श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २० वा

विज्ञानमेतत्त्रियवस्थमङग गुणत्रयं कारणकार्यकर्तृ ।

समन्वयेन व्यतिरेकतश्च येनैव तुर्येण तदेव सत्यम्‌ ॥२०॥

सत्त्वगुणें जागरण । रजोगुणें दिसे स्वप्न ।

तमोगुणें सुषुप्ति जाण । लागे संपूर्ण गाढ मूढ ॥६७॥

ऐसें तिहीं अवस्थायुक्त मन । कार्य कर्तृत्व कारण ।

त्रिविध जग भासे संपूर्ण । ब्रह्म समन्वयें जाण सदोदित ॥६८॥

मृत्तिकेवेगळा घट न दिसे । तंतूवेगळा पट न प्रकाशे ।

तेवीं मजवेगळें जग नसे । जें जें भासे तें मद्रूप ॥६९॥

जो मी तिनी गुणांतें नातळता । अवस्थात्रयातें नाकळता ।

तिंही अवस्थांतें प्रकाशिता । तो मी चवथा जाण ’तुरीय’ ॥२७०॥

तिन्ही अवस्था तिन्ही गुण । दृश्य द्रष्टा आणि दर्शन ।

त्रिपुटीप्रकाशिता पूर्ण । ती मी चवथा जाण ’तुरीय’ ॥७१॥

जो मी तुरीय सच्चिद्धन । त्या माझ्या ठायीं अवस्थागुण ।

नभीं नीळिमा मिथ्या भान । तैसे नसते जाण भासती ॥७२॥

आशंका ॥ ’तिंही अवस्थांचें ज्ञान पाहीं । देखिजे समस्तांच्या ठायीं ।

चवथें ज्ञान ’तुरीय’ कांहीं । ऐकिलें नाहीं गोविंदा’ ॥७३॥

चौथें ज्ञान तुरीयावस्था । मिथ्या म्हणसी न विचारतां ।

तेचिविखीं विशदार्था । श्रीकृष्ण तत्त्वतां सांगत ॥७४॥

’व्यतिरेकतश्च’ ॥ देहादिप्रपंचव्यतिरेकता । भूतीं भूतांचा लयो पाहतां ।

लीन झालिया गुणावस्था । उरे मी चवथा ’तुरीय’ ॥७५॥

तें एवंविध बोलों जातां । वेदीं मूग आरोगिले सर्वथा ।

हें अनुभवैकवेद्य तत्त्वतां । शब्दप्रगल्भता सरेना ॥७६॥

एथ न चले युक्तिप्रयुक्ती । न चले जाणिवेची व्युत्पत्ती ।

न चले लक्ष्यलक्षणस्थिति । गुरुकृपाप्राप्ती ’तुरीय’ ॥७७॥

जागृत्यादि सर्वही सत्ता । सुषुप्ति सर्वही असतां ।

याचा ’तुरीय’ मी प्रकाशिता । मजविण सर्वथा त्या भासती केवीं ॥७८॥

जो सुषुप्तीं साक्षित्व पावता । तो मी ’तुरीय’ जाण पां चौथा ।

त्या मज सत्यस्वरुपता । केला निश्चितार्था निश्चयो वेदें ॥७९॥

त्या स्वरुपावेगळें एथ । जें भासे तें मिथ्याभूत ।

तेचि अर्थीं श्रीकृष्णनाथ । असे सांगत निजबोधें ॥२८०॥