श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १८ वा

सीदच्चित्तं प्रलीयेत चेतसो ग्रहणेऽक्षमम् ।

मनो नष्टं तमो ग्लानिस्तमस्तदुपधारय ॥१८॥

चित्तीं चिंता अतिगहन । ते महामोहीं होय निमग्न ।

कोणेही अर्थीचें ज्ञान । हृदयीं जाण स्फुरेना ॥५३॥

सुषुप्तीवेगळें अज्ञान । सदा पळे देखोनि ज्ञान ।

तेथ नवल कैसें झालें जाण । त्या ज्ञानातें अज्ञान गिळूनि ठाके ॥५४॥

जागाचि परी निजेला दिसे । कर्म करी स्फुरण नसे ।

जेवीं कां आभाळांतिले अंवसे । रात्रीं चाले जैसें आंधळें ॥५५॥

सकळ शरीराचा गोळा । होय आळसाचा मोदळा ।

हा तमोग्लानीचा सोहळा । पडळ ये डोळां चित्तवृत्ती ॥५६॥

संकल्पविकल्पांची ख्याती । उपजवी सदा मनोवृत्ती ।

त्या मनाची जड होय स्थिती । संकल्पस्फूर्ती स्फुरेना ॥५७॥

आणिकही नवलस्थिती । चित्तासी नाठवे चित्तस्फूर्ती ।

एवढी वाढे तमाची ख्याती । मनोवृत्तिविनाशक ॥५८॥

यापरी तमाचें बल होय । तैं मनातें अज्ञान खाय ।

ते काळीं मन नष्टप्राय । मूर्च्छित राहे मूढत्वें ॥५९॥

मन निःशेष जैं नासतें । तैं महादुःख कोण भोगितें ।

यालागीं तमाचेनि ऐक्यमतें । मन उरे तेथें जडमूढ ॥२६०॥

यापरी जे वर्तती गती । तेचि अत्यंत दुःखदाती ।

या नांव गा तमाची स्थिती । जाण निश्चितीं उद्धवा ॥६१॥;

वाढवितां गुणवृत्ती । कोणे गुणें कोण वाढती ।

येचि अर्थीची उपपत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥६२॥