श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २३ वा

एवं स्फुटं ब्रह्म विवेकहेतुभिः, परापवादेन विशारदेन ।

छित्त्वाऽऽत्मसन्देहमुपारमेत, स्वानन्दतुष्टोऽखिलकामुकेभ्यः ॥२३॥

पूर्वीं बोलिलों यथानिगुती । ब्रह्मज्ञान नानायुक्तीं ।

ते करतलामलकस्थिती । प्रकट प्रतीती प्रमाण ॥३००॥

वेद-विवेक-अनुमान । ब्रह्मउपदेशाचें लक्षण ।

ज्ञानाज्ञानाचें फळ पूर्ण । तुज म्यां संपूर्ण सांगितलें ॥१॥

तेथें देहेंद्रियांचें मिथ्यापण । देहात्मभावाचें निराकरण ।

ब्रह्म अद्वयत्वें परिपूर्ण । तेंही गुह्य ज्ञान प्रकाशिलें ॥२॥

म्यां प्रकाशिलें पूर्ण ज्ञान । जें दुर्लभ दुर्गम दुष्प्राप्य जाण ।

हेंचि सिद्धांचें समाधान । हेंचि साधन साधकां ॥३॥

जें म्यां सांगितलें ब्रह्मज्ञान । हेंचि उपदेशशस्त्र तीक्ष्ण ।

साधक साधूनियां पूर्ण । संशय जाण छेदिती ॥४॥

म्यां सांगितलें ब्रह्मज्ञान । तेथ संदेह मानी मन ।

तेणें संदेहेंसीं देहाभिमान । येणें शस्त्रें जाण छेदिती ॥५॥

यापरी संदेहच्छेदन । करुनि द्वैताची बोळवण ।

निर्दाळूनियां मीतूंपण । स्वानंदीं निमग्न साधक ॥६॥

वर्णाश्रम कुळ जाती । जीवशिवादि पदस्थिती ।

यांची स्फुरेना अहंकृती । या नांव ’उपरति’ उद्धवा ॥७॥

इहामूत्रादि फळें समस्तें । कोण कामी त्या कामातें ।

विषय विषयी विषयभोगातें । सर्वथा तेथें असेना ॥८॥

यापरी नित्य निष्काम । साधक झाले ’आत्माराम’ ।

परमानंदीं निमग्न परम । पावले ’उपरम’ येणें योगें ॥९॥;

देहेंद्रियें असतां प्राण । कैसेनि गेला देहाभिमान ।

उद्धवा ऐसें कल्पील मन । तेंचि निरुपण हरि सांगे ॥३१०॥