श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २७ वा

य एतत्समधीयीत, पवित्रं परमं शुचि ।

स पूयेताहरहर्मां, ज्ञानदीपेन दर्शयन् ॥२७॥

निखळ जें कां ब्रह्मज्ञान । तो हा माझा तुझा संवाद जाण ।

जो सादरें करी पठण । सावधान श्रद्धाळू ॥५२॥

चढत्या वाढत्या परवडी । शुद्ध सात्त्विकी श्रद्धा गाढी ॥

पदोपदीं नीच नवी गोडी । अद्भुत आवडी पठणाची ॥५३॥

वाचेचिया टवळ्यांप्रती । श्रद्धास्नेहाची संपत्ति ।

निजजिव्हा करुनि वाती । जो हें ज्ञानदीप्ती प्रकाशी ॥५४॥

एकादशाचे ज्ञानदीप्ती । एकादश इंद्रियांच्या वाती ।

उजळूनि जे मज वोंवाळिती । ते पवित्र किती मी सांगूं ॥५५॥

यापरी जें ग्रंथपठण । तें माझें ज्ञान-निरांजन ।

तेणें ज्ञानदीपें जो जाण । माझें स्वरुप पूर्ण प्रकाशी ॥५६॥

त्याचे लागले जे संगती । त्यांतें ब्रह्मादिक वंदिती ।

त्यांचेनि पावन त्रिजगती । जाण निश्चितीं उद्धवा ॥५७॥

असो, ज्यांसी न टके पठण । तिंहीं श्रद्धेनें करितां श्रवण ।

त्यांसी न बाधी भवबंधन । तेंही निरुपण हरि सांगे ॥५८॥