श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १९ वा

अयं हि सर्वकल्पनां, सध्रीचीनो मतो मम ।

मद्भावः सर्वभूतेषु, मनोवाक्कायवृत्तिभिः ॥१९॥

सर्व भूतीं भगवद्‌दृष्टी । हेंचि भांडवल माझे गांठीं ।

येणें भांडवलें कल्पकोटी । करोनि सृष्टीं मी अकर्ता ॥६८॥

मज पाहतां निजात्मपुष्टी । सर्वभूतीं भगवद्‌दृष्टी ।

हेचि भक्ति माझी गोमटी । ब्रह्मांडकोटीतारक ॥६९॥

हेचि भक्ति म्यां कल्पादी । सर्वभूतीं भगवद्बुद्धी ।

नाभिकमळीं त्रिशुद्धी । ब्रह्मा या विधीं उपदेशिला ॥३७०॥

व्रत तप करितां दान । योगयाग करितां ध्यान ।

वेदशास्त्रार्थें साधितां ज्ञान । माझ्या भक्तीसमान ते नव्हती ॥७१॥

नाना साधनांचिया कोटी । साधकीं साधितां आटाटी ।

माझ्या प्रेमाची नातुडे गोठी । मद्भक्त भेटीवांचूनी ॥७२॥

माझिया भक्तांचिये संगतीं । साधकां लाभे माझी भक्ति ।

अभेदभजनें माझी प्राप्ति । जाण निश्चितीं उद्धवा ॥७३॥

सर्वभूतीं भगवद्भजन । करितें ऐक पां लक्षण ।

विषमें भूतें देखतां जाण । मनीं भाव परिपूर्ण ब्रह्मत्वें ॥७४॥

दुष्ट दुरात्मा अनोळख । नष्ट चांडाळ अनामिक ।

तेथही ब्रह्मभाव चोख । हें ’मानसिक’ निजभजन ॥७५॥

भूतीं भगवंत परिपूर्ण । ऐसें जाणोनि आपण ।

भूतांसी लागे दारुण । तें कठिण वचन बोलेना ॥७६॥

तेथें जातांही निजप्राण । भूतांचे न बोले दोषगुण ।

या नांव गा ’वाचिक’ भजन । उद्धवा जाण निश्चित ॥७७॥

जेणें भूतांसी होय उपकार । ते ते करी देहव्यापार ।

भेदितांही निजजिव्हार । जो अपकारा कर उचलीना ॥७८॥

स्वयें साहूनियां अपकार । जो अपकारियां करी उपकार ।

ऐसा ज्याचा शरीरव्यापार । तें भजन साचार ’कायिक’ ॥७९॥

यापरी काया-वाचा-मनें । सर्वभूतीं भगवद्भजन ।

हेंचि मुख्यत्वें श्रेष्ठ साधन । भक्त सज्ञान जाणती ॥३८०॥

ब्रह्मप्राप्तीचें परम कारण । हेंचि एक सुगम साधन ।

मजही निश्चयें मानलें जाण । देवकीची आण उद्धवा ॥८१॥

हा भजनधर्म अतिशुद्ध । येथें विघ्नांचा संबंध ।

अल्पही रिघों न शके बाध । तेंचि विशद हरि सांगे ॥८२॥