श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४६ वा

सुदुस्त्यजस्नेहवियोगकातरो, न शक्नुवंस्तं परिहातुमातुरः ।

कृच्छ्रं ययौ मूर्धनि भर्तृपादुके, बिभ्रन्नमस्कृत्य ययौ पुनः पुनः ॥४६॥

आणिकांचा सेन्ह अतिबाधक । त्यातें सांडवी वेदविवेक ।

तैसा कृष्णस्नेह नव्हे देख । तो सुखदायक स्नेहाळू ॥८७०॥

उद्धवासी स्वाभाविक । गुरु परब्रह्म दोनी एक ।

इतरांसी भावनात्मक । उद्धवासी देख स्वतःसिद्ध ॥७१॥

ऐसा श्रीकृष्णस्नेहो आवश्यक । उद्धवासी सुखदायक ।

त्या श्रीकृष्णासी सांडितां देख । आत्यंतिक विव्हळ ॥७२॥

निःशेष निमाली विषयावस्था । जरी वृद्ध जाहली पतिव्रता ।

तरी त्यागावा निजभर्ता । हें तिशीं सर्वथा नावडे ॥७३॥

तेवीं अनुभवूनि परमार्था । उद्धव पावला जीवन्मुक्तता ।

तरी सद्गुरु श्रीकृष्ण त्यागितां । अतिविव्हळता गुरुप्रेमें ॥७४॥

स्नेहें द्वेषें सकामेंसीं । जे जे वेधले श्रीकृष्णासी ।

ते ते पावले परमानंदासी । त्या श्रीकृष्णासी त्यजी कोण ॥७५॥

(संमत श्लोक)

काम क्रोधं भयं स्नेहमैक्यं सौहृदमेव च ।

नित्यं हरौ विदधतो, यान्ति तन्मयतां हि ते ॥

अविधीं रातलीं श्रीकृष्णासी । तीं वंद्य जाहलीं ब्रह्मादिकांसी ।

मा उद्धव विकला गुरुप्रेमांसी । केवीं श्रीकृष्णासी त्यजील ॥७६॥

ज्यासी परब्रह्मत्वें गुरुभक्ती । त्यासी तृणप्राय जीवन्मुक्ती ।

जाहलीही मुक्ती उपेक्षिती । विकिले गुरुभक्तीं अनन्यत्वें ॥७७॥

उल्लंघूं नये सद्गुरुवचन । करावें बदरिकाश्रमीं गमन ।

श्रीकृष्णप्रेमा पढिये पूर्ण । तो सर्वथा जाण निघों नेदी ॥७८॥

ऐसें उभयतां अतिसंकट । उद्धवासी वोढवलें दुर्घट ।

श्रीकृष्णप्रेमें उतटे पोट । न देखे वाट बदरीची ॥७९॥

त्यागोनि जावें जरी कृष्णनाथ । तरी हा निजधामा जाईल आतां ।

मग मी न देखें मागुता । यालागीं अवस्था अनावर ॥८८०॥

नवजलदघनतनु । श्याम राजीवलोचनु ।

आनंदविग्रही श्रीकृष्णु । ब्रह्म परिपूर्णु पूर्णत्वें ॥८१॥

मुकुट कुंडलें मेखळा । तिलक रेखिला पिंवळा ।

पदक एकावली गळां। कंठीं तेजागळा कौस्तुभ ॥८२॥

वांकीअंदुवांचा गजर । चरणीं गर्जत तोडर ।

विद्युत्प्राय पीतांबर । तेणें शार्ङगधर शोभत ॥८३॥

कांसे विराजे सोनसळा । अपाद रुळे वनमाळा ।

घवघवीत घनसांवळा । देखतां डोळां मन निवे ॥८४॥

ऐसें श्रीकृष्णदर्शन । पुढती न देखें मी आपण ।

यालागीं उद्धव जाण । प्रेमें संपूर्न विव्हळ ॥८५॥

उद्धव पावला ब्रह्म पूर्ण । त्यासी सगुणाची अवस्था कोण ।

तरी श्रीकृष्णप्रभा प्रकाशे चिद्धन । आत्मवस्तु संपूर्ण श्रीकृष्ण ॥८६॥

घृत थिजलें कां विघुरलें । परी घृतपणा नाहीं मुकलें ।

तेवीं सगुणनिर्गुणत्वें मुसावलें । परब्रह्म संचलें श्रीकृष्ण ॥८७॥

त्याज्य सगुण पूज्य निर्गुण । हेही दशा आरती जाण ।

ज्यासी ब्रह्मरुप तृणपाषाण । त्यासी त्याज्य सगुण कदा नव्हे ॥८८॥

एवं सगुण आणि निर्गुण । उद्धवासी समसमान ।

गुरुत्वें कृष्णीं प्रेम गहन । तो त्यागितां पूर्ण विव्हळता ॥८९॥

परी आज्ञा नुल्लंघवे सर्वथा । म्हणोनि निघावें बदरीतीर्था ।

तंव श्रीकृष्णासी सांडूनि जातां । परमावस्था उद्धवीं ॥८९०॥

उद्धव प्रयाण अवसरीं । लोळणी घाली पायांवरी ।

चरण आलिंगुनी हृदयीं धरी । तरी जावया दूरी धीर नव्हे ॥९१॥

मज एथोनि गेलिया आतां । मागुती न देखें श्रीकृष्णनाथा ।

तेणें अनिवार अवस्था । पाऊल सर्वथा न घालवे ॥९२॥

मी निवालों कृष्णचरणामृतीं । मज चाड नाहीं महातीर्थी ।

त्याही मज अदृष्टगतीं । अंतीं श्रीपति त्यागवी ॥९३॥

सप्रेम चळचळां कांपत । कंठ जाहला सद्गदित ।

बाष्पें क्षणक्षणां स्फुंदत । स्वेदरोमांचित उद्धव ॥९४॥

गमनालागीं अतिउद्यत । पायां लागोनि पर्‍हा जात ।

सवेंचि येऊनि पायां लागत । विगुंतलें चित्त हरिप्रेमीं ॥९५॥

पुढती नमन पुढती गमन । पुढती घाली लोटांगन ।

पुढती वंदी श्रीकृष्णचरण । सर्वथा जाण निघवेना ॥९६॥

देखोनि उद्धवाचा भावो । परमानंदें तुष्टला देवो ।

यासी माझ्या ठायीं अतिस्नेहो । गुरुत्वें पहा हो अनन्य ॥९७॥

कृपा उपजली यदुनायका । आपुले चरणींच्या पादुका ।

उद्धवासी दिधल्या देखा । तेणें निजमस्तका ठेविल्या ॥९८॥

पादुका ठेवितांचि शिरीं । मी जातों कृष्णापासूनि दूरी ।

हें नाठवे उद्धवाअंतरीं । ऐशियापरी प्रबोधिला ॥९९॥

पादुका ठेवितांचि माथां । स्वयें उपशमे अवस्था ।

नमस्कारोनि श्रीकृष्णनाथा । होय निघता तदाज्ञा ॥९००॥

त्रिवार करोनि प्रदक्षिणा । अवलोकूनि श्रीकृष्णवदना ।

नमस्कारोनि श्रीचरणा । उद्धव कृष्णाज्ञा निघाला ॥१॥;

तृतीयस्कंधींचें निरुपण । उद्धवासी विदुरदर्शन ।

दोघां पडिलें आलिंगन । कुशल संपूर्ण पूशिलें ॥२॥

तेथ सांगतां कृष्णनिधन । उद्धव नव्हेचि दीनवदन ।

तें विदुरासी कळलें चिह्न । हा ब्रह्मज्ञान पावला ॥३॥

मरता गुरु रडता चेला । दोंहीचा बोध वायां गेला ।

साच मानी जो या बोला । तोही ठकला निश्चित ॥४॥

यासी तुष्टली श्रीकृष्णकृपामूर्ती । निमाली मोहममतावृत्ती ।

पावला परमानंदप्राप्ती । स्वानंदस्थितीं डुल्लत ॥५॥

शब्दा नातळोनि बोल बोले । पृथ्वी नातळोनि सहजें चाले ।

असोनि नामरुपमेळें । नामरुपा नातळे हा एक ॥६॥

हा रसनेवीण सुरस चाखे । डोळ्यांवीण आपणपैं देखे ।

इंद्रियावीण सोलींव सुखें । निजात्मतोखें हा भोगी ॥७॥

निर्विकल्पनिजबोधेंसीं । त्यावरी भक्तिज्ञानवैराग्येंसीं ।

स्थिती देखोनि उद्धवापाशीं । विदुर मानसीं निवाला ॥८॥

मग तो विनवी उद्धवासी । तुज तुष्टला हृषीकेशी ।

तूं पावलासि ब्रह्मज्ञानासी । तें मज उपदेशीं सभाग्या ॥९॥

उद्धव म्हणे तुझें भाग्य धन्य । तुज अंतीं स्मरला श्रीकृष्ण ।

तुज सांगावया ब्रह्मज्ञान । मैत्रेयासी जाण आज्ञापिलें ॥९१०॥

कृष्ण मज जरी आज्ञा देता । तरी मी तत्काळ बोध करितों तत्त्वतां ।

तुज सद्गुरु परमार्था । जाण सर्वथा मैत्रेय ॥११॥

ऐकतां उद्धवाचें वचन । विदुर प्रेमें गहिंवरला पूर्ण ।

काय बोलिला आपण । सावधान अवधारा ॥१२॥

हें तृतीयस्कंधींचें निरुपण । प्रसंगें एथें आलें जाण ।

विदुर बोलिला अतिगहन । तेंचि वचन अवधारा ॥१३॥

(संमत श्लोक) -

क्वाहं कीटकवत्तुच्छ:, क्व च कारुण्यवारिधिः ।

तेनाहं स्मारितोऽस्म्यद्य, मुमुर्षुः केशवं यथा ॥१॥

विदुर म्हणे मी मशक । रंकांमाजीं अतिरंक ।

त्या मज स्मरे यदुनायक । कृपा अलोलिक दासांची ॥१४॥

नाठवीच देवकीवसुदेवांसी । नाठवीच बळिभद्रपांडवांसी ।

तो आठवी मज दासीपुत्रासी । हृषीकेशी कृपाळू ॥१५॥

जेवीं मरता स्मरे नारायण । तेवीं अंतीं मज स्मरला कृष्ण ।

यापरी भक्तप्रतिपाळू जाण । कृपासिंधु पूर्ण श्रीकृष्ण ॥१६॥

आशंका ॥ द्वारकेसी असतां श्रीकृष्ण । तैंचि उद्धवें केलें गमन ।

त्यासी प्रभासींचें कृष्णनिधन । म्हणाल संपूर्ण अदृश्य ॥१७॥

तरी उद्धवविदुरसंवादखूण । येचि अर्थीचें निरुपण ।

समूळ सांगेन कथन । तें सावधान अवधारा ॥१८॥

उद्धव जाता मार्गीं आपण । अवचितीं जाहली आठवण ।

न पाहतां कृष्णनिधन । मी कां गमन करितों हें ॥१९॥

श्रीकृष्णचरित्र अतिगोड । तें सांडूनि तीर्थी काय चाड ।

ऐसा विचार करुनि दृढ । श्रद्धेनें प्रौढ श्रद्धाळू ॥९२०॥

परतोनि कृष्णापाशीं जातां । तो मज राहों नेदी सर्वथा ।

कृष्णामागें कळों नेदितां । आला मागुता प्रभासेंसी ॥२१॥

तेथेंही राहोनियां गुप्त । पाहों लागला श्रीकृष्णचरित ।

तंव यादवकुळाचा घात । देखिला समस्त उद्धवें ॥२२॥

कुळ निर्दळूनि एकला । कृष्ण अश्वत्थातळीं बैसला ।

तेथ जराव्याधें बाण विंधिला । चरणीं लागला मृगशंका ॥२३॥

चरणीं लागतांचि घावो । थोर सुखें सुखावला देवो ।

कृतकार्य जाहलें निःसंदेहो । निजधामा पहा हो जावया ॥२४॥

बाण लागतां भलतेयांसी । घायें होती कासाविशी ।

ते दशा नाहीं श्रीकृष्णासी । देहत्व त्यासी अतिमिथ्या ॥२५॥

जेवीं घाय लागतां छायेसी । पुरुष नव्हे कासाविशी ।

तेवीं व्याधें विंधितां बाणेंसी । ग्लानी कृष्णासी असेना ॥२६॥

ते संधीं मैत्रेय आला । त्यासी ज्ञानोपदेश केला ।

ते काळीं विदुर आठवला । कृपा कळवळला श्रीकृष्ण ॥२७॥

आजी येथें विदुर असता । तरी मी ब्रह्मज्ञान उपदेशितों सर्वथा ।

मैत्रेया तुज सांगतों आतां । त्यासी तूं तत्त्वतां उपदेशीं ॥२८॥

पावोनि कृष्णगुह्यज्ञान । मैत्रेयासी परम सावधान ।

म्हणे कलियुग धन्य धन्य । ब्रह्मवादी जन बहुसाल होती ॥२९॥

"सर्वे ब्रह्म वदिष्यन्ति, सम्प्राप्ते च कलौ युगे ।

नैव तिष्ठन्ति मैत्रेय, शिश्नोदरपरायणाः" ॥२॥

वादकत्वें कलियुगाप्रती । बहुसाल ब्रह्मवादी होती ।

परी न राहती ब्रह्मस्थितीं । जाण निश्चितीं मैत्रेया ॥९३०॥

वदूनियां ब्रह्मज्ञान । होती शिश्नोदरपरायण ।

जिह्वा शिश्न जो आवरी संपूर्ण । त्यासीच ब्रह्मज्ञान कलियुगीं ॥३१॥

ऐकोनि मैत्रेयसंवादासी । उद्धव आला श्रीकृष्णापाशीं ।

प्रदक्षिणा करुनि त्यासी । मग पायांसी लागला ॥३२॥

ऐकून मैत्रेयाचें ज्ञान । देखोनि कृष्णाचें निर्याण ।

उद्धव निघाला आपण । तें ऐक लक्षण परीक्षिती ॥३३॥