श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ६ वा

नैवोपयन्त्यपचितिं कवयस्तवेश, ब्रह्मायुषाऽपि कृतमृद्धमुदः स्मरन्तः ।

योऽन्तर्बहिस्तनुभृतामशुभं विधुन्वन्नाचार्यचैत्यवपुषा स्वगतिं व्यनक्ति ॥६॥

तुजमाजीं न विरतां साचार । ब्रह्मायु होऊनियां नर ।

योगयागें शिणतां अपार । प्रत्युपकार कदा न घडे ॥७१॥

असो सज्ञान ज्ञाते जन । करितां नानाविध साधन ।

तुझिया उपकारा उत्तीर्ण । अणुप्रमाण कदा नव्हती ॥७२॥

तो उपकार कोण म्हणसी । निजभक्तांच्या कल्मषांसी ।

सबाह्याभ्यंतर निर्दळिसी । उभयरुपेंसीं कृपाळुवा ॥७३॥

अंतरीं अंतर्यामीरुपें । बाह्य सद्गुरुस्वरुपें ।

भक्तांचीं सबाह्य पापें। सहित संकल्पें निर्दळिसी ॥७४॥

अंतर्यामी आणि सद्गुरु । उभयरुपें तूं करुणाकरु।

निरसूनि भक्तभवभारु । निजनिर्धारु धरविसी ॥७५॥

निजनिर्धाराचें लक्षण । सहजें हारपे मीतूंपण ।

स्वयें विरे देहाभिमान । जन्मजरामरण मावळे ॥७६॥

गेलिया जन्मजरामरण । सहजें होती आनंदघन ।

ऐसे तुझिया कृपें जाण । उपकारें पूर्ण निजभक्त ॥७७॥

ऐसी आपुली स्वरुपस्थिती । भक्तां अर्पिसी कृपामूर्ती ।

तो तूं निजस्वामी श्रीपती । पूज्य त्रिजगतीं त्रिदशांसी ॥७८॥

ऐसे तुझेनि निजप्रसादें । भक्त सुखी जाहले स्वानंदेम ।

ते उरलेनि प्रारब्धें । सदा स्वानंदबोधें वर्तती ॥७९॥

ते देहीं असोनि विदेही । कर्म करुनि अकर्ते पाहीं ।

ऐसे उपकार भक्तांच्या ठायीं । ते कैसेनि उतरायी होतील ॥१८०॥

तुज केवीं होइजे उत्तीर्ण । तुझेनि मनासी मनपण ।

तुझेनि बुद्धीसी निश्चयो जाण । इंद्रियां स्फुरण तुझेनी ॥८१॥

निमेषोन्मेषांचे व्यापार । तुझेनि चालती साचार ।

नीच नवे तुझे उपकार । उत्तीर्ण नर कदा नव्हती ॥८२॥

जें जें करावें साधन । तें सिद्धी पावे तुझे कृपेन ।

त्या तुज उत्तीर्णपण । सर्वथा जाण असेना ॥८३॥

यापरी करुनि उपकार । तुवां उद्धरिले थोरथोर ।;

आतां सुगमोपायें भवसागर । तरती भोळे नर तें सांग ॥८४॥

सुगमोपायें स्वरुपप्राप्ती । भाळेभोळे जन पावती ।

तैसा उपाय श्रीपती । कृपामूर्ति सांगावा ॥८५॥

तूं गेलिया निजधामा । दीन तरावया मेघश्यामा ।

सुगम उपायाचा महिमा । पुरुषोत्तमा मज सांग ॥८६॥

म्हणोनि घातिलें लोटांगण । मस्तकीं धरिले श्रीचरण ।

तरावया दीन जन । सुगम साधन सांगिजे ॥८७॥

उद्धवें प्रार्थिला श्रीपती । अबळें उद्धरावया निश्चितीं ।

त्याचेनि धर्में त्रिजगती । त्यासी कृपामूर्ति तुष्टला ॥८८॥

उद्धवें प्रार्थिला श्रीपती । तेणें सुखावला शुकही चित्तीं ।

उल्लासोनि स्वानंदस्थिती । म्हणे परीक्षिती सावध ॥८९॥

सुगम उपायस्थितीं । तरावया त्रिजगती ।

उद्धवें विनविला श्रीपती । त्यासी कृपामूर्ति तुष्टला ॥१९०॥

संसारतरणोपायबीज । ब्रह्मप्राप्तीचें ब्रह्मगुज ।

सुगमें साधे सहज निज । तें अधोक्षज सांगेल ॥९१॥

अबळें उद्धरावया निश्चितीं । उद्धवें प्रार्थिला श्रीपती ।

त्याचेनि धर्में त्रिजगती । सुगमस्थितीं तरेल ॥९२॥

निजधामा गेलिया श्रीकृष्णनाथ । दीनें तरावया समस्त ।

उद्धवें सेतु बांधिला एथ । ब्रह्मप्राप्‍त्यर्थ प्रश्नोक्तीं ॥९३॥

उद्धवें प्रार्थूनि श्रीकृष्ण । उद्धरावया दीन जन ।

ब्रह्मप्राप्तीची पव्हे जाण । सुगम संपूर्ण घातली ॥९४॥

एवं उद्धवप्रश्नस्थितीं । शुक सुखावे वचनोक्तीं ।

तेंचि परीक्षितीप्रती । सुनिश्चितीं सांगत ॥९५॥