श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३१ वा

तिष्ठन्तमासीनमुत व्रजन्तं, शयानमुक्षन्तमदन्तमन्नम् ।

स्वभावमन्यत् किमपीहमानमात्मानमात्मस्थमतिर्न वेद ॥३१॥

देह उभें असतां जाण । ज्ञाता न देखे उभेंपण ।

मा बैसल्या बैसलेंपण । मानी कोण देहाचें ॥४४०॥

परिपूर्ण ब्रह्माच्या ठायीं । उठणें बैसणें दोनी नाहीं ।

ज्ञाता तेंचि झाला पाहीं । उठबैस कांहीं जाणेना ॥४१॥

दोराचा सर्प उपजला । भोग भोगूनि स्वयें निमाला ।

सत्यत्व नाहीं या बोला । तैसा देहो झाला मुक्तसी ॥४२॥

देह दैवें असे एकादशी । ज्ञाता सर्वीं देखे आपणासी ।

देह जातां परदेशासी । ज्ञाता गमन मानसीं देखेना ॥४३॥

वस्तु वस्तुत्वें परिपूर्णपणें । तेथ कैंचें असे येणेंजाणें ।

ज्ञाता सदा तद्रूपपणें । राहणेंजाणें स्पर्शेना ॥४४॥;

ज्ञाता स्वयें रिघे शयनीं । परी शेजबाज न देखे अवनीं ।

मी निजेलों हेंही न मनी । निजीं निजरुपपणीं सर्वदा ॥४५॥

ज्ञाता जेवूं बैसे निजसुखें । परी मी भुकेलों हें न देखे ।

रसने नेणतां सर्व रस चाखे । जेवी येणें सुखें निजगोडीं ॥४६॥

दिसे यावृत्तृप्त जेविला । परी तो धाला ना भुकेला ।

तो उच्छिष्टही नाहीं झाला । शेखीं आंचवला संसारा ॥४७॥;

जरी तो स्वभावें सांगे गोष्टी । तरी अबोलणें घाली शब्दापोटीं ।

बोलीं अतिरसाळ गोडी उठी । तरी न सुटे मिठी मौनाची ॥४८॥

मी एक चतुर बोलका । हाही नुठी त्या आवांका ।

बोल बोलों नेणे फिका । बोलोनि नेटका अबोलणा ॥४९॥;

ज्ञाता पाहे निजात्मसुखें । माझें तुझें हेंही वोळखे ।

परी तो डोळांचि न देखे । देखे आपण्यासारिखें त्रैलोक्य ॥४५०॥

तो जों दृश्य पाहों बैसे । तों दृश्याचा ठावोचि पुसे ।

जें देखे तें आपण्याऐसें । निजात्मसौरसें जग देखे ॥५१॥

करुनि डोळ्यांचा अंत । ज्ञाता देखणेपणें पाहत ।

त्या देखण्याचा निजस्वार्थ । न चढे हात वेदशास्त्रां ॥५२॥

जाणे शब्दींचें शब्दज्ञान । मी श्रोता हे नुठी आठवण ।

उपेक्षूनियां देहींचे कान । करी श्रवण सर्वांगें ॥५३॥

यापरी स्वयें सज्ञान । होऊनियां सावधान ।

सोलूनियां शब्दज्ञान । करी श्रवण स्वभावें ॥५४॥;

जाणे सुवास दुर्वास । भोगीं न धरी नाकाची आस ।

सुमना सबाह्य जो सुवास । तो भोगी सावकाश सर्वदा ॥५५॥;

मृदुकठिणादि स्पर्श जाणे । परी मी जाणतों हें स्फुरों नेणे ।

अंगा लागे तें निजांग करणें । हा स्पर्श भोगणें सज्ञानीं ॥५६॥;

ज्ञाता चालता दिसे चरणीं । परी तो चालतां स्वयें अचरणी ।

स्वेच्छा हिंडतांही अवनीं । तो ठायाहूनी ढळेना ॥५७॥;

हस्तव्यापारीं देतां दान । मी दाता ही नुठी आठवण ।

देतेंघेतें दान होय आपण । यापरी सज्ञान वर्तवी करा ॥५८॥

कायिक वाचिक मानसिक । कर्म निफजतां स्वाभाविक ।

ज्ञाता ब्रह्मरुपें निर्दोख । देहासी देख स्पर्शेना ॥५९॥

अकर्तात्मनिजसत्ता । ज्ञाता सर्व कर्मी वर्ततां ।

न देखे कर्म-क्रिया-कर्तव्यता । निजीं निजात्मता निजबोधें ॥४६०॥

ज्ञाता नित्य निजात्मसुखें । देहीं असोनि देह न देखे ।

तो देहकर्मीं केवीं आडके । पूर्ण परमात्मसुखें संतुष्ट ॥६१॥;

जगासी लागलें कर्मबंधन । तेथें खातां जेवितां सज्ञान ।

केवीं न पवे कर्मबंधन । तेंचि निरुपण हरि सांगे ॥६२॥