श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ७ वा

श्रीशुक उवाच -

इत्युद्धवेनात्यनुरक्तचेतसा, पृष्टो जगत्क्रीडनकः स्वशक्तिभिः ।

गृहीतशक्तित्रय ईश्वरेश्वरो, जगाद सप्रेममनोहरस्मितः ॥७॥

जो ज्ञानियांचा शिरोमणी । जो ब्रह्मचार्‍यां मुकुटमणी ।

जो योगियांमाजीं अग्रगणी । जो सिद्धासनीं वंदिजे ॥९६॥

जो ब्रह्मज्ञानाचा निजनिधी । जो स्वानंदबोधाचा उदधी ।

जो भूतदयेचा क्षीराब्धी । तो शुक स्वबोधीं बोलत ॥९७॥

पांडवकुळीं उदारकीर्ती । कौरवकुळीं तुझेनि भक्ती ।

धर्मस्थापक त्रिजगतीं । ऐक परीक्षिति सभाग्या ॥९८॥

जग जें भासे विचित्रपणें । तें जयाचें लीलाखेळणें ।

खेळणेंही स्वयें होणें । शेखीं अलिप्तपणें खेळवी ॥९९॥

विचित्र भासे जग जाण । ज्याचेनि अंगें क्रीडे संपूर्ण ।

जग ज्याचें क्रीडास्थान । जगा जगपण ज्याचेनि ॥२००॥

ऐसा ’जगत्क्रीडनक’ श्रीकृष्ण । जो ईश्वराचा ईश्वर आपण ।

मायादि तिन्ही गुण । ज्याचेनि पूर्ण प्रकाशती ॥१॥

मायागुणीं गुणावतार । जे उत्पत्तिस्थितिक्षयकर ।

ब्रह्मा आणि हरि हर । तेही आज्ञाधर जयाचे ॥२॥

ऐशिया श्रीकृष्णाप्रती । उद्धवें सप्रेम विनंती ।

केली अतिविनीतस्थितीं । तेणें श्रीपति तुष्टला ॥३॥

बहुतीं प्रार्थिला श्रीकृष्ण । तो आपुलाल्या कार्यार्थ जाण ।

उद्धवें केला विनीत प्रश्न । जगदुद्धरण उपकारी ॥४॥

उद्धवाचिया प्रश्नोक्तीं । तोषोनि तुष्टला श्रीपती ।

सुगमोपायें ब्रह्मप्राप्ती । ते साधनस्थिती सांगेल ॥५॥

भाळेभोळे सात्त्विक जन । सवेग पावती समाधान ।

तो उद्धवप्रश्नें श्रीकृष्ण । सोपें ब्रह्मज्ञान सांगत ॥६॥

ज्ञानमार्गीचे कापडी । जीवें सर्वस्वें घालूनि उडी ।

उद्धवप्रश्नाचे आवडीं । ब्रह्म जोडे जोडी सुगमत्वें ॥७॥

लेऊनियां मोहममतेची बेडी । जे पडिले अभिमानबांदवडीं ।

त्यांचीही सुटका धडफुडी । उद्धवें गाढी चिंतिली ॥८॥

उद्धवाचें भाग्य थोर । प्रश्न केला जगदुपकार ।

तेणें तुष्टला शार्ङगधर । अतिसादर बोलत ॥९॥

दीनोद्धाराचा प्रश्न । उद्धवें केला अतिगहन ।

तेणें संतोषोनि श्रीकृष्ण । हास्यवदन बोलत ॥२१०॥

कृष्णवदन अतिसुंदर । तेंही हास्ययुक्त मनोहर ।

अतिउल्हासें शार्ङगधर । गिरा गंभीर बोलत ॥११॥