श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३६ वा

एतावानात्मसम्मोहो, यद्विकल्पस्तु केवले ।

आत्मन्नृते स्वमात्मानमवलम्बो न यस्य हि ॥३६॥

आत्मा केवळ नित्यमुक्त । त्रिगुण गुणांसी अतीत ।

नभाहूनि अतिअलिप्त । सदोदित पूर्णत्वें ॥६१॥

ब्रह्म अखंडदंडायमान । सर्वदा स्वानंदघन ।

ऐसें अलिप्तीं प्रपंचभान । तो मिथ्या जाण आरोपु ॥६२॥

आरोपासी अधिष्ठान । स्वयें परमात्मा आपण ।

यालागीं प्रपंचाचें भान । तेथेंचि जाण आभासे ॥६३॥

परमात्म्याहूनि भिन्न । प्रपंचासी नाहीं स्थान ।

यालागीं उत्पत्ति स्थिति निदान । तेथेंचि जाण आभासे ॥६४॥

जेवीं दोराचा सर्प पाहीं । दोरावेगळा न दिसे कंहीं ।

दोर सर्प झालाचि नाहीं । तरी त्याच्या ठायीं आभासे ॥६५॥

तेवीं निर्विकल्प पूर्ण ब्रह्म । नातळे रुप नाम गुण कर्म ।

तरी त्याच्या ठायीं मनोभ्रम । प्रपंच विषम परिकल्पी ॥६६॥

जेवीं दोरीं भासे मिथ्या सर्प । तेवीं ब्रह्मीं मिथ्या भवारोप ।

तेथ सुखदुःख भयकंप । तोही खटाटोप मायिक ॥६७॥

एवं प्रपंचाचें मिथ्या भान । वस्तु शुद्धत्वें स्वानंदघन ।

हें निर्दुष्ट केलें निरुपण । ब्रह्म परिपूर्ण अद्वय ॥६८॥

एवं नाना युक्तीं सुनिश्चित । ब्रह्म साधिलें अबाधित ।

हें न मानिती जे पंडित । तें मत खंडित श्रीकृष्ण ॥६९॥