श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४१ वा

श्रीभगवानुवाच -

गच्छोद्धव मयाऽऽदिष्टो, बदर्याख्यं ममाश्रमम् ।

तत्र मत्पादतीर्थोदे, स्नानोपस्पर्शनैः शुचिः ॥४१॥

गंभीरगिरा बोले श्रीकृष्ण । उद्धवा तुज जाहलें ब्रह्मज्ञान ।

तुटलें स्नेहपाशबंधन । तरी ममाज्ञा करीं गमन बदरिकाश्रमा ॥८७॥

त्या बदरिकाश्रमाचें महिमान । लोकसंग्रहार्थ संपूर्ण ।

तरावया जडमूढ जन । स्वमुखें श्रीकृष्ण सांगत ॥८८॥

तो बदरिकाश्रम माझें स्थान । तेथ नित्य माझें अनुष्ठान ।

तया स्थानाचें दूरदर्शन । करी निर्दळण कलिकल्मषा ॥८९॥

ज्या पर्वताचें स्पर्शन । मानवां करी परम पावन ।

जें बदरीचें नामस्मरण । विभांडी दारुण महादोषां ॥७९०॥

तेथेंही माझें पादोदक । अलकनंदा पवित्र देख ।

जिचेनि स्पर्शमात्रें लोक । होती अलौकिक पावन ॥९१॥

जेथ श्रद्धायुक्त करितां स्नान । जीवाचें तुटे भवबंधन ।

ज्यासी घडे आचमन । तो उद्धरे जाण पितरेंसीं ॥९२॥

ऐसें बदरिकाश्रम माझें जाण । अतिशयें परम पावन ।

म्हणसी कैं केलें त्वां तें स्थान । तरी ऐक तें कथन उद्धवा ॥९३॥

रजोगुणें सृजिले जन । ते जाहले भोगकर्मीं प्रवीण ।

भोगासक्तीं बुडतां पूर्ण । दों रुपीं जाण मी अवतरलों ॥९४॥

तम निरसी रविचंद्र पूर्ण । तैसा मी जाहलों नरनारायण ।

बदरिकाचलामाजीं जाण । केला संपूर्ण नित्योदयो ॥९५॥

भज्यपूज्यत्वें मी नारायण । नररुपें मीचि भक्त जाण ।

तेथ भक्ति वैराग्य ज्ञान । म्यां आचरोन प्रकाशिलें ॥९६॥

तो बदरिकाश्रम माझें स्थान । तेथें सर्वदा मी आपण ।

अद्यापि करितों अनुष्ठान । भक्तिज्ञानवैराग्यें ॥९७॥

नरनारायणस्थितीं । मी अवतरलों जे पर्वतीं ।

तेथ तोडिले बोरीऐशी मागुती । माझी निजभक्ती फांपाइली ॥९८॥

यालागीं ’बदरिकाश्रम’ । त्या स्थळासी म्यां ठेविलें नाम ।

तेथें फिटे भवभ्रम । यापरी परम पावन तें स्थळ ॥९९॥

त्या बदरिकाश्रमाप्रती । तुवां जावें गा निश्चितीं ।;

ऐसें उद्धवा कल्पिसी चित्तीं । मज काय तीर्थी विवंचू ॥८००॥

मोक्षाहीवरील भक्ती । तुवां अर्पिली माझे हातीं ।

तेणें मी जाहलों कृतकृत्यार्थी । म्हणसी मज तीर्थीं चाड नाहीं ॥१॥

तुज माझी आज्ञा प्रमाण । अवश्य तेथें करावें गमन ।

मग उद्धवें धरोनियां मौन । मस्तकीं वचन वंदिलें ॥२॥

सद्भावें करुनि नमन । घेतां बदरिकाश्रमदर्शन ।

तो नर होय नारायण । एवढें महिमान त्या स्थळाचें ॥३॥

उद्धवा तुझ्या ठायीं पूर्ण ज्ञान । ज्ञान असोनि माझें भजन ।

तुझेनि चरणस्पर्शें जाण । होईल पावन बदरिकाश्रम ॥४॥

ऐसें ऐकोनि श्रीकृष्णवचन । उद्धवासी आलें रुदन ।

धांवोनि वंदिले श्रीचरण । सर्वथा गमन करीन आतां ॥५॥

ब्रह्मशापाचें निर्दळण । उद्धवाचें चुकवावया जाण ।

श्रीकृष्णें प्रबोधोनि पूर्ण । करवी गमन बदरिकाश्रमा ॥६॥

उद्धव ज्ञानियाचें ज्ञानरत्‍न । त्यासी वांचवूनि श्रीकृष्ण ।

विस्तारावया निजज्ञान । करवी गमन बदरिकाश्रमा ॥७॥

चुकवावया ब्रह्मशाप दारुण । उद्धवासी ’विशाळीं’ गमन ।

अन्यथा जाहलिया ब्रह्मज्ञान । कृष्ण तीर्थाटन नेमीना ॥८॥

उद्धवासी भवबंधन । बाळपणींचि नाहीं जाण ।

हें जाणोनियां श्रीकृष्ण । ब्रह्मशापाभेण तीर्था धाडी ॥९॥

तीर्थयात्रेचा अभिप्रावो । हाचि निश्चितें निजभावो ।

जाणोनि देवाधिदेवो । मोकली उद्धवो बदरिकाश्रमा ॥८१०॥

उद्धवा तुज गेलिया तेथ । थोर लोकोपकार होईल सत्य ।

तुझेनि धर्में निश्चित । दीन समस्त उद्धरती ॥११॥

म्हणसी पावल्या तें तीर्थ । म्यां कैसें वसावें तेथ ।

तेही अर्थी लोकहितार्थ । तुज इत्यर्थ सांगेन ॥१२॥

उद्धवा तुझें जें आचरण । तोचि जनांसी उपदेश जाण ।

यालागीं वैराग्य-भक्ति-ज्ञान । स्वधर्माचरन सांडूं नको ॥१३॥

त्रिभुवनामाजीं सर्वथा । उद्धवा मज नाहीं कर्तव्यता ।

तोही मी लोकसंग्रहार्था । होय वर्तता निजधर्मीं ॥१४॥

तूं ऐसें म्हणसी आतां । ’त्रैलोक्य असे तुझ्या माथां ।

यालागीं लोकसंग्रहाथा । तूं होसी वर्तता स्वधर्मकर्मीं’ ॥१५॥

मी निजधामा जातों आपण । यालागीं माझी स्थिती पूर्ण ।

ते पूर्णता तुज म्यां अर्पिली जाण । लोकसंग्रहार्थ पूर्ण तूं विरक्त होईं ॥१६॥

अभेदभक्ती वैराग्य ज्ञान । स्वयें आचरोनि आपण ।

देखीं लावावे इतर जन । ’लोकासंग्रह’ जाण या नांव ॥१७॥

(संमतश्लोक-भगवद्गीता)

न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसंगिनाम् ।

जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन्

॥ (अ.३ श्लोक २६)*

उद्धवा माझिये ज्ञानप्राप्ती । तूं वंद्य जाहलासी त्रिजगतीं ।

तुझी जे आचरती स्थिती । तेचि लोकीं समस्तीं करिजेल ॥१८॥

आतां तुझेनि मिसें जाण । साडेतीं श्र्लोकींचें निरुपण ।

लोकसंग्रहार्थ सांगेन । तैसेंचि वर्तन करावें तुवां ॥१९॥

तुज पावलिया बदरिकाश्रमातें । तेथ विद्यमान बहुत तीर्थें ।

परी अलकनंदा मुख्य तेथें । जे नाशी दोषांतें दर्शनमात्रें ॥८२०॥