श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३१ वा

सर्वे गुणमया भावाः पुरुषाव्यक्तधिष्ठिताः ।

दृष्टं श्रुतमनुध्यातं बुद्धया वा पुरुषर्षभ ॥३१॥

देखिजे अथवा ऐकिजे । कां मनें जें जें चिंतिजे ।

तें तें अवघेंचि जाणिजे । मायागुणकाजें त्रिगुणात्मक ॥९९॥

करावया त्रिगुणांचें मर्दन । प्रकृतिनियंता पुरुष भिन्न ।

तो सर्वदा सर्वांगें निर्गुण । वर्तवी गुण निजसत्ता ॥४००॥

पुरुषावेगळें समस्त । प्रकृतिकार्य मिथ्याभूत ।

त्यातें बोलिजे गुणवंत । जाण निश्चित उद्धवा ॥१॥

नरदेह पावोनियां येथ । जे न साधिती गुणातीत ।

ते नाडले हातोहात । निजस्वार्थ बुडाला ॥२॥;

तैसी नव्हे तुझी मती । विनटलासी भगवद्भक्ती ।

तेव्हांचि तूं गुणातीतीं । जाण निश्चितीं जडलासी ॥३॥

हरिभक्तांमध्यें वरिष्ठ । यालागीं निजमुखें वैकुंठ ।

उद्धवासी म्हणे पुरुषश्रेष्ठ । भाग्यें उत्कृष्ट तूं एक ॥४॥

त्रिगुणगुणीं सविस्तारु । दृढ वाढला संसारतरु ।

त्याचे छेदाचा कवण प्रकारु । तो शार्ङगधरु सांगत ॥५॥;