श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४० वा

कांश्चिन्ममानुध्यानेन, नामसङकीर्तनादिभिः ।

योगेश्वरानुवृत्त्या वा, हन्यादशुभदान् शनैः ॥४०॥

आधिव्याधींसीं सकळ विघ्न । विकल्प विकर्म देहाभिमान ।

ज्ञानाभिमानेंसीं दहन । करी ध्यानक्षण उद्धवा ॥१२॥

माझिया ध्यानाचे परिपाठीं । उपसर्ग पळती उठाउठी ।

शोधितां विघ्न न पडे दृष्टी । निर्द्वंद्व सृष्टी साधकां ॥१३॥

माझा लागल्या ध्यानभावो । उपसर्गाचा नुरेचि ठावो ।

सकळ विघ्नांचा अभावो । विकल्प वावो स्वयें होती ॥१४॥

म्हणशी ’घालोनि आसन । एकाग्र करोनियां मन ।

कैं ठसावेल तुझें ध्यान । तैं साधकां विघ्न बाधीना’ ॥१५॥

असो न टके माझें ध्यान । तैं सोपा उपाव आहे आन ।

माझें करितां नामकीर्तन । विघ्ननिर्दळण हरिनामें ॥१६॥

जेथ नामाचा घडघडाट । तेथ उपसर्गा न चले वाट ।

महाविघ्नांचा कडकडाट । करी सपाट हरिनामें ॥१७॥

अखंड माझी नामकीर्ती । ज्याच्या मुखास आली वस्ती ।

त्या देखोनि विघ्नें पळती । उपसर्गां शांती निःशेष ॥१८॥

माझ्या नामाचा निजगजर । पळवी महापापसंभार ।

उपसर्गां नुरवी थार । नाम सधर हरीचें ॥१९॥

अवचटें घेतां माझें नाम । सकळ पातकां करी भस्म ।

जेथ अखंड माझें गुणनामकर्म । तेथ विघ्नसंभ्रम स्पर्शेना ॥६२०॥

माझे नामकीर्तीचे पवाडे । ज्याची वाचा अखंड पढे ।

विघ्नें न येती तयाकडे । जेवीं सूर्यापुढें आंधार ॥२१॥

माझे नामकीर्तीवीण येथें । ज्याचें तोंड न राहे रितें ।

तो नागवे महाविघ्नांतें । जेवीं पतंगातें हुताशु ॥२२॥

नामकीर्ती दाटुगी होये । हें विश्वासें मानलें आहे ।

तें नाम मुखीं केवीं राहे । करावें काये म्हणशील ॥२३॥

मुखीं नामनिर्वाह व्हावा । यालागीं करावी साधुसेवा ।

संतसेवनीं सद्भावो जीवा । तेथ नव्हे रिघावा विघ्नांसी ॥२४॥

सद्भावें धरिल्या सत्संगती । त्या संगाचिये निजस्थिती ।

मुखीं ठसावे नामकीर्ती । विकल्प चित्तीं स्फुरेना ॥२५॥

मुखीं हरिनामाची गोडी । संतसेवेची अतिआवडी ।

तयाची गा प्रतापप्रौढी । उपसर्गकोडी निर्दळी ॥२६॥

साधकांसी पाठिराखा । संत झालिया निजसखा ।

तैं महाविघ्नांचिया मुखा । विभांडी देखा क्षणार्धें ॥२७॥

सेवितां साधूचें चरणोदक । अतिशुद्ध होती साधक ।

तेणें शुद्धत्वें महादोख । समूळ देख निर्दळी ॥२८॥

साधूंच्या चरणतीर्थापाशीं । सकल तीर्थें येती शुद्धत्वासी ।

भावें सेविती त्या तीर्थासी । ते उपसर्गांसी नागवती ॥२९॥

वंदितां साधुचरणरज । साधकांचें सिद्ध होय काज ।

निर्दळूनि विघ्नांएं बीज । स्वानंद निज स्वयें भोगिती ॥६३०॥

निजभाग्यगतीं अवचितां । संतचरणरेणु पडल्या माथां ।

तो कळिकाळातें हाणे लाथा । तेथ विघ्नांची कथा ते कोण ॥३१॥

निधडा शूर निजबळेंसीं । धुरां निजशस्त्र देऊनि त्यासी ।

युद्धीं थापटिलिया पाठीसी । तो विभांडी परांसी तेणें उल्हासें ॥३२॥

तेवीं सद्भावें सत्संगती । मुखीं अखंड नामकीर्ती ।

भावें करितां संतांची भक्ती । महाबाधा निर्दळिती साधक ॥३३॥

कीर्ति भक्ति सत्संगती । हे त्रिवेणी लाभे ज्याप्रती ।

त्यासी उपसर्ग नातळती । पावन त्रिजगती त्याचेनी ॥३४॥

माझी भक्ति आणि नामकीर्ती । यांची जननी सत्संगती ।

तो सत्संग जोडल्या हातीं । विघ्नें न बाधिती साधकां ॥३५॥

योग याग आसन ध्यान । तप मंत्र औषधी जाण ।

साधितां न तुटे देहाभिमान । तो सत्संग जाण निर्दळी ॥३६॥

योगादि सर्व उपायीं जाण । निवारिती अल्पविघ्न ।

विघ्नांचा राजा देहाभिमान । तो त्यांचेनि जाण ढळेना ॥३७॥

तो दुर्धर देहाभिमान । ज्ञातेपणीं अतिदारुण ।

याचें समूळ निर्दळण । सत्संग जाण स्वयें करी ॥३८॥

नेणपणाचा अभिमान । तत्काळ जाय निघोन ।

तैसा नव्हे ज्ञानाभिमान । चाविरा जाण जाणिवा ॥३९॥

त्याही अभिमानाचें निर्दळण । सत्संग निजांगें करी आपण ।

यालागीं सत्संगासमान । आन साधन असेना ॥६४०॥;

एकाचेनि निजमतें । अजरामर करावें देहातें।

तेही योगादि साधनांतें । मूर्खमतें साधिती ॥४१॥