श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३५ व ३६ वा

श्रीशुक उवाच -

स एवमादर्शितयोगमार्गस्तदोत्तमश्लोकवचो निशम्य ।

बद्धाञ्जलिः प्रीत्युषरुद्धकण्ठो न किञ्चिदूचेऽश्रुपरिप्लुताक्षः ॥३५॥

विष्टभ्य चित्तं प्रणयावघूर्णं, धैर्येण राजन् बहुमन्यमानः ।

कृताञ्जलिः प्राह यदुप्रवीरं, शीर्ष्णा स्पृशंस्तच्चरणारविन्दम् ॥३६॥

जो ज्ञानियांचा ज्ञाननिधी । जो निजबोधाचा उदधी ।

जो आनंदाचा क्षीराब्धी । तो श्रीशुक स्वानंदीं तोषला बोले ॥४६॥

ऐक बापा परीक्षिती । श्रवनसौभाग्यचक्रवर्ती ।

ज्यातें सुर नर असुर वानिती । ज्याची कीजे स्तुती महासिद्धीं ॥४७॥

ज्यातें वेद नित्य गाती । योगिवृंदीं वानिजे कीर्ती ।

तेणें श्रीकृष्णें स्तविली भक्ती । परम प्रीतीं अचुंबित ॥४८॥

अनन्यभक्तिपरतें सुख । आन नाहींच विशेख ।

सर्व सारांचें सार देख । मद्भक्ति चोख सुरवरादिकां ॥४९॥

भक्तियोगाचा योगमार्ग । समूळ सप्रेम शुद्ध साङग ।

स्वमुखें बोलिला श्रीरंग । तें उद्धवें चांग अवधारिलें ॥६५०॥

ऐकतां भक्तीचें निरुपण । उद्धवाचें द्रवलें मन ।

नयनीं अश्रु आले पूर्ण । स्वानंदजीवन लोटलें ॥५१॥

शरीर जाहलें रोमांचित । चित्त जाहलें हर्षयुक्त ।

तेणें कंठीं बाष्प दाटत । स्वेदकण येत सर्वांगीं ॥५२॥

प्राण पांगुळला जेथींचा तेथ । शरीर मंदमंद कांपत ।

नयन पुंजाळले निश्चित । अर्धोन्मीलित ते जाहले ॥५३॥

औत्सुक्याचे अतिप्रीतीं । स्वानंदीं समरसे चित्तवृत्ती ।

उद्धवदेहाची विरतां स्थिती । प्रारब्धें निश्चितीं तें राखिलें ॥५४॥

जळीं नांव उलथतां पूर्ण । जेवीं दोर राखे आवरुन ।

तेवी मावळतां उद्धवपण । प्रारब्धें जाण राखिलें ॥५५॥

धैर्याचेनि अतिसामर्थ्यें । आवरुनि प्रेमाचें भरितें ।

मी कृतकृत्य जाहलों एथें । हेंही निश्चितें मानिलें ॥५६॥

श्रीकृष्णें उद्धरिलें मातें । ऐशिया मानूनि उपकारातें ।

काय उतरायी होऊं मी यातें । ऐसे निजचित्तें विचारी ॥५७॥

गुरुसी चिंतामणि देवों आतां । तो चिंता वाढवी चिंतिलें देतां ।

गुरुंनीं दिधलें अचिंत्यार्था । तेणें उत्तीर्णता कदा न घडे ॥५८॥

गुरुसी कल्पतरु देवों जातां । तो कल्पना वाढवी कल्पिलें देतां ।

गुरुनें दिधली निर्विकल्पता । त्यासी उत्तीर्णता तेणें नव्हिजे ॥५९॥

गुरुसी देवों स्पर्शमणी । तो स्पर्शें धातु करी सुवर्णी ।

ब्रह्मत्व गुरुचरणस्पर्शनीं । त्यासी नव्हे उत्तीर्णी परीसही देतां ॥६६०॥

गुरुसी कामधेनु देऊं आणोनी । ते कामना वाढवी अर्थ देऊनी ।

गुरु निष्काम निर्गुणदानी । त्याचे उत्तीर्णी कामधेनु नव्हे ॥६१॥

त्रिभुवनींची संपत्ति चोख । गुरुसी देतां ते मायिक ।

जेणें दिधली वस्तु अमायिक । त्यासी कैसेनि लोक उतरायी होती ॥६२॥

देहें उतरायी होऊं गुरुसी । तंव नश्वरपण या देहासी ।

नश्वरें अनश्वरासी । उत्तीर्णत्वासी कदा न घडे ॥६३॥

जेणें अव्हाशंख दीधला आवडीं । त्यासी देऊनि फुटकी कवडी ।

उत्तीर्णत्वाची वाढवी गोडी । तैशी परवडी देहभावा ॥६४॥

जीवें उतरायी होऊं गुरुसी । तंव जीवत्वचि मिथ्या त्यासी ।

जेणें दिधलें सत्य वस्तूसी । मिथ्या देतां त्यासी लाजचि कीं ॥६५॥

जेणें दिधलें अनर्घ्य रत्‍नासी । वंध्यापुत्र देवों केला त्यासी ।

तेवीं मिथ्यत्व जीवभावासी । उत्तीर्णत्वासी कदा न घडे ॥६६॥

काया वाचा मन धन । गुरुसी अर्पितां जीवप्राण ।

तरी कदा नव्हिजे उत्तीर्ण । हें उद्धवें संपूर्ण जाणितलें ॥६७॥

जेथें अणुमात्र नाहीं दुःख । ऐसें दिधलें निजसुख।

त्या गुरुसी उतरायी देख । न होवें निःशेख शिष्यांसी ॥६८॥

यालागीं मौनेंचि जाण । उद्धवें घातलें लोटांगण ।

श्रीकृष्णाचे श्रीचरण । मस्तकीं संपूर्ण वंदिले ॥६९॥

मागां श्रीकृष्णें पुशिलें पहा हो । उद्धवा तुझा गेला कीं शोकमोहो ।

तेणें उद्धवासी जाहला विस्मयो । उत्तर द्यावया ठावो न घडेचि ॥६७०॥

आतां वंदोनि श्रीचरण । कृतांजली धरोनि जाण ।

उत्तर द्यावया आपण । श्रीकृष्णवदन अवलोकी ॥७१॥

जेवीं सेवितां चंद्रकर । चकोर तृप्तीचे दे ढेंकर ।

तेवीं उद्धव कृष्णसुखें अतिनिर्भर । काय प्रत्युत्तर बोलत ॥७२॥