श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३९ वा

वृक्णश्च मे सुदृढः स्नेहपाशो, दाशार्हवृष्ण्यन्धकसात्वतेषु ।

प्रसारितः सृष्टिविवृद्धये त्वया, स्वमायया ह्यात्मसुबोधहेतिना ॥३९॥

तुवां मायेनें सृजिले जन । ते सृष्टि व्हावया वर्धमान ।

स्त्री पुत्र सुहृद सज्जन । हा स्नेह संपूर्ण वाढविला ॥५॥

मी जन्मलों यादवकुळांत । तेथ वृष्णि-अंधक-सात्वत ।

इत्यादि सुहृद समस्त । अतिस्नेहयुक्त आप्तत्वें ॥६॥

तें सुहृदस्त्रीपुत्रस्नेहबंधन । त्या स्नेहपाशाचें छेदन ।

माझे बाळपणीं त्वां केलें जाण । जें खेळतां तुझें ध्यान मज लागलें ॥७॥

जेवीं वोडंबरी खेळतां खेळ । मोहिनी विद्या प्रेरी प्रबळ ।

ते विद्येचें आवरावया बळ । शक्त केवळ खेळ खेळविता ॥८॥

तेवीं तुझी स्वमाया जाण । जे कां सदा तुज अधीन ।

तिचे स्नेहपाश दारुण । तेणें बांधोनि जन अतिबद्ध केले ॥९॥

ते माझे स्नेहपाश जाण । त्वां पूर्वींच छेदिले आपण ।

जैं मज होतें बाळपण । तैंचि कृपा पूर्ण मज केली ॥७१०॥

तें भवबंध छेदितें जें शस्त्र । तुवां निजयुक्तीं फोडोनि धार ।

सतेज करुनियां खडतर । मजलागीं स्वतंत्र अर्पिलें ॥११॥

येणें शस्त्रबळें मी जाण । छेदूं शकें जगाचें बंधन ।

एवढी मजवरी कृपा पूर्ण । केली आपण दयालुत्वें ॥१२॥

संसार दुःखरुप जो का एथें । तोचि सुखरुप जाहला मातें ।

ऐशिये कृपेचेनि हातें । मज निश्चितें उद्धरिलें ॥१३॥

मी कृतकृत्य जाहलों एथें । परी कांहींएक मागेन तूतें ।

ते कृपा करावी श्रीकृष्णनाथें । म्हणोनि चरणातें लागला ॥१४॥