श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २८ वा

पथ्यं पूतमनायस्तमाहार्यं सात्त्विकं स्मृतम् ।

राजसं चेन्द्रियप्रेष्ठं तामसं चार्तिदाशुचि ॥२८॥

पवित्र आणि हळुवार । सत्यवृद्धीसी हितकर ।

अप्रयासीं प्राप्ति साचार । सात्विक आहार या नांव ॥३७०॥

अल्पाहार या नांव पथ्य । पवित्र म्हणिजे धर्मार्जित ।

तेंही अप्रयासानें प्राप्त । तो जाण निश्चित सात्विकाहार ॥७१॥

गोड खरपूस आंबट । तळींव घोळींव तिखट ।

चिरींव चोळींव तुरट । वळींव वळिवट आळिलें ॥७२॥

रसीं रसांतरमिळणी । पन्हीं कालवणीं शिखरिणी ।

कुडकुडीं निर्पूस सणाणी । आहारभरणी राजस ॥७३॥

नाना परींच्या आवडी । सडिवा सोलिवा परवडी ।

रसनासुखाची अतिगोडी । तो आहार निरवडी राजस ॥७४॥

नाना परींचे आयास । करुनि अतिप्रयास ।

आहार सेविती राजस । ऐक तामस भोजन ॥७५॥

सेवितां दुर्गंधि उन्मादक । परिपाकें करी मूर्ख ।

अशुचि आणि दुःखदायक । हा आहार देख तामस ॥७६॥

भगवंताचा भुक्तप्रमाद । साधुसज्जनांचें शेष शुद्ध ।

हा निर्गुण आहार प्रसिद्ध । ’च’ कारें गोविंद बोलिला ॥७७॥

ग्रासोग्रासीं गोविंद । येणें स्मरणें अन्न शुद्ध ।

हा निर्गुण आहार प्रसिद्ध । ’च’ कारें गोविंद बोलिला ॥७८॥

’अन्नं ब्रह्म अहं च ब्रह्म’ । पंक्तीकर तोही ब्रह्म ।

ऐसा ज्याचा भोजनानुक्रम । तो आहार परम निर्गुणत्वें ॥७९॥

त्रिगुणांचें त्रिविध सुख । निर्गुण सुख अलोलिक ।

त्याही सुखाचा परिपाक । यदुनायक स्वयें सांगे ॥३८०॥;