श्रीगणेशाय नमः ॥
ओं नमोजी सद्गुरुपंचाक्षरा ॥ श्रीब्रह्मानंदा सौख्यसमुद्रा ॥ तूं परात्परसोइरा ॥ नामरुपातीत जो ॥१॥
नाम रुप गुण वर्ण ॥ तुझे ठायीं नाहींत मुळींहून ॥ सच्चिदानंदघन पूर्ण ॥ हेंही बोलणें न साहे ॥२॥
अनंत ब्रह्मांडें कडोविकडी ॥ माया तुझी घडी मोडी ॥ परी तूं तिकडे एक घडी ॥ न पाहसी विलोकूनि ॥३॥
परी जीव पडिले अविद्येच्या फांसा ॥ त्यांसी उद्धरावया जगदीशा ॥ द्वारकेमाजी पुराणपुरुषा ॥ अवतरलासी म्हणोनि ॥४॥
सांडोनियां योगनिद्रा ॥ सगुण जाहलासी यादवेंद्रा ॥ मन्मथजनका त्रिभुवनसुंदरा ॥ विश्वोद्धारा विश्वेशा ॥५॥
तिसाविये अध्यायीं कथन ॥ सत्यभामेनें केलें कृष्णदान ॥ तुळेवरी तुळसीपत्र ठेवून ॥ रुक्मिणीनें कृष्ण सोडविला ॥६॥
यावरी एकदां कमलोद्भवसुत ॥ जो व्यासवाल्मीकांचा गुरु सत्य ॥ ध्रुव प्रल्हाद परम भक्त ॥ ज्याच्या अनुग्रहें उद्धरलें ॥७॥
चतुर्दश विद्या चौसष्ट कळा ॥ करतळामळ जयासी सकळा ॥ ज्याची ऐकतां गायनकळा ॥ ब्रह्मा हरि हर डुल्लती ॥८॥
चारी वेद मुखोद्गत ॥ सर्व शास्त्रीं पारंगत ॥ सामर्थ्य तयाचें अद्भुत ॥ त्रैलोक्य वंदी जयासी ॥९॥
भुतभविष्यवर्तमानज्ञान ॥ हें ज्यापुढें उभें कर जोडून ॥ न लागातांचि एक क्षण ॥ ब्रह्मांड मोडोनि रची पुढती ॥१०॥
अन्याय देखतांचि सत्वरा ॥ जो शिक्षा करी विधिहरिहरां ॥ ज्ञानी कृपाळु ऐसा दूसरा ॥ ब्रह्मांडोदरामाजी नसे ॥११॥
ऐसा तो नारद मुनीश्वर ॥ तीर्थें करीत समग्र ॥ दक्षिणसमुद्रीं रामेश्वर ॥ तेथें सत्वर पातला ॥१२॥
तों तेथें देखिला समीरसुत ॥ जो ज्ञानी भक्त विरक्त ॥ जो श्रीरामाचा प्रियपात्र ॥ प्राणांहूनि पलीकडे ॥१३॥
तो दक्षिणसमुद्रीं करी अनुष्ठान ॥ अंतरीं आठविलें श्रीरामध्यान ॥ नेत्रीं वाहे प्रेमळ जीवन ॥ वेधलें मन श्रीरामीं ॥१४॥
तों ब्रह्मनंदन आला तेथें ॥ तें अंतरीं कळलें हनुमंतातें ॥ ध्यान विसर्जुनि नारदातें ॥ भेटावया धांविन्नला ॥१५॥
घरा आलिया संतजन ॥ जे हरीसी आवडती प्राणांहून ॥ त्यांचा अव्हेर करुनियां जाण ॥ जो कां ध्यान करुं बैसे ॥१६॥
तोचि दुरात्मा खळ निर्धारीं ॥ हरि म्हणे तो मुख्य माझा वैरी ॥ जो माझ्या संतांचा अपमान करी ॥ मी नानाप्रकारें निर्दाळीं त्यांतें ॥१७॥
करुनि संतांचा अनादर ॥ जो माझी पूजा करी पामर ॥ पूजा नव्हे तो लत्ताप्रहर ॥ तेणें मज समर्पिला ॥१८॥
ओलांडूनि पूजा समग्र ॥ जो संतांचा करी परमादर ॥ तेणें कोटि मखांचें फळ निर्धार ॥ मज समर्पिलें ते दिवसीं ॥१९॥
असो उठोनियां हनुमंत ॥ प्रेमें नारदाचे चरण धरीत ॥ दोघे भेटले तेव्हां अद्भुत ॥ प्रेमरस न सांवरे ॥२०॥
दोघेही योगी परम निर्धारीं ॥ दोघेही बाळब्रह्मचारी ॥ दोघेही आवडती श्रीहरी ॥ इंदिरेहूनि अत्यंत ॥२१॥
दोघेही केवळ भक्त ॥ दोघेही ज्ञानी अति विरक्त ॥ दोघेही विचरति नित्यमुक्त ॥ पुरुषार्थ अद्भुत दोघांचा ॥२२॥
एक हरि एक उमावर ॥ कीं एक मृगांक एक मित्र ॥ तैसे दोघे नारद वायुकुमर ॥ क्षेमालिंगन पैं देती ॥२३॥
हनुमंतें तृणासन घालून ॥ वरी बैसविला ब्रह्मनंदन ॥ प्रेमेंकरुनि चरणक्षालन ॥ केलें पूजन यथाविधि ॥२४॥
नारद म्हणे हनुमंतातें ॥ कैसा तूं काळ क्रमितोसी येथें ॥ ऐसें ऐकतां वायुसुतें ॥ सप्रेम चित्त होवोनि बोले ॥२५॥
श्रीरामअवतार संपलियावरी ॥ मी राहिलों दक्षिणसागरीं ॥ श्रीरामचरित्र आठवितां अंतरीं ॥ हृदय होत सद्गद ॥२६॥
एकबाण एकवचन ॥ एकपत्नीव्रत रघुनंदन ॥ जो सत्याचा सागर पूर्ण ॥ स्वानंदघन रुप ज्याचें ॥२७॥
ऐसें सांगतां हनुमंत ॥ प्रेमभरें दाटला अत्यंत ॥ नारद म्हणे रामकथामृत अद्भुत ॥ तेथें बुडी देईं सदा ॥२८॥
आणि पृथ्वीवरी तीर्थें बहुत ॥ तीं एकदां विलोकीं समस्त ॥ तीर्थीं भेटती साधुसंत ॥ जे कां डुल्लती ब्रह्मानंदें ॥२९॥
संतदर्शन सर्वांत सार ॥ यालागीं तीर्थें करी समग्र ॥ ऐसें बोलोनि ब्रह्मपुत्र ॥ निराळपंथें चालिला ॥३०॥
मुखीं श्रीरामगुण गात ॥ द्वारकेसी आला अकस्मात ॥ कृष्णें देखतां जलजोद्भवसुत ॥ आसनीं बैसवूनि पूजिला ॥३१॥
हरि पुसे सकळ वर्तमान ॥ नारद म्हणे धुंडिलें त्रिभुवन ॥ कृष्णातीर्थें करितां संपूर्ण ॥ सेतुबंधासी पावलों ॥३२॥
तेथें देखिला श्रीरामभक्त ॥ महायोगी वीर हनुमंत ॥ काय वर्णूं त्याचे गुण अद्भुत ॥ ऐसा विरक्त दुसरा नाहीं ॥३३॥
तो तीर्थें करीत यादवेंद्रा ॥ येईल तुमच्या निजनगरा ॥ हरि शोधितां या ब्रह्मांडोदरा ॥ ऐसा दुसरा न भेटे ॥३४॥
ऐसें ऐकतां जगजेठी ॥ नारदाचे कंठीं घातली मिठी ॥ म्हणे तो केव्हां देखेन दृष्टी ॥ सांगसी गोष्टी जयाच्या ॥३५॥
नारदा ऐसिया भक्तावरुन ॥ वाटे ओंवाळूनि टाकावा प्राण ॥ सद्गद जाहला जगज्जीवन ॥ मग ब्रह्मनंदन बोलिला ॥३६॥
भक्तवल्लभाराजीवनयना ॥ तो त्वरितचि येईल तुमच्या दर्शना ॥ असो इकडे हनुमंत तीर्थाटना ॥ निघता जाहला तेधवां ॥३७॥
संपूर्ण पाहोनि दक्षिणमानस ॥ हनुमंत आला गौतमीतीरास ॥ ज्योतिर्लिंग त्र्यंबक विशेष ॥ महिमा ज्याचा न वर्णवे ॥३८॥
देखोनि पंचवटीस्थान ॥ हृदयीं गहिंवरे वायुनंदन ॥ म्हणे येथें माझ्या स्वामीनें राहून ॥ दंडकारण्य उद्धरिलें ॥३९॥
पुढें पश्चिमपंथें चालिला मारुती ॥ तों दृष्टीं देखिलीं द्वारावती ॥ जैसी अयोध्या पूर्वीं देखिली होती ॥ तैसी निश्चितीं दिसे हे ॥४०॥
लक्षावधि कळस एकसरें ॥ झळकती रत्नखचित गोपुरें ॥ अहोरात्र मंगळतुरें ॥ द्वारकेमाजी गर्जती ॥४१॥
चित्रविचित्र मंदिरें ॥ आळोआळीं झळकति सुंदरें ॥ नीळरत्नांचीं मयूरें ॥ प्राण नसतां धांवती ॥४२॥
पाचूंचे रावे घरोघरीं ॥ नाना शब्द करिती कुसरी ॥ कम्पवृक्ष दारोदारीं ॥ अहोरात्र डुल्लती ॥४३॥
ऐसी द्वारकापुरी देखोन ॥ संतोषला अंजनीहृदयरत्न ॥ पुढें गोमतीतीरीं येऊन ॥ उभा ठाकला नावेक ॥४४॥
तों ऋषि ध्यानस्थ बैसले सकळ ॥ जैसे गभस्ती उगवले निर्मळ ॥ कीं मानससर