श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३५ वा

एष स्वयंज्योतिरजोऽप्रमेयो, महानुभूतिः सकलानुभूतिः ।

एकाऽद्वितीयो वचसां विरामे, येनेषिता वागसवश्चरन्ति ॥३५॥

’एष स्वयंज्योती’चें व्याख्यान । परमात्मा स्वप्रकाशघन ।

साधक तद्रूप आपण । अभिन्नत्वें जाण सर्वदा ॥११॥

आत्मा परिपूर्ण निजपूर्णता । त्यासी वेगलीं कैंचीं मातापिता ।

यालागीं आत्म्यासी जन्मकथा । जाण सर्वथा असेना ॥१२॥

त्रिगुणांचे त्रिविध मळ । हे मिथ्या मायिक समूळ ।

आत्म्यासी न लागती अळुमाळ । यालागीं ’निर्मळ’ निजात्मा ॥१३॥

’अप्रमेय’ म्हणिपे तें ऐका । ऐसा तैसा इतुका तितुका ।

पैल तो अमका तमका । प्रमाण देखा कदा नव्हे ॥१४॥

काळा गोरा सांवळा । निळा धवला पिंवळा ।

एक तेथ दूरी जवळा । या प्रमाणांवेगळा परमात्मा ॥१५॥

’महानुभूति’ पदव्याख्यान । आत्मा अखंडदंडायमान ।

निजीं निजरुपें समसमान । स्वानंदघन सर्वदा ॥१६॥

तेथ देश काळ वर्तमान । ध्येय ध्याता अथवा ध्यान ।

ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान । हेंही जाण असेना ॥१७॥

नाम-रुप-जात-गोत । क्रियाकर्मासी अलिप्त ।

जन्ममरण कैंचें तेथ । वस्तु सदोदित स्वानंदें ॥१८॥

तेथ वृद्धि आणि र्‍हास । आदिमध्यान्तविलास ।

परिपाकादि विन्यास । यांचाही प्रवेश असेना ॥१९॥

म्हणशी पूर्वोक्त धर्मस्थिती । तेथ न रिघे कैशा रितीं ।

’सकळानुभूति’ या पदोक्तीं । वस्तु सर्वार्थीं अलिप्त ॥५२०॥

या रीतीं धर्म आणि अधर्म । सकळ भूतांचें क्रियाकर्म ।

प्रकाशक मी आत्माराम । यासी अलिप्त परम परमात्मा ॥२१॥

गंगाजळा आणि मद्यासी । आकाश व्याप्त असोनि त्यांसी ।

परी तें अलिप्त दोंहीसीं । तेवीं ज्ञानाज्ञानासी परमात्मा ॥२२॥

जेथ ज्ञानाज्ञानाचा अभावो । तेथ कर्माकर्मा कैंचा ठावो ।

’सकळानुभूति’ या नांव पहा हो । अभेदान्वयो स्वानंदें ॥२३॥

ऐसा परमात्मा परमानंद । सजातीय-विजातीय-स्वगतभेद ।

नसोनियां वस्तु शुद्ध । जाण प्रसिद्ध निजबोधें ॥२४॥

’विजातीय भेद’ मी देह म्हणणें । ’सजातीय भेद’ मी जीवपणें ।

’स्वगत भेद’ मी ब्रह्म स्फुरणें । हे तिनी नेणें परमात्मा ॥२५॥

तेथ ऊणखूण लक्ष्यलक्षण । युक्तिप्रयुक्ति प्रमाण ।

हेंही सर्वथा न रिघे जाण । ब्रह्म परिपूर्ण एकाकी ॥२६॥

ऐसें एकाकी परब्रह्म । निजगुह्याचें गुह्य उत्तम ।

हें जाणे तो सभाग्य परम । त्यासी भवभ्रम न बाधी ॥२७॥

तो देहीं असतांचि जाण । त्यासी न बाधी देहगुण ।

कदा न बाधी कर्माचरण । जन्ममरन बाधीना ॥२८॥

ऐकोनि ऐशिया ज्ञानासी । तें स्वरुप स्पष्ट सांग म्हणसी ।

तरी तेथ रिगमु नाहीं वाचेसी । श्रुति शब्देंसीं परतल्या ॥२९॥

जेथ अतिविवेकसंपन्न । बुद्धि प्रवेशेना आपण ।

सवेगपणें न पवे मन । ते वस्तु वाचेअधीन सर्वथा नव्हे ॥५३०॥

खुंटली शास्त्रांची व्युत्पत्ती । दर्शनें अद्यापि विवादती ।

श्रुति परतल्या ’नेति नेति’ । तेथ वचनोक्ती विरामु ॥३१॥

धरोनि जाणिवेची हांव । शब्दज्ञानें घेतली धांव ।

परी वस्तूचें एकही नांव । घ्यावया जाणीव न सरेचि ॥३२॥

एवं विचारितां साचार । परादि वाचा नव्हे उच्चार ।

यालागीं वस्तु ’परात्पर । क्षराक्षराअतीत ॥३३॥

जे सर्वावयवीं सर्वदा शून्य । शेखीं शून्यही नव्हे आपण ।

शून्यप्रकाश चिद्धन । वस्तु परिपूर्ण एकत्वें ॥३४॥

तेथ रिघावया वचनोक्तीं । शब्दें साधिल्या नाना युक्ती ।

त्या चिदाकाशीं मावळती । जेवीं कां उगवतां गभस्ती खद्योत ॥३५॥

खद्योत सूर्यासी खेंव देता । तैं वस्तु येती वचनाचे हाता ।

वस्तूपाशीं शब्दाच्या कथा । जाण तत्त्वतां हारपती ॥३६॥

सूर्योदय झालिया पाहीं । खद्योत शोधितां न पडे ठायीं ।

तेवीं वस्तुप्राप्ति पाविजे जिंहीं । तैं मागमोस नाहीं शब्दांचा ॥३७॥

हो कां आंधारिये रातीं । ज्यांची दीपें चाले क्रियास्थिती ।

तेथ झालिया सूर्योदयप्राप्ती । तेचि उपेक्षिती दीपातें ॥३८॥

तेवीं शाब्दिका ज्ञानयुक्तीं । अनुतापें ब्रह्म विवंचिती ।

ज्यांसी झाली ब्रह्मप्राप्ती । तेचि उपेक्षिती शब्दातें ॥३९॥

जंव जंव शब्दाचा अभिमान । तंवतव दूरी ब्रह्मज्ञान ।

येचि अर्थींचें उपलक्षण । ऐक निजखूण उद्धवा ॥५४०॥

कन्या द्यावया वरासी । माता पिता बन्धु ज्योतिषी ।

मेळवूनियां सुहृदांसी । कन्या वरासी अर्पिती ॥४१॥

तेथ भर्तार संभोगसेजेपाशीं । जवळी मातापितासुहृदेंसीं ।

असणें हाचि अवरोध तिसी । पतिसुखासी प्रतिबंध ॥४२॥

तेवीं योग्यता चातुर्य जाण । शब्दज्ञानें ज्ञातेपण ।

जवळी असतां, ब्रह्मज्ञान । सर्वथा जाण हों न शके ॥४३॥

जेवीं डोळां अल्प कण न समाये । तेवीं ब्रह्मीं कल्पना न साहे ।

यालागीं निर्विकल्पें पाहें । ब्रह्मज्ञान होये सुटंक ॥४४॥

समस्त ज्ञानाचा उपरम । सकळ वचनांचा विराम ।

तैंचि पाविजे परब्रह्म । ऐसें पुरुषोत्तम बोलिला ॥४५॥

जें नाकळे बुद्धीच्या ठायीं । जें मनासी नातुडे कंहीं ।

जें वचनासी विषयो नव्हे पाहीं । प्रमाणाचे पायीं पावलें न वचे ॥४६॥

यापरी वस्तु न पडे ठायीं । तरी ते वस्तुचि म्हणशी नाहीं ।

ऐसें उद्धवा कल्पिसी कांहीं । ऐक ते विषयीं सांगेन ॥४७॥

(मूळ श्लोकींचें पद) ’येनेषिता वागसवश्चरंति ॥’

येथें देहेंद्रियप्राण । हे जड मूढ अचेतन ।

त्यांसी चेतवी आत्मा चिद्धन । तेंही उपलक्षण अवधारीं ॥४८॥

आत्मप्रभा ’दृष्टि’ प्रकाशे । परी आत्मा दृष्टीसी न स्पर्शे ।

आत्मा दृष्टीसबाह्य असे । परी दृष्टीसी न दिसे अदृश्यत्वें ॥४९॥

आत्मसत्ता ऐकती ’श्रवण’ । श्रवणांसी आत्मा नातळे जाण ।

श्रवणां सबाह्य असोनि पूर्ण । श्रवणविषय जाण नव्हेचि आत्मा ॥५५०॥

’वाचा’ आत्मसत्ता उठी । आत्मा नातळे वाचिका गोठी ।

वस्तु शब्दाचे पाठीं पोटीं । तो शब्द शेवटीं नेणें वस्तु ॥५१॥

’मन’ आत्मसत्तें चपळ । मना सबाह्य आत्मा केवळ ।

तो मनासी नातळे अळुमाळ । मनासी अकळ निजात्मा ॥५२॥

’चित्त’ चेतवी चिद्धन । चित्सत्ता चित्तासी चिंतन ।

चित्ता सबाह्य चैतन्य पूर्ण । तरी चित्तासी चैतन्य कळेना ॥५३॥

आत्मसंयोगें ’अहं’ उल्हासे । अहंता आत्मा कदा न स्पर्शे ।

अहंतासबाह्य आत्मा असे । परी तो आत्मा न दिसे अहंकारें ॥५४॥

आत्मप्रभा ’प्राण’ चळे । परी प्राणासी आत्मा नातळे ।

प्राण-सबाह्य आत्ममेळें । तरी प्राणासी न कळे परमात्मा ॥५६॥

उद्धवा तूं यापरी पाहें । जड जयाचेनि वर्तताहे ।

तो आत्मा स्वतःसिद्ध आहे । नाहीं नोहे कल्पांतीं ॥५७॥

यापरी आत्मा स्वतःसिद्ध । भेद नांदवूनि अभेद ।

द्वंद्व प्रकाशोनि निर्द्वंद्व । हा निजात्मबोध दृढ केला ॥५८॥

एवं आत्मा निर्द्वंद्व अद्वैतें । तो आहे नाहीं म्हणावया येथें ।

कोणी नुरेचि गा म्हणतें । आत्मा निजात्मते परिपूर्ण ॥५९॥

आत्मा निजात्मता सदोदित । संसार तेथ आरोपित ।

येचि अर्थी श्रीकृष्णनाथ । असे सांगत श्लोकार्थें ॥५६०॥