श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३२ वा

यदि स्म पश्यत्यसदिन्द्रियार्थं , नानानुमानेन विरुद्धमन्यत् ।

न मन्यते वस्तुतया मनीषी, स्वाप्नं यथोत्थाय तिरोदधानम् ॥३२॥

हो कां लौकिकाचे परी । ज्ञाता वर्ते लोकाचारीं ।

तोही प्रपंचामाझारीं । कर्में करी लौकिकें ॥६३॥

परी कार्य-कर्म-कर्तव्यता । हे ज्ञात्यासी नाहीं अहंता ।

तेणें प्रपंचामाजीं निजात्मता । निश्चयें तत्त्वतां वश्य केली ॥६४॥

विषयादि प्रपंचभान । सत्य मानिती अज्ञान ।

तो प्रपंच देखती सज्ञान । ब्रह्मपूर्ण पूर्णत्वें ॥६५॥

साकरेचा इंद्रावणघडू । जाणा गोड नेणा कडू ।

तैसा प्रपंचाचा पडिपाडू । लाभ आणि नाडू ज्ञानाज्ञानें ॥६६॥

सुवर्णाची खोटी । मूर्ख मानिती केवळ गोटी।

ज्ञाते घालूनियां मिठी । घेती ज्ञानदृष्टीं बहुमोलें ॥६७॥

तेवीं सांसारिक क्रियाकर्म । मूर्खा मूर्खपणें भासे विषम ।

तेंचि ज्ञात्यासी परब्रह्म । स्वानंदें आराम सर्वदा ॥६८॥

प्रपंच खाणोनि सांडावा । मग ब्रह्मभाव मांडावा ।

हेंही न लगे त्या सदैवा । उखिताचि आघवा परब्रह्म ॥६९॥

मिथ्या दोराचा सर्पाकार । तेथ मिळोनि अज्ञान नर ।

नाना अनुमानीं भयंकर । सत्य साचार मानिती ॥४७०॥

तेवीं मिथ्या प्रपंचाचें भान । बाधक मानिती अज्ञान ।

तेंचि स्वानुभवें सज्ञान । जाणती पूर्ण परब्रह्म ॥७१॥

जेवीं स्वप्न साच निद्रिताप्रती । तेवीं प्रपंच साच निज भ्रांतीं ।

तोचि निजात्मजागृताप्रती । मिथ्या निश्चितीं निजबोधें ॥७२॥

मिथ्या प्रपंचाचें भान । जाणोनि झाले जे सज्ञान ।

त्यांसी सर्व कर्मीं वर्ततां जाण । देहाभिमान कदा नुपजे ॥७३॥

साधकांचा साधावया स्वार्थ । पूर्वी सर्वस्वरुपें भगवंत ।

बोलिला, तेणें विकारवंत । झाला निश्चित म्हणशील ॥७४॥

वस्तु नव्हे विकारवंत । ते निजसाम्यें सदोदित ।

तेचि अर्थीं श्रीकृष्णनाथ । असे सांगत निजबोधें ॥७५॥