श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ६ व ७ वा

आत्मैव तदिदं विश्वं, सृज्यते सृजति प्रभुः ।

त्रायते त्राति विश्वात्मा, ह्नियते हरतीश्वरः ॥६॥

तस्मान्नह्यात्मनोऽन्यस्मादन्यो भावो निरुपितः।

निरुपितेयं त्रिविधा, निर्मूला भातिरात्मनि ॥७॥

प्रपंच प्रत्यक्ष विद्यमान । तेणें भेदयुक्त झालें मन ।

तेथ बोधी माझें वेदवचन । प्रपंच अभिन्न निजात्मता ॥९३॥

मूळीं ऊंसचि बीजीं विरुढे । तो ऊंस ऊंसपणें कांडा चढे ।

तेवीं प्रपंच वस्तुयोगें वाढे । वाडेंकोडें तद्रूप ॥९४॥

जैसें सोनियाचें झालें लेणें । तें वर्ततां वर्त्ते सोनेपणें ।

लेणें मोडलियाही सोनें । सोनेंपणें स्वतःसिद्ध ॥९५॥

तिळाची पुतळी केली । ते तिळावयवीं शोभे आली ।

ते मोडितां न मोडितां भली । असे संचली तिळरुप ॥९६॥

तेवीं उत्पत्ति स्थिति निदान । प्रपंचासी होता जाण ।

तेथ आदि मध्य अवसान । वस्तु परिपूर्ण संचली ॥९७॥

जें एथ भासलें चराचर । तें मी आत्माचि साचार ।

मजवेगळा जगासी थार । अणुमात्र असेना ॥९८॥

एवं सृज्य आणि सृजिता । पाल्य आणि प्रतिपाळिता ।

संहार आणि संहर्ता । मी एकात्मता भगवंत ॥९९॥

एथ उत्पत्ति स्थिति निधन । त्रिविधरुपें प्रपंच भिन्न ।

या सर्वांसी मी अधिष्ठान । मजवेगळें जाण असेना ॥१००॥

प्रपंच मजवरी आभासे । परी मी प्रपंचामाजीं नसें ।

जेवीं मृगजळाचेनि रसें । सूर्य काळवशें भिजेना ॥१॥

त्रिविध प्रपंचाचें जाळ । मजवरी दिसे हें निर्मूळ ।

जेवीं गगन भासे सुनीळ । परी तेथ अळुमाळ नीळिमा नाहीं ॥२॥

’जग प्रत्यक्ष डोळां दिसे । तें तूं निर्मळ म्हणसी कैसें’ ।

हे आशंका मानिसी मानसें । ऐक अनायासें तो बोध ॥३॥