श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २८ वा

यथामयोऽसाधुचिकित्सितो नृणां, पुनः पुनः सन्तुदति प्ररोहान् ।

एवं मनोऽपक्वकषायकर्म, कुयोगिनं विध्यति सर्वसङगम् ॥२८॥

वैद्य नेणे रोगाचें लक्षण । नेणे धातुपुष्ट कीं क्षीण ।

नेणे पथ्य ना अनुपान । नाडीज्ञान कळेना ॥७॥

त्यापासाव वोखद घेतां । पुनः पुनः वाढे व्यथा ।

तेवीं अवैराग्यें त्याग करितां । साधकां बाधकता अनिवार ॥८॥

हृदयीं नाहीं विषयनिवृत्ति । बाह्य त्यागें वाढवी विरक्ती ।

ऐशी जे बहिर्मुद्रास्थिती । ते जाण निश्चितीं ’कुयोग’ ॥९॥

सांडोनियां भगवद्भजन । वेदविधिमार्गविहीन ।

ऐसें जें कां त्यागलक्षण । ’कुयोग’ संपूर्ण त्या नांव ॥४१०॥

द्रव्यदाराविषयासक्ती । दृढ वासना असतां चित्तीं ।

बाह्य त्याग मिथ्या विरक्ती । ’कुयोग’ निश्चितीं या नांव ॥११॥

आम्ही राजयोगी अतिश्रेष्ठ । म्हणोनि विषय भोगी यथेष्ट ।

वोस पडली वैराग्यपेंठ । ’कुयोग’ चोखट या नांव ॥१२॥

आपली चोरुनि विषयासक्ती । बाह्य मिरवी मिथ्या विरक्ती ।

हेचि ’कुयोगाची’ स्थिती । जाण निश्चितीं उद्धवा ॥१३॥

ऐशिया कुयोगियां जाण । पुढतीं जन्म पुढतीं मरण ।

दुःखावर्ती पडिले पूर्ण । सोडवी कोण तयांसी ॥१४॥

नव्हेचि इहलोकींचा विषयभोग । नव्हेचि परमार्थीं शुद्ध त्याग ।

अंतरला उभय प्रयोग । दुःखभाग कुयोग्या ॥१५॥

परमार्थें त्यागसाधन । करितां अंतराय आलें विघ्न ।

तयासी अवगती नव्हे जाण । जरी अनुताप पूर्ण स्वयें उपजे ॥१६॥