श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४९ वा

भवभयमपहन्तुं ज्ञानविज्ञानसारं, निगमकृदुपजर्‍हे भृङगवद्वेदसारम् ।

अमृतमुदधितश्चापाययद्भृत्यवर्गान् पुरुषमृषभमाद्यं कृष्णसंज्ञं नतोऽस्मि ॥४९॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे एकोनत्रिंशोऽध्यायः ॥२९॥

संसारभयें अति त्रासले । जे कृष्णासी शरण आले ।

त्यांचें भवभय हरावया वहिलें । जेणें मथन केलें वेदार्थाचें ॥९३॥

मथूनि उपनिषद्भार । काढिलें ज्ञानविज्ञानसार ।

ज्यालागीं शिणले ज्ञाते नर । तयांसी पैल मेर ठाकेना ॥९४॥

म्हणशी निगम मथितां । वेदासी जाहली परम व्यथा ।

कृष्ण वेदांचा आदिकर्ता । तो दुःख सर्वथा हों नेदी ॥९५॥

जेवीं स्वयें वांसरुं गाय दुहितां । वाहला न लगे सर्वथा ।

तेवीं श्रीकृष्ण वेद मथितां । वेदासी व्यथा बाधीना ॥९६॥

जो सर्वज्ञ हृषीकेश । वेदार्थसार-राजहंस ।

तेणें नेदितां दुःखलेश । वेदसारांश काढिला ॥९७॥

एवं वेदार्थनिजमथित । ज्ञानविज्ञानसारामृत ।

कृष्णें काढूनि इत्यंभूत । भृत्यहितार्थ कृपा अर्पी ॥९८॥

जेवीं हळुवारपणें षट्‌पद । काढी सुमनमकरंद ।

तेवीं मथूनियां वेद । श्रीकृष्णें सार शुद्ध काढिलें ॥९९॥

यापरी श्रीकृष्णनाथ । भक्तकृपाळू कृपावंत ।

काढूनि वेदसारामृत । निजभृत्या देत निर्भय ॥१०००॥

ऐसें वेदसारामृत पूर्ण । भृत्यासी पाजूनि श्रीकृष्ण ।

निजभक्तांचें जन्ममरण । निर्दळी संपूर्ण भवभय ॥१॥

जगाचें माया मुख्य कारण । कृष्ण मायेचेंही निजकारण ।

जें स्वरुप सच्चिदानंदघन । त्यासी संज्ञा ’श्रीकृष्ण’ नामाची ॥२॥

घेऊनि माया मनुष्यनट । पुरुषांमाजीं पुरुषश्रेष्ठ ।

पूर्ण ज्ञानें ज्ञाननिष्ठ । वंद्य वरिष्ठ श्रीकृष्ण ॥३॥

त्यासी कायावाचा आणि मन । सर्वार्थीं अनन्यशरण ।

यापरी श्रीशुक आपण । करी मनें नमन श्रीकृष्णा ॥४॥

ऐसें श्रीशुकें केलें नमन । तेणें परीक्षिती सप्रेम पूर्ण ।

भक्तकृपाळू एक श्रीकृष्ण । दुसरा जाण असेना ॥५॥

उद्धव पावला परम निर्वाण । सरलें ज्ञानकथानिरुपण ।

जगीं श्रेष्ठ भगवद्भजन । भक्तांअधीन श्रीकृष्ण ॥६॥

जें जें भक्तांचें मनोगत । तें तें पुरवी श्रीकृष्णनाथ ।

शेखीं निजपदही देत । कृपा समर्थ भक्तांची ॥७॥

निजधामा निघतां श्रीकृष्ण । जरी उद्धव न करितां प्रश्न ।

तरी हें परमामृतकथन । सर्वथा श्रीकृष्ण न बोलता ॥८॥

यालागीं उद्धवाचा महाथोर । जगासी जाहला उपकार ।

भक्तिज्ञानवैराग्यसार । ज्याचेनि शार्ङगधर स्वयें वदला ॥९॥

उद्धवाचेनि धर्में जाण । भवाब्धि तरे त्रिभुवन ।

ऐसें बोलविलें गुह्यज्ञान । सप्रेम भजन तद्युक्त ॥१०१०॥

उपेक्षून चारी मुक्ती । उद्धवें थोराविली हरिभक्ति ।

एवढी उद्धवें केली ख्याती । त्रिजगती तरावया ॥११॥

एकादशाचेनि नांवें । घातली भक्तिमुक्तीची पव्हे ।

एवढी कीर्ति केली उद्धवें । जडजीवें तरावया ॥१२॥

धेनूच्या ठायीं क्षीर पूर्ण । परी हाता न ये वत्सेंवीण ।

तेवीं श्रीकृष्णाचें पूर्ण ज्ञान । उद्धवें जाण प्रगट केलें ॥१३॥

कृष्णोद्धवसंवादकथन । तें अतिशयें ज्ञान गहन ।

तेथ मी अपुरतें दीन । केवीं व्याख्यान करवलें ॥१४॥

कृष्णोद्धवज्ञान गहन । त्याचें करावया व्याख्यान ।

साह्य जाहला जनार्दन । जो सर्वी सर्वज्ञ सर्वार्थीं ॥१५॥

पदपदार्थसंगतीं । ज्ञानाची परिपाकस्थिती ।

वैराग्ययुक्त भक्तिमुक्ती । हेही व्युत्पत्ती मी नेणें ॥१६॥

माझें जें कां मीपण । तेंही जाहला जनार्दन ।

तेव्हां पदपदार्थव्याख्यान । कर्ता जाण तो एक ॥१७॥

तो एका एकपणाचेनि भावें । ऐक्यता फावली स्वभावें ।

’एकाजनार्दन’ येणें नांवें । हा ग्रंथ देवें विस्तारिला ॥१८॥

माझे बुद्धीचीही बुद्धी । जनार्दन जाहला अर्थावबोधीं ।

कवित्वयुक्ति-पदबंधीं । वदता त्रिशुद्धी जनार्दन ॥१९॥

माझें नामरुप कर्म गुण । मूळीं पाहतां मिथ्या जाण ।

परी तेंही जाहला जनार्दन । ऐसें एकपण पढियंतें ॥१०२०॥

नांवें भावें एकपण । यालागीं तुष्टला जनार्दन ।

तेणें माझ्या नांवाऐसें जाण । जगीं एकपण प्रकाशिलें ॥२१॥

’एका’या नामाचें कौतुक । पढिये जनार्दनासी आत्यंतिक ।

तेणें तो मजशीं जाहला एक । ’मी तूं’ देख म्हणतांही ॥२२॥

’एका’ या नांवाचें कौतुक । जनार्दनासी ऐसें देख ।

एकत्वीं प्रकाशी अनेक । अनेकीं एक अविकारी ॥२३॥

नांवें एक भावें एक । त्यासी देवाचें सर्वदा ऐक्य ।

मग देखतां एकानेक । भिन्नत्व देख असेना ॥२४॥

हें एकत्व जंव न ये हाता । तंव न लाभे देवाची प्रसन्नता ।

एकत्वावांचूनि सर्वथा । अकर्तात्मता कळेना ॥२५॥

जंव कर्तव्याचा अहंभावो । तंव सर्वथा न भेटे देवो ।

अहंपाशीं बद्धतेशी ठावो । मुक्तता पहा हो तत्त्यागें ॥२६॥

नामरुपा एकपण । हेंचि माझें अनुष्ठान ।

तेणें तुष्टला जनार्दन । माझें मीपण तोचि जाहला ॥२७॥

जेवीं बाहुल्यांचें खेळणें । तेथ रुसणें आणि संतोषणें ।

हें खेळवित्याचें करणें । बाहुली नेणे तो अर्थ ॥२८॥

तेवीं माझेनि नांवें कविता । करुन जनार्दन जाहला वक्ता ।

यालागीं हें ग्रंथकथा । साधुसंतां पढियंती ॥२९॥

देह अहंता ग्रंथ करितां । एकही वोवी न ये हाता ।

येथ जनार्दन जाहला वक्ता । ग्रंथ ग्रंथार्था तेणें आला ॥१०३०॥

देखोनि मराठी गोठी । न म्हणावी वृथा चावटी ।

पहावी निजबोधकसवटी । निजात्मदृष्टीं सज्जनीं ॥३१॥

संस्कृत वंद्य प्राकृत निंद्य । हे बोल काय होती शुद्ध ।

हाही अभिमानवाद । अहंता बंध परमार्थी ॥३२॥

मोलें भूमि खणितां वैरागरीं । अवचटें अनर्घ्यरत्‍न लाभे करीं ।

तें रत्‍न सांपडल्या केरीं । काय चतुरीं उपेक्षा ॥३३॥

तेवीं संस्कृत आटाटी । करितां परमार्थीं नव्हे भेटी ।

तेचि जोडल्या मराठीसाठीं । तेथ घालिती मिठी सज्ञान ॥३४॥

चकोरां चंद्रामृतप्राशन । वायसां तेथें पडे लंघन ।

तेवीं हा महाराष्ट्र ग्रंथ जाण । फळाफळपण ज्ञानाज्ञानें ॥३५॥

देवासी नाहीं भाषाभिमान । संस्कृत प्राकृत दोनी समान ।

ज्या भाषा केलें ब्रह्मकथन । त्या भाषां श्रीकृष्ण संतोषे ॥३६॥

साजुक आणि सुकलीं । सुवर्णसुमनीं नाहीं चाली ।

तेवीं संस्कृत प्राकृत बोली । ब्रह्मकथेनें आली समत्वा ॥३७॥

संस्कृत भाषा निंदा केली । तरी ते काय पावन जाहली ।

प्राकृत भाषा हरिकथा केली । ते वृथा गेली म्हणवेना ॥३८॥

जंव जंव दृढ भाषाअभिमान । तंव तंव वक्त्यासी बाधक पूर्ण ।

ज्या भाषा केलें ब्रह्मकथन । ते होय पावन हरिचरणीं ॥३९॥

माझी मराठी भाषा उघडी । परी परब्रह्मेंसीं फळली गाढी ।

जे जनार्दनें लाविली गोडी । ते चवी न सोडी ग्रंथार्थ ॥१०४०॥

हे जनार्दनकवितावाडी । ब्रह्मरसें रसाळ गाढी ।

संतसज्जन जाणती गोडी । यालागीं जोडी जोडिला ग्रंथ ॥४१॥

उद्धवव्याजें स्वयें श्रीकृष्ण । वदला पूर्ण ब्रह्मज्ञान ।

येणें छेदूनि भवबंधन । दीनजन तरावया ॥४२॥

तो हा एकादशाऐसा ग्रंथ । जेथ ठाकठोक परमार्थ ।

येणें महाकवि समस्त । निजहितार्थ पावले ॥४३॥

पक्व फळीं शुक झेंपावे । तेथ मुंगीही जाऊनि पावे ।

तेवीं महाकवींचे घेऊनि मागोवे । मीही पावें प्राकृत ॥४४॥

महारायाच्या ताटापाशीं । रिगमु नाहीं समर्थांसी ।

तेथें सुखें बैसे माशी । तेवीं हा आम्हांसी प्राकृत ग्रंथ ॥४५॥

भोजनीं धरोनि बापाचा हात । गोड तें आधीं बाळक खात ।

तेवीं हा महाकवींच्या अनुभवांत । प्राकृतें परमार्थ मीही लाभें ॥४६॥

मी लाधलों सद्गुरुचरण । तेणें हें चालिलें निरुपण ।

बाप कृपाळु जनार्दन । ग्रंथ संपूर्ण तेणें केला ॥४७॥

म्हणाल पूर्ण जाहला परमार्थ । पुढें आहे महाअनर्थ ।

तैसा नव्हे गुह्यज्ञानार्थ । स्वयें श्रीकृष्णनाथ दावील ॥४८॥

माता पिता स्त्री पुत्र जन । जाती गोत सुहृद सज्जन ।

सकळ कुळासी येतां मरण । ममता श्रीकृष्ण कदा न धरी ॥४९॥

कृष्ण आज्ञा काळ वंदी माथां । एवढी हातीं असतां सत्ता ।

तरी कुळरक्षणाची ममता । श्रीकृष्णनाथा असेना ॥१०५०॥

ज्यासी देहीं निरभिमानता । ज्यासी बाधीना कुळाची ममता ।

ते देहींची निरहंकारता । श्रीकृष्ण आतां स्वांगें दावी ॥५१॥

तें ज्ञानपरिपाकनिर्वाण । अतिगोडीचें निरुपण ।

पुढिले दों अध्यायीं जाण । श्रीशुक आपण सांगेल ॥५२॥

ते ज्ञानगुह्य निजकथा । जनार्दनकृपा तत्त्वतां ।

एका जनार्दन वक्ता । अवधान श्रोतां मज द्यावें ॥५३॥

जेथ संत अवधान देती । ते कथा वोढवे परमार्थीं ।

एका जनार्दनीं विनंती । अवधान ग्रंथार्थीं मज द्यावें ॥५४॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे भगवदुद्धवसंवादे एकाकारटीकायां परमार्थप्राप्तिसुगमोपायकथनोद्धवबदरिकाश्रमप्रवेशो नाम एकोनत्रिंशोऽध्यायः ॥२९॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

अध्याय एकोणतिसावा समाप्त