श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्रीएकनाथ स्तवन - आर्या

मयूरपंतरचित

श्रीएकनाथ स्तवन - आर्या

झाले वंद्य शतमखा जे गेले शरण भानुदासा जे ।

त्यासी साम्य पहातां, न उदारा रत्‍न सानुदासा जे ॥१॥

श्रीभागवतवरानें केलें यश शुद्ध एकनाथानें ।

येणें प्रमुदित झाला साधु जसा बाला सेवितां थानें ॥२॥

भूतदया संसारीं एकोपंतास निरुपमा घडली ।

जडली अंगासीच क्षांति सदा शांति तों गळां पडली ॥३॥

एकोबाची सेवा आवडली फार केशवा देवा ।

रोमांचित तनु झाल्या गंगा कृष्णा कलिंदजा रेवा ॥४॥

अत्यद्भुत यश हरिचें जेविं तसें एकनाथपंताचें ।

तें तें साचें जें जें वर्णितसे चरित वृंद संतांचें ॥५॥

भूताराधन-यज्ञीं, समदर्शी एक पर महार मला ।

द्रवुनि म्हणे पित्रन्नें भोज्य जगन्निंद्य परम हा रमला ॥६॥

एकोपंत जनार्दनपंताचें भजनही असीम करी ।

याची मति गुरुचरणीं, भक्ष्यीं घालि न मिठी असी मकरी ॥७॥

कथिती एकोबाच्या चरणाची अद्भुताचि बा शुचिता ।

रक्षी बाळ सतीचा तत्तनुतें भस्म करुनि आशु चिता ॥८॥

श्रीज्ञानेश्वर भेटे एकोबाला तसाचि अत्रिज गा ।

हें किति दास्य करि प्रभु ज्याहुनि आधार अन्य न त्रिजगा ॥९॥

ग्रंथ श्रीभागवत श्रीरामायण करी सुविस्तर ते ।

जरि न रचिता दयानिधि केवळ जड जीव ते कसे तरते ॥१०॥

विश्वेश्वर अविमुक्तीं, विठ्ठल पंढरपुरीं, प्रतिष्ठानीं ।

प्रभु एकनाथ, वरिला सर्व महिंत दैवत-प्रतिष्ठांनीं ॥११॥

संत म्हणति आठवती किति म्हणती आठवे अळंदी न ।

पाहुन वृंदावन तें तैसें हेंही म्हणे अलं दीन ॥१२॥

जा पैठणांत षष्ठीं तो संसारीं कधीं नव्हे कष्टी ।

हे स्वस्थाना नेते रक्षुनि अंधा बळा जशी यष्टी॥१३॥

भक्तासि नाथ जैसा विश्वाचा मायबाप हर पावे ।

साक्षात् भगवान् हा कीं, या भजतां सर्व ताप हरपावे ॥१४॥

प्रभुभक्त प्रभुरुप स्पष्ट म्हणुनि एकनाथ हा भावें ।

स्तविला भक्त मयूरें कीं येणें सर्व इष्ट लाभावें ॥१५॥

रामपदीं मन जडतां जडता मग काय कायमल सारा ।

पद सेवा भ्रम वारा भ्रमर जसा सेवितो कमलसारा ॥१६॥

हातीं न चित्त वित्तहि न धडे जपतपहि शुद्ध बुद्धि नसे ।

परि हरिजन हो प्रभुच्या हृदयीं तुमच्याहि वत्सलत्व वसे ॥१७॥

याहुनि अति अधिकोत्तर एकोपंतचि मनासि आवडला ।

जपलों बहुतापरि मी सेवाधर्म न समग्र सांपडला ॥१८॥

आणाव्या कावेडी श्रीगंगेच्या भरुनियां पाणी ।

ब्राह्मणजनकी मिरवी केली जेवीं अजांनिं बापांनीं ॥१९॥

ऐसी द्वादश वर्षें सेवा करि हरि अती अनंदानें ।

दाखविलें नाथाला जें सुख तें पाहिलें न नंदानें ॥२०॥

करि होड जोड बांधुनि कुलतारक नाथ गेहिंचें खोड ।

अति गोड कोडकौतुक भक्ताचें हरिचि ही जुनी खोड ॥२१॥

होतों वज्रांतरीं मी झाला मद्देह फार खोडकर ।

झिजवीत नाथसदनीं प्रायश्चित्तार्थ काय खोड कर ॥२२॥

श्रीएकनाथसंतचि गुरुपदरत वास ज्या प्रतिष्ठान ।

तिष्ठा नमुनी तत्पद देव धरी ज्या घरीं प्रतिष्ठा न ॥२३॥

निर्जररिपु जर्जर करि तो गुर्जरदेश-विप्र कामकरी ।

होऊनि नाथसदनीं गंधजलादिक उदंड काम करी ॥२४॥

शुकसम जेणें केले, विकार रिपु हे अनाथ संतत सा ।

भवसिंधुसेतु तो कां न ध्यावा एकनाथ संत तसा ॥२५॥

शुक भवनिधि तरले परि योगालावू धरोनियां पोटीं ।

एकोबाही तरले भवप्रस्तर दृढ धरोनिया पोटीं ॥२६॥

श्रीनाथघरीं पाणी द्वादश वर्षें भरीच कंसारी ।

त्या वंशासि भजावें सार्थक हें मुख्य सौख्य संसारीं ॥२७॥

मुरलि म्हणे सद्वंशज मम सम हरिला न अन्य आवडती ।

परि झाली मजहुनि ही प्रियकर बहु एकनाथ कावड ती ॥२८॥

झाली सुखसावडती श्रीहुनि बहु एकनाथकावड ती ।

आवडती स्कंधावरि वाहे ठेवी पदींच नावडता ॥२९॥

स्कंधावरि मद्वंशज स्वपदीं पद्मा अयोग्य ही नमनीं ।

अपुली दशा कशाला सांगूं झाले गृहांतरीं धमनी ॥३०॥

नेतां गंगोदक जरि पुशिलें तव नांव काय गा गोत ।

सांगे नाथसदनिंचा श्रीखंडया मीच दासवर्गांत ॥३१॥

श्रीधर मुरलीधर हीं नामें धरिलीं तये प्रसंगानें ।

देवत्वादि महत्त्वा विसरुनि गेलाचि विप्रसंगानें ॥३२॥

महदाश्रय साह्यानें स्कंधावरि वागवीत भूषण हें ।

त्रैलोक्यांतरिं मिरवी ’श्रीखंडया पाणक्या’ विशेषण हें ॥३३॥

बाह्यांतरिं संकोच त्यजिला सेवेंत एकनाथाच्या ।

विध्वंसिताघपुंज श्रवणीं पडतांचि हे कथा ज्याच्या ॥३४॥

वसुदेव-देवकीसी नंदयशोदा व्रजस्थ जन सगळे ।

सादर शुकतातानें वर्णियले भाग्यवान ते अगळे ॥३५॥

सत्यचि जे परगुण जरि मायेनें मोहिले तयालाही ।

श्रीनाथाच्या ठायीं मिथ्या माया पदार्थ हा नाहीं ॥३६॥

श्रीच्या करापरिसही मृदुतर भासति हरीस कणवाळू ।

खुपति न पदारविंदा नेतां पाणी स्वभक्त-कणावाळू ॥३७॥

श्रीसह मंचकशय्या तुच्छ करुनि हृदिं धरुनि कावडिला ।

शयना करीच रात्रौ काय म्हणावें ययाहि आवडिला ॥३८॥

मी कोण काय करितो ऐसें नुमजे असोनि बुद्धि वर ।

लक्षावधि कावडिनें रांजण भरि हरि जसाच कीं धिवर ॥३९॥

श्रीएकनाथसदनीं माधवजी सर्व काम हें करितो ।

स्वकरें चंदन घासी गंगेचें पाणि कावडीं भरितो ॥४०॥

गोपां किति गोपींना नेदी उदकासि आणिका वडिला ।

तो एकनाथसदनीं गंध उगाळूनि आणि कावडिला ॥४१॥

अद्यापि साण रांजण नाथद्वारांत असति देवाच्या ।

हातींचे, म्हणुनि कवी पंत मयूरेश तशि वदे वाचा ॥४२॥

आवडिनें कावडिनें प्रभुनें सदनांत वाहिलें पाणी ।

एकचि काय वदावें पडत्या कार्यार्थ वाहिले पाणी ॥४३॥

जपितपिसंन्याशांहुनि श्रीहरिला भक्त फार आवडतो ।

स्पष्ट पहा नाथगृहीं घेउनि वाहे जळाचि कावड तो ॥४४॥

पार्थाच्या अश्वांला करीतसे मी अहो खरारा जी ।

तत्तुल्य भक्त मिळतां त्यालाही होतसे खरा राजी ॥४५॥

शिरजोर बायकोचा शांत जसा शीण दादला वाहे ।

धी वर्तविते जीवा सत हो देवा सदा दला वाहे ॥४६॥