श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २० वा

न ह्यङगोपक्रमे ध्वंसो, मद्धर्मस्योद्धवाण्वपि ।

मया व्यवसितः सम्यङ्‌, निर्गुणत्वादनाशिषः ॥२०॥

अनेक धर्म नाना शास्त्रार्थी । मन्वादि मुखें बोलिले बहुतीं ।

परी सर्वभूतीं भगवद्भक्ती । श्रेष्ठ सर्वार्थीं साधकां ॥८३॥

ये भक्तीचें हेंचि श्रेष्ठपण । इचे पूर्वारंभीं जाण ।

साधकांपाशीं अल्पही विघ्न । बाधकपण धरुं न शके ॥८४॥

ये भक्तीचें निजलक्षण । पूर्वारंभीं हे निर्गुण ।

एथ रिघावया विघ्न । दाटुगेंपण धरीना ॥८५॥

जेवीं गरुडाचे झडपेतळीं । होती सर्पाच्या चिरफाळी ।

तेवीं ये भक्तीजवळी । विघ्नांची होळी स्वयें होये॥८६॥

माझिया नामापुढें । विघ्न राहों न शके बापुडें ।

तें माझे भक्तीकडे । कोणते तोंडें येईल ॥८७॥

यापरी हे भक्ती सधर । उद्धवा तुझें भाग्य थोर ।

म्यां फोडूनि निजजिव्हार । साराचें सार सांगितलें ॥८८॥

निष्काम जे माझी भक्ती । तेथ विघ्नांची न पडे गुंती ।

परब्रह्माची ब्रह्मस्थिती। सुलभत्वें प्राप्ती साधकां ॥८९॥;

हेतुक अहेतुक कर्माचरण । तेंही करी जो कृष्णार्पण ।

ते उत्तम माझी भक्ती जाण । तेंचि निरुपण हरि सांगे ॥३९०॥