श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३७ वा

यन्नामाकृतिभिर्ग्राह्यं, पञ्चवर्णमबाधितम् ।

व्यर्थेनाप्यर्थवादोऽयं, द्वयं पण्डितमानिनाम् ॥३७॥

वेदवेदांप्रतिपाद्य एथ । सकळ शास्त्रार्थाचें निजमथित ।

ब्रह्म अद्वय सदोदित । म्यां सुनिश्चित नेमिलें ॥५७०॥

तें हें माझें निजमत । उपेक्षूनियां जे पंडित ।

ज्ञातेपणें अतिउन्मत्त । अभिमानयुक्त पांडित्यें ॥७१॥

त्या पंडितांचें पांडित्यमत । प्रपंच प्रत्यक्ष अनुभूत ।

तो मिथ्या मानोनियां एथ । कैंचें अद्वैत काढिलें ॥७२॥

अद्वैतासी नाहीं गावो । जेथ तेथ जरी पाहों जावों ।

अद्वैता नाहीं नेमस्त ठावो । यालागीं पहा हो तें मिथ्या ॥७३॥

रुप नाम गुण कर्म । पंचभूतें भौतिकें विषम ।

चतुर्वर्ण चारी आश्रम । सत्य परम मानिती ॥७४॥

सत्य मानावया हेंचि कारण । मनोभ्रमें भ्रमले जाण ।

ज्ञानाभिमानें छळिले पूर्ण । आपण्या आपण विसरले ॥७५॥

मुख्य मानिती विषयसुख । विषयार्थ पुण्य करावें चोख ।

स्वर्ग भोगावा आवश्यक । हें सत्य देख मानिती ॥७६॥

विषय सत्य मानिती परम । हें देहाभिमानाचें निजवर्म ।

तेणें सज्ञान केले अधम । मरणजन्म भोगवी ॥७७॥

पुढती स्वर्ग पुढती नरक । पुढती जननीजठर देख ।

यापरी पंडित लोक । केले ज्ञानमूर्ख अहंममता ॥७८॥

त्यांचें ज्ञान तें वेदबाह्य । सर्वथा नव्हे तें ग्राह्य ।

जैसें अत्यंजाचें अन्न अग्राह्य । तैसें तें होय अतित्याज्य ॥७९॥

ज्ञानाभिमानियाचा विचार । तें अज्ञानाचें सोलींव सार ।

तयाचा जो निजनिर्धार । तो जाण साचार महामोहो ॥५८०॥

तयाचा जो निजविवेक । इंद्रावणफळाऐसा देख ।

वरी साजिरें आंत विख । तैसा परिपाक ज्ञानाभिमानियांचा ॥८१॥

नामरुपात्मक प्रपंच । मिथ्या मायिकत्वें आहाच ।

ज्ञानाभिमानी मानूनि साच । वृथा कचकच वाढविती ॥८२॥

प्रपंचरचनेची कुसरी । आपण जैं मानावी खरी ।

तैं देहबुद्धि वाजली शिरीं । दुःखदरिद्रीं निमग्न ॥८३॥

त्यांची योग्यता पाहतां जाण । गायत्रीतुल्य वेदपठण ।

सकळ शास्त्रें जाणे पूर्ण । श्रुति पुराण इतिहास ॥८४॥

अतिनिःसीम वक्तेपण । समयींचे समयीं स्फुरे स्फुरण ।

तेणें वाढला देहाभिमान । पंडितंमन्य अतिगर्वीं ॥८५॥

नेणे अद्वैतसमाधान । तरी योग्यतागर्व गहन ।

निजमताचा मताभिमान । प्राणान्तें जाण सांडीना ॥८६॥

पंडितंमन्यांचें बोलणें । अवचटें नायकावें दीनें ।

जे नागवले देहाभिमानें । त्यांचेनि सौजन्यें अधःपात ॥८७॥

विषभक्षित्याचा पांतीकर । अत्याग्रहें झाला जो नर ।

त्यासी अप्रार्थितां मरणादर । अतिदुर्धर जीवीं वाजे ॥८८॥

यालागीं न धरावी ते संगती । त्यांसी न करावी वदंती ।

कदा नव जावें त्यांप्रति । ते त्याज्य निश्चितीं जीवेंभावें ॥८९॥

त्यांचे न लागावें बोलीं । त्यांचे न चालावें चालीं ।

जे ज्ञानाभिमानभुली । मुकले आपुली हितवार्ता ॥५९०॥

ते नाणावे निजमंदिरा । स्वयें न वचावें त्यांच्या द्वारा ।

त्यांसी न पुसावें विचारा । जे अभिमानद्वारा नाडले ॥९१॥

त्यांसी न व्हावी हाटभेटी । कदा न देखावे निजदृष्टीं ।

ते त्याज्य गा उठाउठीं । जेवीं धर्मिष्ठीं परनिंदा ॥९२॥

वेदशास्त्रांचा मथितार्थ । जो कां अद्वैत परमार्थ ।

तो ज्यांसी नावडे निजस्वार्थ । चाविरा अनर्थ त्यांपाशीं ॥९३॥

यालागीं त्यांची संगती । साक्षेपें सांडावी निश्चितीं ।

साधकाचे योगस्थिती । अंतरायनिवृत्ती हरि सांगे ॥९४॥