श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


आरंभ

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो सद्गुरुदयार्णव । तुझे कृपेसी नाहीं थांव ।

कृपेनें तारिसी जीव । जीवभाव सांडवूनि ॥१॥

सांडवूनि देहबुद्धी । निरसोनि जीवोपाधी ।

भक्त तारिसी भवाब्धीं । कृपानिधी कृपाळुवा ॥२॥

तुझें पाहतां कृपाळूपण । जीवासी जीवें मारिसी पूर्ण ।

नामा रुपा घालिसी शून्य । जातिगोत संपूर्ण निर्दळिसी ॥३॥

निर्दळूनि आपपरां । निसंतान करिसी संसारा ।

तो तूं जिवलग सोयरा । कृपाळू खरा घडे केवीं ॥४॥

जेवीं आंधारीं नांदते दृष्टी । भासतीं नक्षत्रें खद्योतकोटी ।

ते आंधारेंसीं सूर्य घोंटी । तेवीं तुझी भेटी साधकां ॥५॥

तुझी जेथ साचार भेटी । तुवां केलिया कृपादृष्टी ।

संसारभेदाची त्रिपुटी । त्रिगुणेंसीं सृष्टी दिसेना ॥६॥

न दाखवूनि गुणादि सृष्टी । दाविसी अद्वय ब्रह्म दृष्टीं ।

तुझी झालिया भेटी । भेटीसी तुटी कदा न पडे ॥७॥

’जो कदा न देखिजे दृष्टीं । त्यासी केवीं होय भेटी ।

भेटीसी कदा न पडे तुटी । हेही गोष्टी घडे केवीं’ ॥८॥

जैसा गर्भ मातेच्या पोटीं । असोनि माउली न देखे दृष्टीं ।

तरी तिचे भेटीसी नव्हे तुटी । तेवीं तुझे पोटीं साधक ॥९॥

माता कळवळोनि पाळी तान्हें । शेखीं तें माउलितें नेणे ।

तेवीं तुजमाजीं अज्ञानें । तुवां प्रतिपाळणें निजलोभें ॥१०॥

जन्मल्या बाळाकारणें । माता वाढवी शहाणपणें ।

तेवीं तुझेनि निजज्ञानें । सज्ञान होणें साधकीं ॥११॥

साधकीं लाधतां तुझें ज्ञान । थितें नाठवे मीतूंपण ।

जीव विसरला जीवपण । अद्वय पूर्ण परमात्मा ॥१२॥

असोत या बहुता गोष्टी । नव्हतां सद्गुरुकृपादृष्टी ।

करितां उपायांच्या कोटी । नव्हे भेटी परमार्था ॥१३॥

जाहलिया सद्गुरुकृपादृष्टी । साधनें पळतीं उठाउठीं ।

ब्रह्मानंदें कोंदे सृष्टी । स्वानंदपुष्टी साधकां ॥१४॥

जाहलिया सद्गुरुकृपा प्राप्त । उपनिषदांचा मथितार्थ ।

साधकांचा चढे हात । कृपा समर्थ श्रीगुरुची ॥१५॥

सद्‌गुरुकृपा समर्थं । तेणें कृपें श्रीभागवत ।

वाखाणिलें जी प्राकृत । शुद्ध मथितार्थ सोलींव ॥१६॥

श्रीजनार्दनकृपादृष्टीं । माझ्या मराठया आरुष गोष्टी ।

रिघाल्या एकादशाचे पोटीं । स्वानंदतुष्टी निजबोधें ॥१७॥

संस्कृतप्राकृतपरवडी । सज्ञान सेविती स्वानंदगोडी ।

गाय काळी आणि तांबडी । परी दुधीं वांकुडी चवी नाहीं ॥१८॥

तेवीं संस्कृतप्राकृत भाखा । ब्रह्मासी पालट नाहीं देखा ।

उभय अभेदें वदला एका । साह्य निजसखा जनार्दन ॥१९॥

जनार्दनकृपेस्तव जाण । अष्टाविंशाचें निरुपण ।

गुह्य गंभीर स्वानंदघन । तेंही केलें व्याख्यान अतिशुद्ध ॥२०॥

तेथें नानाविधा उपपत्ती । निजबोधें साधूनि युक्ती ।

स्वयें बोलिला श्रीपती । ब्रह्मस्थिती निष्टंक ॥२१॥

ब्रह्म अद्वयत्वें परिपूर्ण । तेथ हेतु-मातु-अनुमान ।

न रिघे बुद्धीयुक्तीसीं मन । अगम्य जाण सर्वार्थीं ॥२२॥

नाहीं दृश्य-द्रष्टा-दर्शन । नाहीं ध्येय-ध्याता-ध्यान ।

कर्म-कर्ता कारण मी-तूंपण असेना ॥२३॥

युक्तीनें सांडिला प्राण । दृष्टांतीं वाहिली आण ।

प्रमाणें जाहलीं अप्रमाण । बोधेंसी क्षीण विवेक जहाला ॥२४॥

तेथ बोलणें ना मौन । आकार ना शून्य ।

गुण आणि निर्गुण । समूळ जाण असेना ॥२५॥

ऐसी ब्रह्माची निजस्थिति । कृष्णकृपा उद्धवासी प्राप्ती ।

अबळांसी अगम्य निश्चितीं । जन कैशा रीतीं तरतील ॥२६॥

ब्रह्मस्थिति अतिदुर्गम । हें उद्धवासी कळलें वर्म ।

साधकांचें साधावया काम । उपावो सुगम पूसत ॥२७॥

कृष्ण निजधामा जाईल आतां । मग ब्रह्मप्राप्ति न ये हाता ।

साधक गुंतती सर्वथा । उपाय तत्त्वतां कोण सांगे ॥२८॥

एवं साधकांचिया हिता । उद्धव कळवळोनि तत्त्वतां ।

सुगमत्वें ब्रह्मप्राप्ती ये हाता । तो उपाय अच्युता पूसत ॥२९॥

एकुणतिसावा निरुपण । ब्रह्मप्राप्तीचें सुगम साधन ।

सप्रेम भगवद्भजन । तें भक्तिलक्षण हरि सांगे ॥३०॥

सुगम साधनें ब्रह्मप्राप्ती । अबळांसी लाभे जैशा रीतीं ।

सा श्र्लोकीं देवासी विनंती । उद्धव तदर्थीं करितसे ॥३१॥