श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १२ वा

मर्त्येन यो गुरुसुतं यमलोकनीतं, त्वां चानयच्छरणदः परमास्त्रदग्धम् ।

जिग्येऽन्तकान्तकमपीशमसावनीशः किं स्वावने स्वरनयन् मृगयुं सदेहम् ॥१२॥

श्रीकृष्णें येणेंचि देहेंसीं । जाऊनियां यमलोकासी ।

निग्रहूनि यमकाळासी । निमाल्या गुरुसुतासी आणिलें ॥१५॥

उत्तरेचिये गर्भस्थितीं । जळतां ब्रह्मास्त्रमहाशक्तीं ।

तुज राखिलें आकांतीं । स्वचक्र श्रीपती प्रेरोनी ॥१६॥

तुज राखावया हेंचि कारण । तुझी माता रिघाली शरण ।

श्रीकृष्ण शरणागतां शरण्य । संकटहरण निजभक्तां ॥१७॥

यादवांदेखतां द्वारकापुरीं । द्विजसुत राखितां सटीचे रात्रीं ।

अर्जुन नेमेंसीं प्रतिज्ञा करी । तंव तो सशरीरीं हारपला ॥१८॥

ब्राह्मणें निर्भर्स्तिलें त्यासी । थोर लाज जाहली अर्जुनासी ।

तेणें कळवळला हृषीकेशी । भक्तसाह्यासी पावला ॥१९॥

अर्जुनासहित हृषीकेशी । रथेंसीं रिघे क्षीरसागरासी ।

द्विजसुत होते नारायणापाशीं । ते द्वारकेसी आणिले ॥१२०॥

एवं भक्तसंकटनिवारण । निजांगें करी श्रीकृष्ण ।

कृष्णप्रतापाचें महिमान । ऐक सांगेन अलौलिक ॥२१॥

बाणासुराचा कैवारु । करुं आला महारुद्रु ।

सवें नंदी भृंगी वीरभद्रु । स्वामिकार्तिकेंसीं हरु जिंतिला कृष्णें ॥२२॥

उग्रासीही अतिउग्र । भयंकराही भयंकर ।

तो जिणोनि काळाग्निरुद्र । बाणभुजाभार छेदिला ॥२३॥

श्रीकृष्णवचन अतिअगाध । जेणें केला अपराध ।

तो स्वदेहेंसीं जराव्याध । स्वर्गा प्रसिद्ध धाडिला ॥२४॥

एवढें सामर्थ्य श्रीकृष्णापाशीं । तो काय राखूं न शके स्वदेहासी ।

देहीं देहत्व नाहीं त्यासी । गेला निजधामासी निजात्मता ॥२५॥

एवढें सामर्थ्य श्रीकृष्णापाशीं । तरी कां गेला निजधामासी ।

ये लोकीं तेणें देहेंसीं । राहतां त्यासी भय काय ॥२६॥

ऐसा पोटींचा आवांका । धरुन धरिशी आशंका ।

लोकाभिमान नाहीं यदुनायका । स्वेच्छा देखा स्थिति त्याची ॥२७॥