श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २९ वा

सात्त्विकं सुखमात्मोत्थं विषयोत्थं तु राजसम् ।

तामसं मोहदैन्योत्थं निर्गुणं मदपाश्रयम् ॥२९॥

सांडूनि विषयसुखाची स्फूर्तीं । आत्मसुखें सुखावे चित्तवृत्ती ।

ऐशिया निजसुखाची प्राप्ती । तें सुख निश्चितीं सात्विक ॥८१॥

गंगापूर भरे उन्नतीं । तेणें अमर्याद वोत भरती ।

तेवीं आत्मसुखाचिये प्राप्ती । इंद्रियां तृप्ती स्वानंदें ॥८२॥

नाना विषयांचें कोड । इंद्रियांचा अतिधुमाड ।

विषयसुख लागे गोड । तें सुख सुदृढ राजस ॥८३॥

अतिनिंद्य आणि उन्मादी । तेंचि सुख आवडे बुद्धी ।

तामस सुखाची हे सिद्धी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥८४॥

हृदयीं प्रकटल्या माझी मूर्ती । विसरे संसाराची स्फूर्ती ।

त्यावरी जे होय सुखप्राप्ती । तें सुख निश्चितीं निर्गुण ॥८५॥

सर्व भूतीं वसे भगवंत । तोचि मी हा तात्त्विकार्थ ।

ऐसेनि मदैक्यें सुखप्राप्त । तो निजसुखार्थ निर्गुण ॥८६॥

देखिल्या निजात्मसुखस्वरुप । स्वयें होइजे सुखरुप ।

हे निर्गुणसुखाचे निजदीप । झडल्या पुण्यपाप पाविजे ॥८७॥

आपण सुखस्वरुप सर्वांगीं । सुखस्वरुप स्वयें भोगी ।

हे निर्गुण सुखाची मागी । भक्तीं अतंरंगीं भोगिजे ॥८८॥

कल्पांताचें पूर्ण भरितें । उरों नेदी नदीनदांतें ।

तेवीं निर्गुण सुख येथें । देहेंद्रियांतें उरों नेदी ॥८९॥

जेवीं मृगजळीं जळ नाहीं । तेवीं परब्रह्माच्या ठायीं ।

प्रपंच स्पर्शिलाचि नाहीं । तें सुख निर्वाहीं निर्गुण ॥३९०॥

ज्या सुखाची मर्यादा । करितां न करवे कदा ।

सुखें सुखस्वरुप होइजे सदा । हे सुखसंपदा निर्गुण ॥९१॥

त्रिगुण आणि निर्गुण । यांचें दाविलें भेदलक्षण ।

आतां त्याचें उपसंहरण । ग्रंथांतीं जाण हरि करी ॥९२॥;