श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २५ व २६ वा

पाद्योपस्पर्शार्हणादीनुपचारान्प्रकल्पयेत् ।

धर्मादिभिश्च नवभिः कल्पयित्वाऽऽसनं मम ॥२५॥

पद्ममष्टदलं तत्र, कर्णिकाकेसरोज्ज्वलम् ।

उभाभ्यां वेदतन्त्राभ्यां, मह्यं तूभयसिद्धये ॥२६॥

स्नानमंडप कल्पूनि जाण । तेथ आणावा देव चिद्धन ।

पाद्म अर्घ्य आचमन । मधुपर्क-विधान करावें ॥२२॥

अभ्यंग अंगमर्दन । पुरुषसूक्तें यथोक्त स्नान ।

पीतांबरपरिधान । स्नानमंडपीं जाण देवासी ॥२३॥

इतर यथोक्त पूजन । करावें सिंहासनीं संपूर्ण ।

तें आसन पीठावरण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥२४॥

सिंहासनीं आवरणक्रम । आधारप्रकृति-कूर्म क्षेम ।

क्षीराब्धि श्वेतद्वीप कल्पद्रुम । मनोरम भावावा ॥२५॥

त्या तळीं रत्‍नमंडप नेटक । त्यामाजीं विचित्र पर्यंक ।

त्या मंचकाचा विवेक । यदुनायक सांगत ॥२६॥

धर्म ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । हेचि माचवे अतिवर्य ।

अधर्म अज्ञान अनैश्चर्य । अवैराग्येंसीं पाय गातें चारी ॥२७॥

ईश्वरतत्त्व निजसूत । गुणागुणीं वळोनि तेथ ।

मंचक विणिला अचुंबित । योगयुक्त महामुद्रा ॥२८॥

त्या मंचकावरी शेषपुटी । शोभे अतिशयेंसीं गोमटी ।

सहस्त्रफणीं मणितेज उठी । छत्राकार पृष्ठीं झळकत ॥२९॥

शेषपुटीमाजीं निर्मळ । विकासलें रातोत्पळ ।

सकर्णिक अष्टदळ । शोभे कमळ मनोहर ॥२३०॥

सत्‌शक्ति कमळकंदमूळ । ज्ञाननाळ त्याचें सरळ ।

प्रकृति अष्टधा जे सबळ । तेंचि अष्टदळ कमळाचें ॥३१॥

ऐसें कमळ अतिसुंदर । षडविकार तेचि केसर ।

वैराग्यकर्णिका सधर । मघमघी थोर सुवासें ॥३२॥

पूर्वादि कमळदळीं जाणा । देवता न्यासाव्या त्या त्या स्थाना ।

विमळा उतकर्षणी आणि ज्ञाना । क्रियाशक्ति जाणा चौथी पैं ॥३३॥

योगा प्रह्वी सत्या ईशाना । कर्णिका योजिजे मध्यस्थाना ।

कल्पूनि अनुपम रचना । अनुग्रहा जाणा स्थापावी ॥३४॥

आत्मा अंतरात्मा परमात्मा । हा संमुखभाग देवोत्तमा ।

सत्त्व रज आणि मोह तमा । पुरुषोत्तमा पृष्ठिभाग ॥३५॥

ऐशापरी पीठन्यास । आगमोक्त सावकाश ।

करुनियां हृषीकेश । सिंहासनास आणावा ॥३६॥

छत्र आणि युग्म चामर । नाना वाद्यें जयजयकार ।

दावूनि पीठ मुद्रा सधर । आसनीं श्रीधर बैसवावा ॥३७॥

मज सर्वगतासी आवाहन। मज अधिष्ठानासी आसन ।

मज निर्विकारासी जाण । दाविती आपण विकारमुद्रा ॥३८॥

मज चिद्रूपालागीं लोचन । निःशब्दा कल्पिती श्रवण ।

मज विश्वमुखासी वदन । निमासुरें जाण भाविती ॥३९॥

मी विश्वांघ्री दों पायीं चालत । मज विश्वबाहूसी चारी हात ।

मज सर्वगतातें एथ । स्थान भावित एकदेशी ॥२४०॥

मज निरुपचारासी उपचार । मज विदेहासी अळंकार ।

मज सर्वसमाना अरिमित्र । भावना विचित्र भाविती ॥४१॥

मज अकर्त्या कर्मबंधन । अजासी जन्मनिधन ।

नित्यतृप्तासी भोजन । निर्गुणा सगुण भाविती ॥४२॥

या अवघियांचा अभिप्रावो । उपासनाकांडनिर्वाहो ।

जैस जैसा भजनभावो । तैसा मी देवो तयांसी ॥४३॥

मी अवाप्तसकळकाम । परी भक्तप्रेमालागीं सकाम ।

जैसा भक्तांचा मनोधर्म । तैसा पुरुषोत्तम मी तयां ॥४४॥

भक्त जैसा भावी मातें । मी तैसाचि होयें त्यातें ।

तो जें जें अर्पी भावार्थें । तें अर्पे मातें सहजचि ॥४५॥

मी सर्वत्र भरलों असें । तेथ जो जेथ मज उद्देशें ।

भक्त भावार्थें अर्पूं बैसे । तें अर्पे अनायासें सहजें मज ॥४६॥

मी सर्वत्र देवाधिदेव । तैसा प्राणियांचा नव्हे भाव ।

यालागीं भक्तांचा जेथ सद्भाव । तेथ मी देव सहजेंचि ॥४७॥

यालागीं वाडेंकोडें । भक्तभावार्थ मज आवडे ।

भक्तभावाहूनि पुढें । वैकुंठ नावडे क्षीराब्धीही ॥४८॥

भक्तभावार्थाचीं भूषणें । अंगीं बाणावया श्रीकृष्णें ।

म्यां निर्गुणेंही सगुण होणें । भावार्थगुणें भक्तांच्या ॥४९॥

यालागीं मी अजन्मा जन्में । अकर्माही करीं कर्में ।

अनामअ मी धरीं नामें । भक्त मनोधर्में तरावया ॥२५०॥

निर्गुणीं लागल्या मन । मनचि होय चैतन्यघन ।

सगुणीं ठसावल्या मन । साधक श्रीकृष्ण स्वयें होती ॥५१॥

निर्गुणाचा बोध अटक । यालागीं उपासनाविवेक ।

सगुणमूर्ति भावूनि देख । तरले साधक अनायासें ॥५२॥

हे आगमोक्त उपासनाविधी । येणें भोगमोक्ष उभयसिद्धी ।

साधक पावती त्रिशुद्धी । मी कृपानिधि संतुष्टें ॥५३॥

तेंचि उपासनविधिविधान । मागां सांगतां पूजन ।

देव सिंहासनीं बैसल्या पूर्ण । पुढें आवरणपूजा ऐक ॥५४॥