श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १७ वा

विकुर्वन् क्रियया चाधीरनिर्वृत्तिश्च चेतसाम् ।

गात्रास्वास्थ्यं मनो भ्रान्तं रज एतैर्निशामय ॥१७॥

खवळलिया रजोगुण । विषयचिंता अतिदारुण ।

कर्मेंद्रियीं क्रियाभरण । नाना परींचें जाण उपपादी ॥४७॥

शरीर असतांही स्वस्थ । मन चिंतातुर अतिभ्रांत ।

वाढवितां विषयस्वार्थ । दुःखी होत सर्वदा ॥४८॥

असतां पुत्रवित्तसंपत्ती । अधिक स्वार्थ वाढवी चित्तीं ।

राजसाची चित्तवृत्ती । न मनी निवृत्ती क्षणार्ध ॥४९॥

नसतां विकाराचें कारण । चित्तीं विकार चिंती आपण ।

हेंचि राजसाचें लक्षण । मुख्यत्वें जाण उद्धवा ॥२५०॥

रात्री नोहे पैं प्रबळ । ना दिवस नव्हे सोज्ज्वळ ।

जैसी झांबवली सांजवेळ । तैसा केवळ रजोगुण ॥५१॥

सत्वरजांची उणखूण । तुज दाविली ओळखण ।;

आतां ऐक तमोगुण । जड लक्षण तयाचें ॥५२॥