श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २२ वा

सत्त्वे प्रलीनाः स्वर्यान्ति नरलोकं रजोलयाः ।

तमोलयास्तु निरयं यान्ति मामेव निर्गुणाः ॥२२॥

संसारीं मुख्यत्वें त्रिगुण । तेथ वाढोनियां सत्वगुण ।

ज्यासी प्राप्त होय मरण । तो स्वर्गभोगीं जाण दिव्य देह पावे ॥९९॥

सत्वें निमाल्या सात्विक । ते पावती स्वर्गलोक ।

रजोगुणें निमाल्या देख । त्या मनुष्यलोक मानवां ॥३००॥

अंतीं वाढोनियां तमाधिक्य । तमोगुणें निमाल्या देख ।

ते भोगिती महानरक । दुःखदायक दारुण ॥१॥

सप्रेम करितां माझी भक्ती । माझिया भक्तांसी देहांतीं ।

हृदयीं प्रकटे माझी मूर्ती । घवघविती निजतेजें ॥२॥

शंखचक्रगदादि संपूर्ण । पीतांबरधारी श्रीकृष्ण ।

ध्यानीं धरुनि पावे मरण । तो वैकुंठीं जाण मी होयें ॥३॥

सर्वभूतीं मी आत्मा पूर्ण । ऐसें ज्याचें अखंड भजन ।

ते जितांचि तिन्ही गुण । जिणोनि निर्गुण पावती ॥४॥

त्यांचे देहासी दैवें आल्या मरण । मजवेगळें नाहीं स्थान ।

ते निजानंदें परिपूर्ण । निजनिर्गुण स्वयें होती ॥५॥

माझें स्वरुप निजनिर्गुण । अथवा वैकुंठींचें सगुण ।

दोन्ही एकचि निश्चयें जाण । सगुण निर्गुण समसाम्य ॥६॥

स्वर्ग नरक मनुष्यलोक । प्राप्ति पावले निर्गुण चोख ।

त्यांच्या साधनांचें कौतुक । स्वयें यदुनायक सांगत ॥७॥;