

या स्थितीं वर्तवी सत्वगुण । आतां ऐक लक्षण रजाचें ॥४६॥