श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २६ वा

य एतन्मम भक्तेषु, सम्प्रदद्यात् सुपुष्कलम् ।

तस्याहं ब्रह्मदायस्य, ददाम्यात्मानमात्मना ॥२६॥

काया वाचा आणि चित्त । ग्रह दारा वित्त जीवित ।

निष्कामता मज अर्पित । अनन्य भक्त ते माझे ॥३६॥

ऐशिया भक्तांच्या ठायीं जाण । अवश्य उपदेशावें हें ज्ञान ।

त्याही उपदेशाचें लक्षण । पक्व परिपूर्ण तें ऐसें ॥३७॥

जेथ जेथ जाय साधकाचें मन । तेथ तेथ ब्रह्म परिपूर्ण ।

मन निघावया तेथून । रितें स्थान असेना ॥३८॥

ऐसें करितां अनुसंधान । चैतन्यीं समरसे मन ।

त्यातें म्हणिजे ’पुष्कल ज्ञान’ । उपदेश पूर्ण या नांव ॥३९॥

ऐसें समूळ ब्रह्मज्ञान । मद्भक्तांसी जो करी दान ।

त्याचा ब्रह्मऋणिया मी जाण । होय संपूर्ण उद्धवा ॥४४०॥

त्याचिया उत्तीर्णत्वासी । गांठीं कांहीं नाहीं मजपाशीं ।

मी निजरुप अर्पी त्यासी । अहर्निशीं मी त्याजवळी ॥४१॥

जो शिष्यांसी दे ब्रह्मज्ञान । मी परमात्मा त्या अधीन ।

ब्रह्मदात्याच्या बोलें जाण । स्त्रियादि शूद्रजन मी उद्धरीं ॥४२॥

देऊनियां परब्रह्म । जो मद्भक्तांसी करी निष्कर्म ।

त्याचा अंकित मी पुरुषोत्तम । तो प्रिय परम मजलागीं ॥४३॥

जो ब्रह्मज्ञान दे मद्भक्तां । तयाहूनि आणिक परता ।

मज आन नाहीं गा पढियंता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥४४॥

तो आत्मा मी शरीर जाण । त्याचा देह मी होय आपण ।

त्याचें जें जें कर्माचरण । तें तें संपूर्ण मीचि होय ॥४५॥

जैसा मी अवतारधारी । तैसाचि तोही अवतारी ।

त्या आणि मजमाझारीं । नाहीं तिळभरी अंतर ॥४६॥

जो या ब्रह्मज्ञानाचें करी दान । त्यासी यापरी मी आपण ।

करीं निजात्म अर्पण । तरी उत्तीर्ण नव्हेचि ॥४७॥

यालागीं वर्ततांही शरीरीं । मी अखंड त्याची सेवा करीं ।

निजात्म अर्पण प्रीतीवारी । मी त्याच्या घरीं सर्वदा ॥४८॥

त्यातें जें जें जडभारी । तेंही मी वाहें आपुले शिरीं ।

माझी चैतन्यसाम्राज्यश्री । नांदें त्याचे घरीं सर्वदा ॥४९॥

एकादशाचें ब्रह्मज्ञान । बोधूनि मद्भक्तां जो करी दान ।

त्यासी मी यापरी जाण । आत्मार्पण स्वयें करीं ॥४५०॥

असो न साधवे ब्रह्मज्ञान । तरी या ग्रंथाचेंचि पठण ।

जो सर्वदा करी सावधान । तो परम पावन उद्धवा ॥५१॥