श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २९ वा

इत्थं हरेर्भगवतो रुचिरावतार-वीर्याणि बालचरितानि च शंतमानि ।

अन्यत्र चेह च श्रुतानि गृणन्मनुष्यो, भक्तिं परां परमहंसगतौ लभेत ॥२८॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे एकत्रिंशोऽध्यायः ॥३१॥ समाप्त एकादशस्कंधः ॥

जन्मापासून ज्ञानघन । श्रीकृष्णचरित्र अतिपावन ।

ज्याचे संगतीं गोवळे जाण । अज्ञान जन उद्धरिले ॥३३०॥

ज्याचिया व्यभिचारसंगतीं । गोपी उद्धरल्या नेणों किती ।

कृष्ण श्यामसुंदरमूर्ती । अभिलाष चित्तीं दृढ धरितां ॥३१॥

देखोनि सुंदर कृष्ण मूर्ती । गायी वेधल्या तटस्थ ठाती ।

पशु उद्धरले कृष्णसंगतीं । मा गोपी नुद्धरती कैसेनि ॥३२॥

गायीगोपिकांचें नवल कोण । वृंदावनींचे तृण तरु पाषाण ।

कृष्णसंगें तरले जाण । ऐसा ज्ञानघन श्रीकृष्ण ॥३३॥

विषें भरोनियां निजस्तना । पूतना घेऊं आली प्राणा ।

तेही कृष्णसंगें जाणा । त्याच क्षणा उद्धरली ॥३४॥

कंसशिशुपाळादिकांसी । द्वेषेंचि तारी हृषीकेशी ।

चंदन लावितां अंगासी । अंगसंगें कुब्जेसी तारिलें ॥३५॥

उन्मत्त मदें अतिमूढ । मारुं आला कुवलयापीड ।

त्यासी मोक्षाचा सुरवाड । उद्धरिला सदृढ कृष्णाभिघातें ॥३६॥

अरिष्ट करुं आला श्रीकृष्णालागीं । तो अरिष्ट तारिला धरुनि शिंगीं ।

अघासुरें गिळितां वेगीं । चिरोनि दो भागीं उद्धरी कृष्ण ॥३७॥

कृष्णलक्षें लावूनि टाळी । बक ध्यानस्थ यमुनाजळीं ।

तोही श्रीकृष्णा सवेग गिळी । करुनि दोन फाळी तारिला कृष्णें ॥३८॥

उडवूं आला तृणावर्त । त्यासी कृष्णें भवंडिला आवर्त ।

अंगसंगेंचि कृष्णनाथ । कृपावंत वैरियां ॥३९॥

गोपाळ नेले चोरचोरुं । ठकूं आला व्योमासुरु ।

त्याचाही केला उद्धारु । मोक्षें उदारु श्रीकृष्ण ॥३४०॥

केशिया कंसाचा घोडा । श्रीकृष्णें मारुनि तारिला फुडा ।

मल्ल मर्दूनि मालखडां । मोक्षाचा उघडा सुकाळ केला ॥४१॥

काळिया नाथिला विखारु । वृक्षीं उपाडिला वत्सासुरु ।

भवाब्धीमाजीं श्रीकृष्ण तारुं । संगें उद्धारु जडमूढां ॥४२॥

जिंहीं खेळविला चक्रपाणी । ज्यांचे घरींचें प्याला पाणी ।

ज्यांचें चोरुनि खादलें लोणी । त्याही गौळणी उद्धरिल्या ॥४३॥

रुक्मया तारिला विटंबोनी । बाण तारिला भुजा छेदोनी ।

कुश (?) तारिला निर्दळूनी । मोक्षदानी श्रीकृष्ण ॥४४॥

जे जे मिनले सोयरिके । जे कां पाहूं आले कौतुकें ।

ते ते तारियेले यदुनायकें । दर्शनसुखें निववूनि ॥४५॥

पांडव तारिले पक्षपातें । वैरी तारिले शस्त्रघातें ।

यापरी श्रीकृष्णनाथें । उद्धरिलीं बहुतें निजसंगें ॥४६॥

वैरी तारिले द्वेषभावें । भक्त पावले भजनभावें ।

गोपी तारिल्या संगानुभवें । ज्या जीवें भावें अनुसरल्या ॥४७॥

गायी तारिल्या संरक्षणेंसीं । मयूर तारिले मोरविशीं ।

वृक्ष तारिले तुरंबोनि घोसीं । तारक हृषीकेशी पूर्वब्रह्मत्वें ॥४८॥

पूर्ण ब्रह्म श्रीकृष्णावतार । ज्ञानप्राधान्य लीला विचित्र ।

त्यांत परम पावन बाळचरित्र । वंद्य सर्वत्र सज्ञानां ॥४९॥

घेऊनि षड्‌गुणैश्चर्यसंपत्ती । अवतरली श्रीकृष्णमूर्ती ।

यश-श्री-औदार्य-कीर्ती । ज्ञान-वैराग्यस्थिती अभंग ॥३५०॥

इतर अवतारीं अवतरण । तेथें गुप्त केले साही गुण ।

कृष्णावतार ब्रह्म परिपूर्ण । पूर्ण षड्‌गुण प्रकाशिले ॥५१॥

यालागीं श्रीकृष्णावतारीं जाण । अनवच्छिन्न साही गुण ।

त्याचेनि अंगसंगें उद्धरण । सर्वांसी जाण सर्वदा ॥५२॥

उद्धरले श्रीकृष्णसंगतीं । अथवा कृष्णाचिया अतिप्रीतीं ।

तरले देखतां श्रीकृष्णमूर्ती । हें नवल निश्चितीं नव्हे एथें ॥५३॥

हेचि पैं गा श्रीकृष्णमूर्ती । अत्यावडीं गातां गीतीं ।

उद्धरले नेणों किती । अद्यापि उद्धरती श्रद्धाळू ॥५४॥

आवडीं गातां श्रीकृष्णकीर्ती । कीर्तिमंतां लाभे परम भक्ती ।

जीतें ’परा’ ऐसें म्हणती । ते चौथी भक्ती घर रिघे ॥५५॥

आर्तजिज्ञासु-अर्थार्थी । त्यांची सहजें राहे स्थिती ।

अखंड प्रकटे चौथी भक्ती । श्रीकृष्णकीर्ती स्वयें गातां ॥५६॥

आवडीं गातां श्रीकृष्णकीर्ती । सहजें होय विषयविरक्ती ।

शमदमादि संपत्ती । पायां लागती सहजेंचि ॥५७॥

श्रीकृष्णकीर्तीची जपमाळी । जो अखंड जपे जिव्हामूळीं ।

श्रीकृष्ण सर्वकाळीं । त्याजवळी सर्वदा ॥५८॥

आदरें जपतां श्रीकृष्णकीर्ती । श्रीकृष्ण प्रकटे सर्वभूतीं ।

सहजें ठसावे चौथी भक्ती । परमात्मस्थितीसमवेत ॥५९॥

जे भक्तीमाजीं जाण । पूज्य पूजक होय श्रीकृष्ण ।

मग पूजाविधिविधान । देवोचि आपण स्वयें होये ॥३६०॥

’अत्र गंध धूप दीप’ जाण । अवघेंचि होय श्रीकृष्ण ।

हें चौथे भक्तीचें लक्षण । आपणा आपण स्वयें भजे ॥६१॥

चौथे भक्तीचें विंदान । भोग्य भोक्ता होय श्रीकृष्ण ।

कृष्णेंसीं वेगळेपण । भक्तां अर्धक्षण असेना ॥६२॥

ते काळीं भक्तांसी जाण । देह गेह होय श्रीकृष्ण ।

जात गोत श्रीकृष्णचि आपण । संसार संपूर्ण श्रीकृष्ण होये ॥६३॥

ऐशी लाहोनि चौथी भक्ती । परमहंसाची श्रीकृष्णगती ।

ते कृष्णस्वरुप स्वयें होती । श्रीकृष्णकीर्ती वर्णितां ॥६४॥

जे स्वरुपीं नाहीं च्युती । तें कृष्णस्वरुप निश्चितीं ।

भक्त तद्रूप स्वयें होती । श्रीकृष्णकीर्ती वर्णितां ॥६५॥

श्रीकृष्णकीर्तीचें एकेक अक्षर । चहूं वेदांचें निजजिव्हार ।

सकळ शास्त्रांचें परम सार । श्रीकृष्णचरित्र कुरुराया ॥६६॥

जें वेदांचें जन्मस्थान । सकळ शास्त्रांचें समाधान।

षड्रदर्शनां बुझावण । तो आठवा श्रीकृष्ण पूर्णावतार ॥६७॥

अनंत अवतार झाले जाण । परी श्रीकृष्णावतार ज्ञानघन ।

त्याचें चरित्र अतिपावन । भवबंधनच्छेदक ॥६८॥

त्या श्रीकृष्णाची कृष्णकीर्ती । आदरें आठवितां चित्तीं ।

होय भवबंधनाची समाप्ती । जाण निश्चितीं नृपनाथा ॥६९॥

वैभव श्रीकृष्णकीर्तीसी । वैराग्य श्रीकृष्णकीर्तीपासीं ।

श्रीकृष्णकीर्ती वसे ज्यां मानसीं । ते कळिकाळासी नागवती ॥३७०॥

आळसें स्मरतां कृष्णकीर्ति । सकळ पातकें भस्म होती ।

ते श्रीकृष्णकीर्ति जे सदा गाती । त्यांसी चारी मुक्ती आंदण्या ॥७१॥

श्रीकृष्णकीर्तीचें एकेक अक्षर । निर्दळी महापातकसंभार ।

मोक्ष देऊनि अतिउदार । जगदुद्धारकारक ॥७२॥

बहु अवतारीं अवतरे देवो । परी ये अवतारींचा नवलावो ।

ज्ञानप्राधान्य लीला पहा हो । अगम्य अभिप्रावो ब्रह्मादि देवां ॥७३॥

जन्मापासून जो जो देहाडा । तो तो नीच नवा पवाडा ।

ब्रह्मसुखाचा उघडा । केला रोकडा सुकाळ ॥७४॥

अवतारांमाजीं श्रीकृष्ण । निजनिष्टंक ब्रह्म पूर्ण ।

त्याचें चरित्र ज्ञानघन । पठणें पावन जन होती ॥७५॥

ऐशी पावन कृष्णकीर्ती । पढतां वाचक उद्धरती ।

श्रद्धेनें जे श्रवण करिती । तेही तरती भवसिंधु ॥७६॥

कलियुगीं जन मंदमती । त्यांसी तरावया सुगमस्थितीं ।

श्रीकृष्ण पावन कीर्ती । कृपेनें निश्चितीं विस्तारली ॥७७॥

ऐसी पावन भगवत्कीर्ती । विस्तारली श्रीभागवतीं ।

त्यांत दशमस्कंधाप्रती । श्रीकृष्णकीर्ती अतिगोड ॥७८॥

उपजल्या दिवसापासूनी । चढोवढी प्रतिदिनीं ।

कीर्ती विस्तारी चक्रपाणी । दीनजनीं तरावया ॥७९॥

धरुनी नर-नटाचा वेष । अवतरला हृषीकेश ।

तेथें नानाचरित्रविलास । दिवसेंदिवस विस्तारी ॥३८०॥

त्याहीमाजीं बाळचरित्र । मधुर सुंदर अतिपवित्र ।

मालखडां जें केलें क्षात्र । परम पवित्र पावनत्वें ॥८१॥

जरासंध पराभवून । काळयवनातें निर्दाळून ।

तें अतिविचित्र विंदान । लाघवी श्रीकृष्ण स्वयें दावी ॥८२॥

रुक्मया रणीं विटंबून । शिशुपाळादि वीर गांजून ।

कृष्ण करी भीमकीहरण । ते परम पावन हरिलीला ॥८३॥

पट्टमहिषींचें वरण । भौमासुराचें निर्दळण ।

पारिजाताचें हरण । पाणिग्रहण सोळासहस्त्रांचें ॥८४॥

समुद्रीं वसवूनि द्वारावती । निद्रा न मोडतां निश्चितीं ।

मथुरा आणिली रातोरातीं । हे अभिनव कीर्ती कृष्णाची ॥८५॥

वत्सें वत्सप होऊनि आपण । आपुलें दावी पूर्णपण ।

ब्रह्मादिकां न कळे जाण । अवतारी श्रीकृष्ण पूर्णांशें ॥८६॥

खाऊनि भाजीचें पान । तृप्त केले ऋषिजन ।

ऐसीं चरित्रें ज्ञानप्राधान्य । परम पावन आचरला ॥८७॥

ऐसी श्रीकृष्णलीला परमाद्भुत । पाठकां करी परम पुनीत ।

ते दशमामाजीं समस्त । कथा साद्यंत सांगितली ॥८८॥

एकादशाची नवल स्थिति । मूळापासूनि परम प्राप्ती ।

ज्ञान-वैराग्य-भक्ती-मुक्ती । स्वमुखें श्रीपती संवादला ॥८९॥

प्रथमाध्यायीं वैराग्य पूर्ण । मुख्य अधिकाराचें लक्षण ।

नारदवसुदेवसंवाद जाण । भूमिशोधन साधकां ॥३९०॥

तेथें निमिजायंतसंवादन । निर्भयाचें कोण स्थान ।

उत्तम भागवत ते कोण । मायातरण कर्म ब्रह्म ॥९१॥

इत्यादि विदेहाचे नव * प्रश्न । नवांचीं नवही उत्तरें पूर्ण ।

तेचि नव नांगरण । क्षेत्रकर्षण अतिशुद्ध ॥९२॥

ते पंचाध्यायींच्या अंतीं । देवीं प्रार्थिला श्रीपती ।

कृष्ण कुलक्षयाच्या प्रांतीं । निजधामाप्रती निघेल ॥९३॥

हें उद्धवें जाणोनि आपण । निर्वेद केला जो संपूर्ण ।

तेचि कल्पनाकाशाचें निर्दळण । पालव्या छेदन विकल्पांच्या ॥९४॥

कामलोभांचे गुप्त खुंट । आडवूं लागले उद्भट ।

ते समूळ केले सपाट । अतितिखट अनुतापें ॥९५॥

क्रोधाचिया अतिजाडी । समूळ उपडिल्या महापेडी ।

शांति निवडक चोखडी । समूळ उपडी मूळेंसीं ॥९६॥

उद्धवचातक आर्तिहरण । वोळला श्रीकृष्ण कृपा-घन ।

क्षेत्र वोल्हावलें सबाह्य पूर्ण । लागली संपूर्ण निजबोधवाफ ॥९७॥

तेथें पूर्णब्रह्म निजबीज । चाडें तंतु सर्व परित्यज्य ।

श्रवणनळें अधोक्षज । पेरिलेंचि सहज स्वयें पेरी ॥९८॥

यदु अवधूत संवादस्थिती । चोविसां गुरुंची उपपत्ती ।

आगडु खणविला क्षेत्राप्रती । वोढाळ पुढती रिघों न शके ॥९९॥

चिकभरित जाहल्या पिकातें । भोरडया वोरबडिती तेथें ।

ते दशमाध्यायीं श्रीअनंतें । उडविलीं मतें भजनगोफणा ॥४००॥

अकरावे अध्यायीं जाणा । हुरडा ओंब्या आणि घोळाणा ।

तिळगुळेंसीं चाखविलें सुजाणां । मुक्तलक्षणांचेनि हातें ॥१॥

ते श्रियेचे भोक्ते एथ । सत्संगतीं भगवद्भक्त ।

ते बारावे अध्यायीं साद्यंत । कृपायुक्त सांगितले ॥२॥

विषयांची विषयावस्था । बाधक नोहे साधकांच्या चित्ता ।

तेचि त्रयोदशीं कथा । जाण तत्त्वतां सांगितली ॥३॥

एवं तेराव्या अध्यायाप्रती । जाहली पिकाची पूर्ण निष्पत्ती ।

तेचि हंसगीत उपपत्ती । समाधि श्रीपती सांगोनि गेला ॥४॥

समाधीं सांठवलें जें पीक । तें कैसेनि पावती साधक ।

तदर्थीं भजनपूर्वक । चौदावा देख निरुपिला ॥५॥

पीक चढतचढतां हातीं । माझारीं ऋद्धिसिद्धी झडपोनि नेतीं ।

ते सिद्धित्यागाची उपपत्ती । पंधराव्याप्रती दाविली ॥६॥

पीक न माये त्रिजगतीं । तरी त्याच्या सांठवना किती ।

त्या षोडशाध्यायीं विभूती । उद्देशें श्रीपती दावूनि गेला ॥७॥

क्षेत्र अधिकारी एथें जाण । चारी आश्रम चारी वर्ण ।

सतरावा अठरावा निरुपण । वांटे संपूर्ण विभागिले ॥८॥

एकूणिसाव्या अध्यायीं जाण । करुनि पिकाची संवगण ।

जेणें कोंडेनि वाढले कण । तो कोंडा सांडूनि जाण कण घ्यावे ॥९॥

ऐसे निवडिले जे शुद्ध कण । तेथें प्राप्ताप्राप्तीचें लक्षण ।

त्रिविधविभागनिरुपण । विसावा जाण निरुपिला ॥४१०॥

जे भागा आले शुद्ध कण । ते राखावे आपले आपण ।

गुणदोषांचे चोरटे जाण । खळें फोडून कण नेती ॥११॥

सर्वांच्या भागा येताती कण । परी खावों न लाहती चोरा भेण ।

थोर थोर नागविले जाण । यालागीं संरक्षण दृढ कीजे ॥१२॥

गुणदोषांची नवलकथा । मिळणीं मिळोनि आप्तता ।

ठकूनि नेती सर्वस्वतां । दाणाही हातां नेदिती येवों ॥१३॥

गुणदोष आतुर्बळी । सज्ञानातें तत्काळ छळी ।

जो गुणदोषांतें निर्दळी । तो महाबळी तिहीं लोकीं ॥१४॥

हे शिकवण उद्धवें ऐकतां । तो म्हणे चोरांचा प्रतिपाळिता ।

तुझा वेदचि गा तत्त्वतां । गुणदोष प्रबळता त्याचेनि अंगें ॥१५॥

मुख्य चोरांचा कुरुठा । तुझा वेदचि महाखाटा ।

त्यामाजीं गुणदोषाचा घरटा । नाना चेष्टा तो शिकवी ॥१६॥

एवं प्रतिपाळोनि गुणदोषांसी । वेद नागवी समस्तांसी ।

एवं उद्धवें वेदांच्या शिसीं । कुडेपणासी स्थापिलें ॥१७॥

तो वेदानुवाद नव्हे कुडा । ऐसा प्रतिपदीं दिधला झाडा ।

ते निरुपणीं अति चोखडा । अध्याय रोकडा एकविसावा ॥१८॥

चोर कोणे मार्गें येती । पिकलें पीक ज्या वाटां नेती ।

तो मार्ग बुजावया निश्चितीं । तत्त्वसंख्याउपजती बाविसावा ॥१९॥

मुख्यत्वें ज्ञानाचें संरक्षण । दृढ शांतीचें कारण ।

तें भिक्षुगीतनिरुपण । स्वयें श्रीकृष्ण सांगोनि गेला ॥४२०॥

मुख्य चोरांचें चोरटेपण । मनापाशीं असे जाण ।

तें मनोजयाचें लक्षण । भिक्षुगीतनिरुपण तेविसावा ॥२१॥

चोर जन्मती जिचे पोटीं । ते मुख्यत्वें प्रकृति खोटी ।

पिकल्या पिका करुनि लुटी । लपती शेवटीं तीमाजीं ॥२२॥

आदीं निर्गुण अंतीं निर्गुण । मध्यें मिथ्या प्रकृतीसीं त्रिगुण ।

हें मुख्य पिकाचें संरक्षण । केलें निरुपण चोविसावा ॥२३॥

मोकळें पीक असतां शेतीं । पशु पक्षी चोर रिघों न शकती ।

ते सहज संरक्षण उपपत्ती । निर्गुणोक्तीं पंचविसावा ॥२४॥

स्त्री कामाची धाडी जाण । सकळ पिकासी नागवण ।

पुरुरवा नागवला आपण । इतरांचा कोण पडिपाडू ॥२५॥

कामासक्ति करितां जाण । प्रमदाबंदीं पडिले पूर्ण ।

त्यांसी अनुताप करी सोडवण । हें केलें निरुपण सव्विसावां ॥२६॥

निकोप पीक लागल्या हातीं । त्याची करावया निष्पत्ती ।

क्रियायोगाची निजस्थिती । सत्ताविसाव्याप्रती प्रकाशिली ॥२७॥

एवं पीक भोगिलें सकळ । त्याचा परिपाक पक्वान्न सबळ ।

अठ्ठाविसावा अमृतफळ । अतिरसाळ निजगोडया ॥२८॥

मृदु मधुर अतिअरुवार । तेणें वासेंचि निवे जेवणार ।

त्याचा सेवितां ग्रासमात्र । सबाह्य अभ्यंतर नित्यतृप्ती ॥२९॥

आकांक्षेसी निवाली भूक । सुखावरी लोळे तृप्तिसुख ।

तो हा अठ्ठाविसावा देख । अलोकिक निजगोडया ॥४३०॥

अठ्ठाविसाव्याची निजगोडी । चाखाया अतिआवडीं ।

ब्रह्मादिकां अवस्था गाढी । चवी चोखडी अनुपम ॥३१॥

हें जीव्हेवीण जेवण । रसनेवीण गोडपण ।

अदंताचे दांत पाडूनि पूर्ण । आपुली आपण चवी चाखे ॥३२॥

श्रीकृष्णें परवडी ऐशी । ताट केलें उद्धवासी ।

एका जनार्दन चरणींची माशी । सुखें त्या रसासी स्वयें सेवी ॥३३॥

जेथ रिगमु नाहीं थोरथोरांसी । तेथें सुखेंचि रिघे माशी ।

एवं धाकुटे जे होती सर्वांशीं । कृष्णरस त्यांसी सुसेव्य ॥३४॥

अगम्य योगें योगभांडार । गुह्यज्ञानें ज्ञानगंभीर ।

परम सुखाचें सुखसार । अतिगंभीर अठ्ठाविसावा ॥३५॥

या जेवणीं जे धाले नर । त्यांचे तृप्तीचे सुखोद्गार ।

तो एकूणतिसावा सधर । अतिविचित्र निरुपण ॥३६॥

एकूणतिसाव्याची स्थिती । दृढ आकळली होय हातीं ।

तैं सकळ भागवताची गती । ये धांवती तयापाशीं ॥३७॥

एकूणतिसावा अध्यावो । साध्यसाधना एकात्मभावो ।

निर्दळोनि अहंभावो । परमानंदें पहा हो उद्गार देत ॥३८॥

सकळ भोजनां मंडण । तांबूल आणि चंदन ।

तो तिसावा एकतिसावा जाण । श्रीकृष्णनिर्याण निजबोधु ॥३९॥

येणें भोजनें जे नित्य तृप्त । त्यांसी ममताबाध नव्हे प्राप्त ।

सकळ कुळ निर्दळूनि एथ । निजधामा निश्चित हरि गेला ॥४४०॥

पूर्ण ब्रह्मानुभव ज्यासी । एथवरी ममता नसावी त्यासी ।

हें स्वांगें दावूनि हृषीकेशी । निजधामासी स्वयें गेला ॥४१॥

श्रीभागवत महाक्षेत्र । तेथें ब्रह्मा मुख्य बीजधर ।

नारद तेथें मिरासीकर । पेरणी विचित्र तेणें केली ॥४२॥

तेथें श्रीव्यासें अतिशुद्ध । बांधारे घातले दशविध ।

पीक पिकलें अगाध । स्वानंदबोध निडारे ॥४३॥

तेथ शुक बैसला सोंकारा । तेणें फोडिला हरिकथा पागोरा ।

पाप पक्ष्यांचा थारा । उडविला पुरा निःशेष ॥४४॥

त्याची एकादशीं जाण । उद्धवें केली संवगण ।

काढिले निडाराचे कण । अतिसघन कृष्णोक्तीं ॥४५॥

तेथ नानायुक्तिपडिपाडीं । उत्तमोत्तम प्रश्नपरवडी ।

केलीं पक्वान्नें चोखडीं । त्यांची नीच नवी गोडी अविनाशी ॥४६॥

ते अविनाशी निजगोडी । पदोपदीं अतिचोखडी ।

एकादशामाजीं रोकडी । उद्धवाचिये जोडी उपकार जगा ॥४७॥

त्या उद्धवाचे मागिले पंक्तीं । त्यक्तोदक श्रवणार्थी ।

शुकमुखें परीक्षिती । निजात्मतृप्तीं निमाला ॥४८॥

त्या समर्थाचिये पंक्तीं । भावार्थदीपिका धरोनि हातीं ।

श्रीधरें दावितां पदपदार्थी । निजात्मस्थितीं निवाला ॥४९॥

तेथ देशभाषा-पदपक्षेंसीं । एका जनार्दनकृपेची माशी ।

तृप्त होय अवघ्यांसरशीं । निषेध तिशी असेना ॥४५०॥

एका-जनार्दनी मांजर वेडें । भावार्थदीपिका उजियेडें

हे रस देखोनि चोखडे । ताटापुढें पैं आलें ॥५१॥

’मीयों मीयों’ करितां स्मरण । कृपेनें तुष्टले सज्जन ।

शेष प्रसाद देऊनि जाण । संतृप्त पूर्ण मज केलें ॥५२॥

एका जनार्दनाचें पोसणें । मी मांजर जाहलों नीचपणें ।

चाटितां संतांचें शेषभाणें । म्यां तृप्ती पावणें परिपूर्ण ॥५३॥

हो कां त्या समर्थांच्या ताटीं । ब्रह्मरसें पूर्ण भरली वाटी ।

ते मी अत्यंत प्रेमें चाटीं । स्वानंदपुष्टीं संतोषें ॥५४॥

जो काया मनें आणि वाचा । सद्भावें विनीत होय नीचा ।

तोचि अधिकारी एकादशाचा । हा जनार्दनाचा उपदेश ॥५५॥

जंव जंव देहीं ज्ञानाभिमान । जंव जंव योग्यता सन्मान ।

तंव तंव एकादशाचें ज्ञान । सर्वथा जाण अनोळख ॥५६॥

सर्वभूतीं भगवद्भजन । सद्भावें जंव नुपजे पूर्ण ।

तंववरी एकादशाचें ज्ञान । सर्वथा जाण कळेना ॥५७॥

यापरी श्रीभागवतक्षेत्र । पीक पिकलें परम पवित्र ।

तेथें सुखी होती साधक नर । ज्यांसी अत्यादर सर्वभूतीं ॥५८॥

एकादश क्षेत्र नव्हे जाण । हा चित्समुद्र परिपूर्ण ।

येथें जो जैसा होय निमग्न । तो तैसाचि आपण रत्‍नें लाभे ॥५९॥

हा एकादश नव्हे निर्धारीं । जीवगजेंद्राच्या उद्धारीं ।

सवेगवेगें पावला श्रीहरी । ज्ञानचक्र करीं घेऊनी ॥४६०॥

हेही नव्हे एकादशाची थोरी । अहं-हिरण्यकशिपू विदारी ।

तो हा प्रकटला नरहरी । भक्तकैवारी कृपापूर्ण ॥६१॥

गंगा यमुना दोनी साङग । कृष्ण उद्धव उत्तम चांग ।

गुप्त सरस्वती ज्ञानवोघ । त्रिवेणी-प्रयाग एकादश ॥६२॥

तेथ वैराग्य-माघमासीं जाण । श्रद्धाअरुणोदयीं नित्य स्नान ।

करितां होऊनि पावन । कृष्णपदवी पूर्ण पावती ॥६३॥

हेही एकादशाची नव्हे कोटी । कृष्ण उद्धवांची गुह्य गोष्टी ।

हे बहुकल्प कपिलाषष्ठी । पर्वणी गोमटी निजसाधकां ॥६४॥

ते पर्वकाळीं जे निमग्न । ते तत्काळ पावती कल्याण ।

बाधूं न शके जन्ममरण । ब्रह्म परिपूर्ण स्वयें होती ॥६५॥

हा एकादश नव्हे जाण । एकतिसां खणांचें वृंदावन ।

एथ नित्य वसे श्रीकृष्ण । स्वानंदपूर्ण निजसत्ता ॥६६॥

एथ पंध्राशतें श्लोक । तेचि पानें अत्यंत चोख ।

माजीं ज्ञानमंजरीचे घोख । अतिसुरेख शोभती ॥६७॥

तेथ जे घालिती निजजीवन । ते होती परम पावन ।

स्वयें ठाकती कृष्णसदन । ब्रह्म परिपूर्ण स्वानंदें ॥६८॥

जे वंदिती मुळींच्या उदका । जे लाविती मूळमृत्तिका ।

ते वंद्य होती तिहीं लोकां । नित्य निजसखा श्रीकृष्ण जोडे ॥६९॥

जे पठणरुपें जाणा । प्रत्यगावृत्ति प्रदक्षिणा ।

सद्भावें करिती सुजाणा । ते श्रीकृष्णचरणां विनटती ॥४७०॥

ये कथेच्या विचित्र लीला । जे नित्य घालिती रंगमाळा ।

ते नागवती कळिकाळा । सदा त्यांजवळा श्रीकृष्ण ॥७१॥

हें एकादशाचें वृंदावन । जो श्रवणें करी नित्य पूजन ।

त्यासी प्रसन्न होऊनि श्रीकृष्ण । देहाभिमान निर्दळी ॥७२॥

तेथ मननाची पुष्पांजळी । जो अनुदिनीं अर्पी त्रिकाळीं ।

तोही पावे हरिजवळी । निजात्ममेळीं निजनिष्ठा ॥७३॥

हें श्रीभागवत-वृंदावन । मेळवूनि संत सज्जन ।

ये कथेचें करी जो व्याख्यान । तें महापूजन निरपेक्ष ॥७४॥

हें देखूनि महापूजन । संतोषे श्रीजनार्दन ।

श्रोते वक्ते जे सावधान । त्यांसी निजात्मज्ञान स्वयें देत ॥७५॥

श्रवणें पठणें मननें । अर्थावबोधव्याख्यानें ।

एकादशें समान देणें । जाणें तानें त्या नाहीं ॥७६॥

श्रवण मनन नव्हे पठण । तरी एकादशाचें पुस्तक जाण ।

ब्राह्मणासी द्यावें दान । विवेकज्ञान तेणें उपजे ॥७७॥

एकादश द्यावें दान । करावें एकादशाचें पूजन ।

करितां एकादशाचें स्मरण । पाप संपूर्ण निर्दळे ॥७८॥

एकादशसंग्रह जो करी । श्रीकृष्ण तिष्ठे त्याचे घरीं ।

जो एकादशाची श्रद्धा धरी । ज्ञान त्यामाझारीं स्वयें रिघे ॥७९॥

श्लोक श्लोकार्ध पादमात्र । नित्य स्मरे ज्याचें वक्त्र ।

तोही होय परम पवित्र । अतिउदार एकादश ॥४८०॥

अवचटें जातां कार्यांतरीं । दृष्टी पदे एकादशावरी ।

तैं पातकां होय रानभरी । आपधाकें दूरी तीं पळती ॥८१॥

तो एकादश ज्याचे करीं । देव वंदिती त्यातें शिरीं ।

तो निजांगें जग उद्धरी । एवढी थोरी एकादशा ॥८२॥

सकळ पुराणांमाझारीं । हा एकादश वनकेसरी ।

भवगजातें विदारी । क्षणामाझारीं श्र्लोकार्धें ॥८३॥

’मामेकमेव शरणं’ । याचि श्लोकाचें करितां पठण ।

मायेचा गळा धरोनि जाण । अपधाकें पूर्ण संसार निमे ॥८४॥

’निरपेक्षं मुनि शांतं’ । हा श्लोक चढे जैं हात ।

तैं सेवकां सेवी श्रीकृष्णनाथ । भवभय तेथ उरे कैंचें ॥८५॥

एकादशाचा एकेक श्लोक । होय भवबंधच्छेदक ।

जेथ वक्ता यदुनायक । तेथ हा विशेख म्हणों नये ॥८६॥

श्रीभागवतामाजीं जाण । एकादश मोक्षाचें स्थान ।

यालागीं श्लोकार्धमात्रें परिपूर्ण । भवबंधन निर्दळी ॥८७॥

श्रीकृष्ण वेदांचें जन्मस्थान । त्याचे मुखींचें हें निरुपण ।

तेथें सकळ वेदार्थ जाण । माहेरा आपण स्वयें येती ॥८८॥

यालागीं एकादशीं वेदार्थ । माहेरीं सुखावले समस्त ।

ते साधकासी परमार्थ । स्वानंद देत संपूर्ण ॥८९॥

मंथोनि वेदशास्त्रार्थ । व्यासें केलें महाभारत ।

त्या भारताचा मथितार्थ । श्रीभागवत-हरिलीला ॥४९०॥

त्या भागवताचा सारांश । तो हा जाण एकादश ।

तेथ वक्ता स्वयें हृषीकेश । परब्रह्मरस प्रबोधी ॥९१॥

भागवतामाजीं एकाद्श । जैसा यतींमाजीं परमहंस ।

का देवांमाजीं जगन्निवास । तैसा एकादश अति वंद्य ॥९२॥

पक्ष्यांमाजीं राजहंस । रसांमाजीं सिद्धरस ।

तैसा भागवतामाजीं एकादश । परम सुरस स्वानंदें ॥९३॥

तीर्थ क्षेत्र वाराणसी । पावनत्वें गंगा जैशी ।

जीवोद्धारीं एकादशी । महिमा तैसी अनिर्वाच्य ॥९४॥

त्या एकादशाची टीका । जनार्दनकृपा करी एका ।

तो एकत्वाच्या निजसुखा । फळे भाविका सद्भावें ॥९५॥

धरोनि बालकाचा हातु । बाप अक्षरें स्वयें लिहिवितु ।

तैसा एकादशाचा अर्थु । बोलविला परमार्थु जनार्दनें ॥९६॥

कैसा चालवावा ग्रंथ । केवीं राखावा पदपदार्थ ।

ये व्युत्पत्तीची नेणें मी मात । बोलवी समर्थ जनार्दन ॥९७॥

जनार्दनें नवल केलें । मज मूर्खाहातीं ज्ञान बोलविलें ।

ग्रंथीं परमार्थरुप आणिलें । वाखाणविलें एकादशा ॥९८॥

एकाद्शाचा पदपदार्थ । शास्त्रवक्त्त्यां अतिगूढार्य ।

तोही वाखाणविला परमार्थ । कृपाळु समर्थ मी जनार्दन ॥९९॥

जनार्दनें ऐसें केलें । माझें मीपण निःशेष नेलें ।

मग परमार्था अर्थविलें । बोलवूनि बोलें निजसत्ता ॥५००॥

खांबसूत्राचीं बाहुलीं । सूत्रधार नाचवी भलीं ।

तेवीं ग्रंथार्थाची बोली । बोलविली श्रीजनार्दनें ॥१॥

अवघा श्रीजनार्दनचि देखा । तोचि आडनांवें जाहला ’एका’ ।

तेणें नांवें ग्रंथ नेटका । अर्थूनि तात्त्विकां तत्त्वार्थ दावी ॥२॥

कवित्वीं घातलें माझें नांव । शेखीं नांवाचा नुरवी ठाव ।

ऐसें जनार्दनवैभव । अतिअभिनव अलोलिक ॥३॥

ग्रंथ देखोनियां सज्ञान । म्हणती ज्ञाता एका जनार्दन ।

जवळीं जाहलिया दर्शन । मूर्ख संपूर्ण मानिती ॥४॥

एका जनार्दनाचा वृत्तांत । एक म्हणती ’भला भक्त ।

एक म्हणती जीवन्मुक्त । प्रपंची निश्चित मानिती एक ॥५॥

अहो हा एका जनार्दन । नाहीं आसन न देखे ध्यान ।

मंत्र मुद्रा माळा जपन । उपासकलक्षण या नाहीं ॥६॥

कोण मंत्र असे यासी । काय उपदेशी शिष्यांसी ।

हें कळों नेदी कोणासी । भुललीं भाविकें त्यासी अतिभावार्थें ॥७॥

नुसत्या हरिनामाचे घोष । लावूनि भुलविले येणें लोक’ ।

ऐसे नाना विकल्प अनेक । जनार्दन देह उपजवी स्वयें ॥८॥

मी जेथ झाडा देऊं जायें । तें बोलणें जनार्दनचि होये ।

युक्तिप्रयुक्तीचें पाहें । मीपण न राहे मजमाजीं ॥९॥

एवं माझें मीपण समूळीं । श्रीजनार्दन स्वयें गिळी ।

आतां माझी हाले जे अंगुळी । ते ते क्रिया चाळी श्रीजनार्दन ॥५१०॥

निमेषोन्मेषांचे संचार । श्वासोच्छवासांचें परिचार ।

सकळ इंद्रियांचा व्यापार । चाळिता साचार श्रीजनार्दन ॥११॥

जेथ मी म्हणों जाये कविता । ते जनार्दनचि होय तत्त्वतां ।

माझें मीपण धरावया पुरता । ठाव रिता नुरेचि ॥१२॥

माझें जें कां मीपण । जनार्दन जाहला आपण ।

एका जनार्दना शरण । ग्रंथ संपूर्ण तेणें केला ॥१३॥

हेही बोल बोलतां जाण । खुणा वारी जनार्दन ।

झाडा सूचितां संपूर्ण । वेगळेंपण अंगीं लागे ॥१४॥

आतां वेगळा अथवा एक । अवघा जनार्दन स्वयें देख ।

तेणें ग्रंथार्थाचे लेख । अत्यंत चोख विस्तारिले ॥१५॥

ग्रंथ देशभाषा व्युत्पत्ती । म्हणोनि नुपेक्षावा पंडितीं ।

अर्थ पहावा यथार्थीं । परमात्मस्थिती निजनिष्ठा ॥१६॥

जरी संस्कृत ग्रंथ पूर्ण । तरी देशभाषाव्याख्यान ।

मा हें आयतें निरुपण । साधक सज्ञान नुपेक्षिती ॥१७॥

जे या ग्रंथा आदर करिती । अथवा जे कां उपेक्षिती ।

केवळ जे कोणी निंदिती । तेही आम्हां ब्रह्ममूर्ति सद्गुरुरुपें ॥१८॥

हेंचि शिकविलें जनार्दनें । सर्व भूतीं मजचि पाहणें ।

प्रकृतिगुणांचीं लक्षणें । सर्वथा आपणें न मानावीं ॥१९॥

शिष्याचे क्षोभ न साहवती । निंदकांची निंदा न जिरे चित्तीं ।

तैं तो कोरडाचि परमार्थीं । क्षोभें निश्चितीं नागविला ॥५२०॥

एवं पराचे प्रकृतिगुण । पाहतां सर्वथा क्षोभे मन ।

ते न पहावे आपण । सर्वभूतीं चैतन्य समत्वें पहावें ॥२१॥

येचि उपदेशीं अत्यादर । जनार्दनें केला थोर ।

यावेगळा भवाब्धिपार । सज्ञान नर पावों न शके ॥२२॥

येणें निर्धारें गुरु तो गुरु । आम्हां शिष्य तोही संवादगुरु ।

निंदक तो परम गुरु । निपराद सद्गुरु जनार्दनकृपा ॥२३॥

जनार्दनकृपा एथें । गुरुवेगळें नुरेचि रितें ।

मीपणासहित सकळ भूतें । गुरुत्वा निश्चितें आणिलीं तेणें ॥२४॥

तेणेंचि हे ग्रंथकथा । सिद्धी पावविली परमार्था ।

माझे गांठीची नव्हे योग्यता । हें जाणितलें श्रोतां ग्रंथारंभीं ॥२५॥

ग्रंथारंभ प्रतिष्ठानीं । तेथ पंचाध्यायी संपादूनी ।

उत्तर ग्रंथाची करणी । आनंदवनीं विस्तारिली ॥२६॥

’अविमुक्त’ ’महाश्मशान’ । ’वाराणसी’ ’आनंदवन’ ।

एकासीचि नांवें जाण । ऐका लक्षण त्याचेंही ॥२७॥

अतिशयें जेथें मुक्ती । अधमोत्तमां एकचि गति ।

पुढती नाहीं पुनरावृत्ती । ’अविमुक्त’ म्हणती या हेतू ॥२८॥

जे श्मशानीं सांडिल्या प्राण । प्राणी पुढें न देखे मसण ।

यालागीं हें ’महाश्मशान’ । अंतीं ब्रह्मज्ञान शिव सांगे ॥२९॥

मर्यादा श्वेत ’वरुणा’ ’अशी’ । मध्यें नांदे पंचक्रोशी ।

रिगम नाहीं पातकांसी । यालागीं ’वाराणसी’ म्हणिपें इतें ॥५३०॥

’वरुणा’ पातकांतें वारी । ’अशी’ महादोष संहारी ।

मध्यें विश्वेश्वराची नगरी । ’वाराणसी’ खरी या हेतु ॥३१॥

जें विश्वश्वराचें क्रीडास्थान । जेथ स्वानंदें शिव क्रीडे आपण ।

यालागीं तें आनंदवन । ज्यालागीं मरण अमर वांछिती ॥३२॥

जेथें जितां सदन्नें भुक्ती । मेल्यामागें अचुक मुक्ती ।

यालागीं ’आनंदवन’ म्हणती । पार्वतीप्रती सदाशिव सांगे ॥३३॥

तया वाराणसी मुक्तिक्षेत्रीं । मणिकर्णिकामहातीरीं ।

पंचमुद्रापीठामाझारीं । एकादशावरी टीका केली ॥३४॥

ऐकतां संतोषले सज्जन । स्वानंदें तुष्टला जनार्दन ।

पंचाध्यायी संपतां जाण । स्वमुखें आपण वरद वदला ॥३५॥

ग्रंथ सिद्धी पावेल यथार्थी । येणें सज्ञानही सुखी होती ।

मुमुक्षु परमार्थ पावती । साधक तरती भवसिंधु ॥३६॥

भाळेभोळे विषयी जन । याचें करितां श्रवण पठण ।

ते हरिभक्त होती जाण । सन्मार्गी पूर्ण बहुत होती ॥३७॥

’हे टीका तरी मराठी । परी ज्ञानदानें होईल लाठी’ ।

ऐसी निजमुखीं बोलोनि गोठी । कृपादृष्टीं पाहिलें ॥३८॥

तेथ म्यां ही केली विनंती । ’जे ये ग्रंथीं अर्थार्थी होती ।

त्यांसी ब्रह्मभावें ब्राह्मणीं भक्ती । नामीं प्रीती अखंड द्यावी ॥३९॥

ते न व्हावे ब्रह्मद्वेषी । निंदा नातळावी त्यांसी ।

समूळ क्षय ब्रह्मद्वेषेंसीं । निंदेपासीं सकळ पापें’ ॥५४०॥

ऐसी ऐकतां विनवण । कृपेनें तुष्टला श्रीजनार्दन ।

जें जें मागितलें तें तें संपूर्ण । वरद आपण स्वयें वदला ॥४१॥

ये ग्रंथीं ज्या अत्यंत भक्ती । निंदाद्वेष न रिघे त्याचे चित्तीं ।

श्रीरामनामीं अतिप्रीती । सुनिश्चितीं वाढेल ॥४२॥

अविद्य सुविद्य व्युत्पत्ती । न करितां, ब्राह्मणजातीं ।

ब्रह्मभावें होईल भक्ती । तेणें ब्रह्मप्राप्ती अचूक ॥४३॥

नामापरता साधकां सद्भावो । नाहीं ब्राह्मणापरता आन देवो ।

तो ये ग्रंथीं भजनभावो । नीच नवा पहा हो वाढेल ॥४४॥

ऐसें देवोनि वरदान । हृदयीं आलिंगी जनार्दन ।

म्हणे ये ग्रंथीं जया भजन । त्याचें भवबंधन मी छेदीं ॥४५॥

हेही अलंकारपदवी । स्वयें जनार्दनचि वदवी ।

एवं कृपा केली जनार्दनदेवीं । हे ठेवाठेवी मी नेणें ॥४६॥

थोर भाग्यें मी पुरता । पूर्ण कृपा केली समस्त श्रोतां ।

समूळ सांभाळिलें ग्रंथार्था । अर्थपरमार्था समसाम्यें ॥४७॥

पुढें या ग्रंथाचें व्याख्यान । जेथ होईल कथाकथन ।

तेथ द्यावें अवधान । हें प्रार्थन दीनाचें ॥४८॥

हे ऐकोनि प्रार्थन । संतोषले श्रोतेसज्जन ।

हे कथा आमुचें निजजीवन । जेथ व्याख्यान तेथ आम्ही ॥४९॥

ऐसे संतुष्टले श्रोतेजन । वरदें तुष्टला श्रीजनार्दन ।

एका जनार्दन शरण । ग्रंथ संपूर्ण तेणें जाहला ॥५५०॥

वाराणसी महामुक्तिक्षेत्र । विक्रमशक ’वृष’ संवत्सर ।

शके सोळाशें तीसोत्तर । टीका एकाकार जनार्दनकृपा ॥५१॥

महामंगळ कार्तिकमासीं । शुक्ल पक्ष पौर्णिमेसी ।

सोमवार शिवयोगेंसी । टीका एकादशी समाप्त केली ॥५२॥

स्वदेशींचा शक संवत्सर । दंडकारण्य श्रीरामक्षेत्र ।

प्रतिष्ठान गोदातीर । तेथील उच्चार तो ऐका ॥५३॥

शालिवाहनशकवैभव । संख्या चौदाशें पंचाण्णव ।

’श्रीमुकह’ संवत्सराचें नांव । टीका अपूर्व तैं जाहली ॥५४॥

एवं एकादशाची टीका । जनार्दनकृपा करी एका ।

ते हे उभयदेश आवांका । लिहिला नेटका शकसंवत्सर ॥५५॥

पंध्राशतें श्लोक सुरस । एकतीस अध्याय ज्ञानरहस्य ।

स्वमुखें बोलिला हृषीकेश । एकाकी एकादश दुजेनिवीण ॥५६॥

एकादश म्हणजे एक एक । तेथ दुजेपणाचा न रिघे अंक ।

तेंचि एकादश इंद्रियीं सुख । एकत्वीं अलोलिक निडारलें पूर्ण ॥५७॥

त्या एकाद्शाची टीका । एकरसें करी एका ।

त्या एकत्वाच्या निजमुखा । फळेल साधकां जनार्दनकृपा ॥५८॥

हा ज्ञानग्रंथ चिद्रत्‍न । यथार्थ अर्थिला संपूर्ण ।

माझेनि नांवें श्रीजनार्दन । ग्रंथकर्ता आपण स्वयें जाहला ॥५९॥

एका जनार्दना शरण । जनार्दना पढियें एकपण ।

जेवीं कां सूर्याचे किरण । सूर्यतेजें पूर्ण निरसी तम ॥५६०॥

तेवीं श्रीजनार्दन तेजें जाण । प्रकाशलें एकपण ।

तेणें प्रकाशें ग्रंथ संपूर्ण । जनार्दनार्पण एकपणेंसीं ॥६१॥

’जन जनार्दन एक’। जाणे तो सुटला निःशेख ।

हेंचि नेणोनियां लोक । गुंतले अनेक निजात्मभ्रमें ॥५६२॥

इति श्रीभागवते महापुराणे परमहंससंहितायां एकादशस्कंधे

श्रीकृष्ण उद्धवसंवादे एकाकारटीकायां ’मौसलोपाख्यानं’ नाम एकत्रिंशोऽध्यायः ॥३१॥

श्रीकृष्णार्पणमस्तु॥श्लोक २८॥ओंव्या ५६२॥* एकूण ५९० ॥ ॐ तस्तत् ॥

एकतिसावा अध्याय समाप्त.