श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २० वा

रामपत्‍न्यश्च, तद्देहमुपगुह्याग्निमाविशन् ।

वसुदेवपत्‍न्यस्तद्गात्रं, प्रद्युम्नादीन् हरेः स्नुषाः ।

कृष्णपत्‍न्योऽविशन्नग्निं, रुक्मिण्याद्यास्तदात्मिकाः ॥२०॥

बळरामाचिया पत्‍नी । रेवत्यादि मुख्य करुनी ।

स्वपतीचा देह मनीं धरुनी । प्रवेशल्या अग्नीं तद्धयानयुक्त ॥३१॥

निमाल्या देवकी रोहिणी । इतरा ज्या वसुदेवपत्‍नी ।

त्याही प्रवेशल्या अग्नीं । देह धरुनी स्वपतीचा ॥३२॥

प्रद्युम्नासवें रती । प्रवेशली महासती ।

सांबासवें रुपवती । प्रवेशे निश्चितीं दुर्योधनकन्या ॥३३॥

अनिरुद्धासवें देखा । प्रवेशे रोचना आणि उखा ।

एवं कृष्णसुना सकळिका । यादवनायिका प्रवेशल्या अग्नीं ॥३४॥

अग्निप्रवेश श्रीकृष्णपत्‍नी । त्यांची अलोलिक करणी ।

त्यांमाजीं मुख्य रुक्मिणी । सत्यांशिरोमणी जगन्माता ॥३५॥

कृष्णनिर्याणें रुक्मिणी । तद्रूप जाहली तत्क्षणीं ।

जेवीं ज्वाळा मिळे वन्हीं । तेवीं कृष्णपणीं तदात्मक ॥३६॥

कृष्ण गेला जाणोनि रुक्मिणी । तटस्थ ठेली ते तत्क्षणीं ।

सांडूनि देहाची गवसणी । कृष्णस्वरुपमिळणीं तदात्मक झाली ॥३७॥

रुक्मिणीचा देह दहन । करावया नुरेचि प्रेतपण ।

कृष्ण पूर्णत्वें स्वयंभ पूर्ण । गति समान दोहींची ॥३८॥

येरी पट्ट-मुख्या सातजणी । आणि सोळासहस्त्र कामिनी ।

सर्वे प्रवेशल्या अग्नीं । श्रीकृष्णचरणीं तदात्मक ॥३९॥

जिंहीं भोगिलें कृष्णसुरतसुख । त्यांसी गति न्यूनाधिक ।

बोलतां वाचेसी लागे देख । जाहल्या तदात्मक कृष्णसंगें ॥२४०॥

जो वाचे स्मरे ’कृष्ण कृष्ण’ । तो तदात्मता पावे पूर्ण ।

मा जिंहीं स्वयें भोगिला श्रीकृष्ण । त्यांची दशा न्यून कदा न घडे ॥४१॥

ज्यासी लागे कृष्णाचा अंगसंग । त्याच्या लिंगदेहा होय भंग ।

त्यासी पूर्ण पदवी अभंग । भोगितां भोग तादात्म्य नित्य ॥४२॥

ज्याच्या ध्यानीं वसे श्रीकृष्णमूर्ती । त्यासी चारी मुक्ति वंदिती ।

मा जिंहीं स्वयें भोगिला श्रीपती । त्यांसी अन्यगती असेना ॥४३॥

ज्यांसी इहलोकीं श्रीकृष्णसंगती । त्यांसी परलोकीं अन्य गती ।

बोलतां सज्ञान कोपती । त्यांसी पूर्ण प्राप्ती पूर्णत्वें ॥४४॥

जो अडखळोनि गंगेसी पडे । त्याचें पातक तत्काळ उडे ।

मा ज्यासी विध्युक्त स्नान घडे । त्याचें पाप न झडे मग कैसेनी ॥४५॥

तेवीं कृष्णव्यभिचारसंगतीं । गोपी उद्धरल्या नेणों किती ।

त्याच्या निजपत्‍न्यासी अन्य गती । कैशा रीतीं घडेल ॥४६॥

तृण वल्ली मृग पाषाण । गायी गोपिका गौळीजन ।

कृष्णसंगें तरले पूर्ण । त्याचिया स्त्रियांसी अन्य गति कैशी ॥४७॥

यालागीं कृष्णसंगती । ज्यांसी घडे भलत्या रीतीं ।

ते उद्धरले गा निश्चितीं । जाण परीक्षिती कुरुराया ॥४८॥