श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ९ वा

कुर्यात्सर्वाणि कर्माणि, मदर्थं शनकैः स्मरन् ।

मय्यर्पितमनश्चित्तो, मद्धर्माऽऽत्ममनोरतिः ॥९॥

देशाचारें कुलाचारें प्राप्त । वृद्धाचारादि जें एथ ।

जें कां वेदोक्त नित्यनैमित्य । ’कर्में’ समस्त या नांव ॥२३०॥

माझेनि उद्देशें कर्म जें एथ । या नांव ’साधारण-मदर्थ’ ।

कर्मा सबाह्य जे मज देखत । ’मुख्यत्वें मदर्थ’ आयास न करितां ॥३१॥

सकळ कर्म माझेनि प्रकाशे । कर्मक्रिया माझेनि भासे ।

ऐसें समूळ कर्म जेथ दिसे । तें ’अनायासें मदर्थ’ ॥३२॥

कर्माआदि मी कर्मकर्ता । कर्मीं कर्मसिद्धीचा मी दाता ।

कर्मी कर्माचा मी फळभोक्ता । या नांव ’कृष्णार्पणता’ कर्माची ॥३३॥

सहसा ऐसें नव्हे मन । तैं हें शनैःशनैः अनुसंधान ।

अखंड करितां आपण । स्वरुपीं प्रवीण मन होय ॥३४॥

मनासी नावडे अनुसंधान । तैं करावें माझें स्मरण ।

माझेनि स्मरणें मन जाण । धरी अनुसंधान मद्भजनीं ॥३५॥

भजन अभ्यास परवडी । मनासी लागे निजात्मगोडी ।

तेथें बुद्धि निश्चयेंसीं दे बुडी । देह अहंता सोडी अभिमान ॥३६॥

माझ्या स्वरुपावेगळें कांहीं । मनासी निघावया वाडी नाहीं ।

ऐसें मन जडे माझ्या ठायीं । ’मदर्पण’ पाहीं या नांव ॥३७॥

ऐसें मद्रूपीं निमग्न मन । तरी आवडे माझें भजन ।

माझिया भक्तीस्तव जाण । परम पावन मद्भक्त ॥३८॥

म्हणसी विषयनिष्ठ मन । कदा न धरी अनुसंधान ।

तेचि अर्थींचा उपाय पूर्ण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥३९॥