श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४७ वा

ततस्तमन्तर्हृदि सन्निवेश्य, गतो महाभागवतो विशालाम् ।

यथोपदिष्टां जगदेकबन्धुना, ततः समास्थाय हरेरगाद्गतिम् ॥४७॥

जगाचें विश्रामधाम । जो पुरुषांमाजीं पुरुषोत्तम ।

तो हृदयीं धरोनि आत्माराम । उद्धव सप्रेम निघाला ॥३४॥

कृष्णाची पूर्णस्थिती । हृदयीं धरोनि सुनिश्चितीं ।

उद्धव विशाल तीर्थाप्रती । स्वानंदस्थितीं निघाला ॥३५॥

उद्धव स्वानंदस्थितिपूर्ण । जेथें जेथें करी गमन ।

ते ते लोक होती पावन । भक्तिज्ञानवैराग्यें ॥३६॥

जैसजैसी विवेकविरक्ती । तैसतैसी बोधक शक्ती ।

उपदेशित ज्ञानभक्ती । चालिला त्रिजगती उद्धरित ॥३७॥

ज्यांसी उद्धवासी जाहली भेटी । त्यांसी हरिभजनीं पडे मिठी ।

भवभय पडों नेदी दृष्टीं । बोधक जगजेठी उद्धव ॥३८॥

जे जे भगवद्भक्ति करित । ते ते ’भागवत’ म्हणिजेत ।

मुक्तीहीवरी भजनयुक्त । महाभागवत उद्धव ॥३९॥

उद्धवें आदरिली जे भक्ती । तिची किंकर नित्यमुक्ती ।

यालागीं ’महाभागवत’ स्थिती । बोलिजे निश्चितीं उद्धवा ॥९४०॥

निजशांतता अतिनिर्मळ । आत्मानुभवें अतिप्रांजळ ।

मोक्षाहीवरी भजनशीळ । भक्त विशाळ उद्धव ॥४१॥

ऐशी उद्धवाची विशाळता । तोही पावला विशालतीर्था ।

’विशाल’ म्हणावयाची कथा । ऐक आतां सांगेन ॥४२॥

जेथ श्रद्धामात्रें चित्तशुद्धी । स्मरणमात्रें निर्विकल्प बुद्धी ।

’नारायण’ नामें मोक्षसिद्धी । ’विशाल’ या विधीं बदरिकाश्रम ॥४३॥

जेथ जनहितार्थ नारायण । अद्यापि करितो अनुष्ठान ।

मोक्षमार्गी कृपा पूर्ण । यापरी विशाळपण बदरिकाश्रमातें ॥४४॥

जेथ अल्प तपें फळ प्रबळ । अल्पध्यानें आकळे सकळ ।

अल्प विरक्तीं मोक्ष केवळ । ऐसा फळोनि विशाळ बदरिकाश्रम ॥४५॥

जो अंतर्यामीं गोविंदु । जो जगाचा सुहृद बंधु ।

जो आत्माराम प्रसिद्धु । ज्याचेनि निजबोधु उद्धवा ॥४६॥

जैसा कृष्णें केला उपदेशु । तैसा बदरिकाश्रमीं रहिवासु ।

उद्धवें केला निजवासु । तोचि जनांसी विश्वासु परमार्थनिष्ठे ॥४७॥

जैसी उद्धवाची स्थिती गती । जैशी उद्धवाची ज्ञानभक्ती ।

जैशी उद्धवाची विरक्ती । तोचि जनांप्रती उपदेश ॥४८॥

जेथें गुरुसी विषयासक्ती । तेथें शिष्यासी कैंची विरक्ती ।

जेथ गुरुसी अधर्मप्रवृत्ती । तेथ शिष्यासी निवृत्ति कदा न घडे ॥४९॥

यालागीं उद्धवाचें आचरित । तेंचि आचरती जन समस्त ।

एवं परोपकारार्थ । उद्धव विरक्त बदरिकाश्रमीं ॥९५०॥

जैसें शिकवूनि गेला श्रीकृष्णनाथ । तैसेंचि उद्धव आचरत ।

त्याचेनि धर्में जन समस्त । जाहले विरक्त परमार्थीं ॥५१॥

परब्रह्माची निजप्राप्ती । दृढ करुनि गेला श्रीपती ।

तेचि उद्धवासी ब्रह्मस्थिती । अहोरातीं अखंड ॥५२॥

बैसतां घालूनि आसन । का करितां गमनागमन ।

उद्धवाचें ब्रह्मपण । सर्वथा जाण मोडेना ॥५३॥

विरक्ती आणि भोगासक्ती । दोनी देहावरी दिसती ।

या दोंहीहूनि परती । परब्रह्मस्थिती उद्धवीं ॥५४॥

विरक्तीमाजीं नव्हे विरक्त । भोगीं नव्हे भोगासक्त ।

या दोंहीहून अतीत । ब्रह्म सदोदित उद्धव ॥५५॥

तेथ प्रारब्धक्षयें जाण । त्या देहासी येतां मरण ।

उद्धव ब्रह्मीं ब्रह्म पूर्ण । जन्ममरण तो नेणे ॥५६॥

देहींचा देहात्मभावो । निर्दळूनि निःसंदेहो ।

उद्धवासी ब्रह्मानुभवो । श्रीकृष्णें पहा हो दृढ केला ॥५७॥

ऐशिया उद्धवासी देहांतीं । ’विदेहकैवल्या’ ची प्राप्ती ।

म्हणणें हें परीक्षिती । दृढ भ्रांती वक्त्याची ॥५८॥

घडितां मोडितां कांकण । घडमोडी नेणे सुवर्ण ।

तेवीं देहासीच जन्ममरण । उद्धव परिपूर्ण परब्रह्म ॥५९॥

उद्धवासी देहीं वर्ततां । तो नित्य मुक्त विदेहता ।

त्यासी देहांतीं विदेहकैवल्यता । हे समूळ वार्ता लौकिक ॥९६०॥

देह राहो अथवा जावो । हा ज्ञात्यासी नाहीं संदेहो ।

त्यासी निजात्मता ब्रह्मभावो । अखंड पहा हो अनुस्यूत ॥६१॥

देहासी दैव वर्तवि जाण । देहासी दैव आणी मरण ।

ज्ञाता ब्रह्मीं ब्रह्म पूर्ण । जन्ममरण तो नेणे ॥६२॥

देह असो किंवा जावो । आम्ही परब्रह्मचि आहों ।

दोरीं सापपण वावो । दोरेंचि पहा हो जेवीं होय ॥६३॥

जेथ मृगजळ आटलें । तेथें म्हणावें कोरडें जाहलें ।

जेव्हां होतें पूर्ण भरलें । तेव्हांही ओलें असेना ॥६४॥

तेवीं देहाची वर्तती स्थिती । समूळ मिथ्या प्रतीती ।

त्या देहाचे देहांतीं । विदेहकैवल्यप्राप्ती नवी न घडे ॥६५॥

यापरी बदरिकाश्रमाप्रती । उद्धवें बहुकाळ करुनि वस्ती ।

त्याचि निजदेहाचे अंतीं । भगवद्गती पावला ॥६६॥

’पावला’ हेही वदंती । लौकिक जाण परीक्षिती ।

तो परब्रह्मचि आद्यंतीं । सहज स्थिती पावला ॥६७॥

उद्धवाची भगवद्भक्ती । आणि निदानींची निजस्थिती ।

तेणें शुक सुखावला चित्तीं । कृष्णकृपा निश्चितीं वर्णित ॥६८॥