श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ९ वा

सौदामन्या यथाऽऽकाशे, यान्त्या हित्वाऽभ्रमण्डलम् ।

गतिर्न लक्ष्यते मर्त्यैस्तथा कृष्णस्य दैवतैः ॥९॥

वीज तळपे अभ्रमंडळीं । ते कोठोनि आली कोठें गेली ।

गति नरां न लक्षे भूतळीं । तैशी श्रीकृष्णगति जाहली दुर्गम देवां ॥८५॥

वीज सकळ मनुष्यें देखती । परी न कळे येती जाती गती ।

तेवीं श्रीकृष्णाची अवतारशक्ती । न कळे निश्चितीं देवांसी ॥८६॥

तेथूनिया येथें येणें । कां येथूनिया तेथें जाणें ।

हें नाहीं श्रीकृष्णास करणें । तो सर्वत्र पूर्णपणें परिपूर्ण सदा ॥८७॥

द्यावया आकाशासी बिढार । सर्वथा रितें न मिळे घर ।

तेवीं श्रीकृष्ण परमात्मा सर्वत्र । गत्यंतर त्या नाहीं ॥८८॥

ऐसा श्रीकृष्ण गेला निजधामा । परमाद्भुत ज्याचा महिमा ।

अलक्ष्य लक्षेना कृष्णगरिमा । जाणोनि स्वाश्रमा निघाले देव ॥८९॥